उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारसह ८ जणांना नोटीस
धार (मध्यप्रदेश) – येथील भोजशाळा हे श्री सरस्वतीदेवीचे प्राचीन मंदिर आहे. येथे देवीची मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापित करावी आणि येथे होणारे नमाजपठण बंद करावे, या मागण्यांसाठी इंदूर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. यासह या याचिकेत भोजशाळेचे चित्रीकरण आणि छायाचित्रे काढण्याचीही मागणी करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, पुरातत्व विभाग, कमाल मौला वेलफेअर सोसायटी, भोजशाळा कमिटी, जिल्हाधिकारी आदी ८ जणांना नोटीस बजावली आहे.
१. याचिकाकर्ता ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेच्या अध्यक्षा रंजना अग्निहोत्री, कुलदीप तिवारी, मोहीत गर्ग, आशीष गोयल, सुनील शाश्वत आणि रोहित खंडेलवाल आहेत. त्यांनी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि अधिवक्ता पार्थ यांच्या माध्यमातून ही याचिका प्रविष्ट केली आहे. या वेळी भोजशाळेची ३३ छायाचित्रे सादर करण्यात आली. यात भोजशाळेत देवतांची चित्रे आणि संस्कृत श्लोक असल्याचे दिसत आहे.
२. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, हे श्री सरस्वीतीदेवीचे मंदिर आहे; मात्र येथे नंतर कमाल मौला मशीद बनवण्यात आली. भोजशाळेची निर्मिती राजा भोजच्या काळात करण्यात आली होती. भोजशाळा त्या वेळी शिक्षणाचे मोठे केंद्र होते.
३. सध्या भोजशाळेत हिंदूंना मंगळवारी पूजा करण्याची, तर मुसलमानांना शुक्रवारी नमाजपठण करण्याची अनुमती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.
धार भोजशाला को लेकर इंदौर हाईकोर्ट में याचिका स्वीकार, संबंधित पक्षों को नोटिस जारीhttps://t.co/ZDqt3a8ay1
— Zee MP-Chhattisgarh (@ZeeMPCG) May 11, 2022
लंडन येथील वाग्देवीची मूर्ती परत आणण्याची मागणी
या याचिकेमध्ये लंडन येथील संग्रहालयात असणारी भोजशाळेतील प्राचीन श्री वाग्देवीची (श्री सरस्वतीदेवीची) मूर्ती परत आणण्याचीही मागणी करण्यात आली आहे. याविषयी रंजना अग्निहोत्री यांनी म्हटले की, आमची याचिका स्वीकारून न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावली आहे.