• दिंडीत २ सहस्र हिंदूंचा सहभाग • दिंडीच्या रूपाने कोल्हापूर शहर भगवेमय झाले ! |
कोल्हापूर – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे १२ मेच्या सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. श्री महालक्ष्मीदेवीच्या आशीर्वादाने आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा आदर्श ठेवत ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून २ सहस्र हिंदूंनी हिंदु राष्ट्राचा हुंकार दिला.
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्थेचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब, आधुनिक वैद्या पू. (श्रीमती) शरदिनी कोरे आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची उपस्थिती होती. या दिंडीमुळे कोल्हापूर शहर भगवेमय झाले होते आणि दिंडीच्या निमित्ताने लोकांची सनातनवरील विश्वास परत एकदा दृढ झाला.
दिंडीच्या समारोपप्रसंगी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘आतंकवाद कसा संपवला पाहिजे ? हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचे विचार आणि कृती यांतून दाखवून दिले आहे. या दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.’’
उपस्थित मान्यवर – शिवसेनेचे सर्वश्री किशोर घाटगे, उदय भोसले, विक्रम चौगुले, रणजित आयरेकर, शिवसेनेचे कागल उपशहरप्रमुख श्री. प्रभाकर थोरात, युवा सेनेचे तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अजित पाटील, शिरोली येथील शिवसेना ग्राहक संरक्षण समिती कक्ष जिल्हाप्रमुख श्री. दीपक यादव, भारतीय किसान संघाचे श्री. दिलीप पाटील, आर्य समाजाचे श्री. प्रीतम भोसले, रेणुका मंदिराचे विश्वस्त श्री. उदय शेंडे, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनील पाटील, मनसेचे श्री. विजय करजगार, हिंदुत्वनिष्ठ श्री. महेश उरसाल, ‘मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान संघटने’चे अध्यक्ष श्री. रणजीत घरपणकर, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष श्री. प्रसाद निगुडकर, ‘गुरुकुल करियर ॲकॅडमी’चे श्री. चारुदत्त पावले
सर्वांचे आकर्षण ठरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधिष्ठीत मूर्ती असलेला रथ !दिंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधिष्ठित मूर्ती असलेला रथ सर्वांचे आकर्षण ठरला. या रथामुळे सर्वांची क्षात्रवृत्ती जागृत होऊन सर्वांनी उत्स्फूर्तपणे विविध घोषणा दिल्या. दिंडी चालू झाल्यावर अनेकांनी या रथाची छायाचित्रे काढून ती इतरांना पाठवली. |
शिरोली, हालोंडी, हेर्ले, चोकाक, हुपरी, रेंदाळ, कासारवाडी, शिये, पेठवडगाव, केर्ले, केर्ली, भुयेवाडी, मत्तीवडे, नांगनूर, जत्राट, निपाणी (कर्नाटक) या गावांमधील धर्मप्रेमी दिंडीत सहभागी झाले होते. |
सहभागी आखाडे – सव्यासाची गुरुकुलम्, छावा मर्दानी आखाडा, शांतीदूत मर्दानी आखाडा, ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’चे श्री. सूरज ढोली आणि त्यांचे सहकारी
दिंडीवर ८ हून अधिक ठिकाणी पुष्पवृष्टी करून तिचे स्वागत !
दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत आणि पूजन करण्यात आले
मिरजकर तिकटी येथे श्री. चांदणे आणि श्री. अनिल नागवेकर यांनी, खरी कॉर्नर येथे श्री. आणि सौ. स्वाती मिलिंद जामसांडेकर यांनी, दैवज्ञ बोर्डींग कॉनर येथे रायकर ज्वेलर्स, सुरूची भोजनालयाचे मालक श्री. आणि सौ. अंजली संजय जोशीराव यांनी त्यांच्या भोजनालयासमोर, बिनखांबी गणेश मंदिर येथे सौ. पौर्णिमा पाटणकर, महाद्वार रस्ता येथे श्री. अमित माने आणि श्री. अमर काकडे, श्री स्वामी समर्थ मंदिर येथे सौ. निर्मला जाधव, श्री महालक्ष्मी मंदिर येथे श्री. प्रसाद निगुडकर, गुजरी कॉर्नर येथे ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष श्री. शाम जोशी, जोतिबा रोड येथे हिंदुत्वनिष्ठ श्री. महेश उरसाल, भाऊसिंग रस्ता येथे आझाद गल्ली तरुण मंडळाचे श्री. संजय करजगार आणि व्ही. काकडे सराफ, छत्रपती शिवाजी चौक येथे श्री. भूपाल शेटे, पापाची तिकटी येथे श्री. विलास ठोमके, कृष्ण सरस्वती मंदिर येथे श्री. राजेंद्र कुंभार आणि श्री. यशवंत कुंभार यांनी दिंडीवर पुष्पवृष्टी करून आणि आरती ओवाळून दिंडीचे स्वागत केले.
काही ठिकाणी इमारतींवरूनही पुष्पवृष्टी करण्यात आली. दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत होत असतांना समाजातील लोकही ध्वजाला, तसेच पालखीला भावपूर्ण नमस्कार करत होते.
दिंडीची वैशिष्ट्ये…
- गुरुपरंपरा दर्शवणारी पालखी -परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे आप्तकाळाविषयी प्रेरणादायी विचार मांडणारा चित्ररथ, संत ज्ञानेश्वर, मीराबाई, झाशीची राणी, ताराराणी, भारतमाता, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची वेशभूषा केलेले बालसाधक
- ‘शांतीदूत मर्दानी आखाडा’ यांची शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके
- कराटेची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकून घेणारा कोल्हापूर येथील ऋणमुक्तेश्वर कराटे केंद्रातील बालक
- गुरुद्वाराचे शौर्य पथक
- टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर करणारे वारकर्यांचे पथक
- ‘आपत्काळातील संजीवनी – प्रथमोपचारा’चे पथक
दिंडीच्या वेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला !
दिंडी चालू होण्यापूर्वी आणि चालू झाल्यावर हर हर महादेव, जयतु जयतु हिन्दु राष्ट्रम्, जय भवानी जय शिवाजी, कौन चले रे कौन चले, हिंदु राष्ट्र के वीर चले, अशा दिलेल्या चैतन्यदायी घोषणांमुळे संपूर्ण कोल्हापूर परिसर दुमदुमून गेला. या वेळी विविध संप्रदायांतील साधकांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ अशा घोषणा देऊन चैतन्यामध्ये आणखी भर घातली.
दिंडीचे स्वरूप – हिंदू एकता दिंडीचा प्रारंभ मिरजकर तिकटीपासून होऊन गंगावेस येथे सांगता झाली. दिंडीच्या समोर धर्मध्वज, मागे श्री महालक्ष्मीदेवी आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेली विविध फुलांनी सजवलेली चैतन्यदायी पालखी, नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींचे कलश डोक्यावर घेतलेले पथक, स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवणारी स्वरक्षण पथके, बालकक्ष, प्रथमोपचार पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवणारे ‘रणरागिणी’ पथक, टाळ-मृदंग घेतलेले पथक, असे दिंडीचे स्वरूप होते.
समारोपप्रसंगी व्यक्त केलेली मनोगत
१. सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राची मागणी घटनाबाह्य नाही. घटनादुरुस्तीद्वारे जर भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र बनवता येते, तर अशा घटनादुरुस्तीच्या माध्यमातून भारत हे ‘हिंदु राष्ट्र का होऊ शकत नाही ? त्यामुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंना संवैधानिक अधिकार आहे. ‘भगवा आतंकवाद’ नसतांना तो राजकर्त्यांनी निर्माण केला आहे. आपण प्रत्येक जण विचार, कौशल्य, वेळ, शरीर आणि मन यांचे दान देऊन धर्मसंस्थापनेतील वाटा उचलावा, असे आवाहन मी या निमित्ताने करतो.’’
२. हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘हा देश हिंदूंचा असल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला हवी. या दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या दिशेने सर्व जाती एकत्र येत आहेत. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर सतत होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजे.’’
सहभागी – यज्ञ बहुउद्देशीय ट्रस्ट कोल्हापूरचे श्री. राहुल कदम आणि श्री. शुभम् चौगुले
क्षणचित्रे
१. अनेकांनी दिंडीचे स्वतःच्या भ्रमणभाषमधून चित्रीकरण करून छायाचित्रे काढली आणि इतरांनाही पाठवली.
२. खुपीरे येथील धर्मशिक्षणवर्गातील महिला कलश डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या.
३. धनगरी ढोल पथक हे विशेष आकर्षण होते.
४. रेंदाळ येथील धर्मप्रेमी श्री. राकेश शिनगारे हे छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून सहभागी झाले होते.
विशेष घटना
१. ‘हिंदू एकता दिंडी’ची ज्या ठिकाणी सांगता होते, तिथे श्री. दादा जाधव यांचे अन्नछत्राचे कार्यालय आहे. सांगता सभेसाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेला ‘मेगाफोन’ वापरण्यास दिला, तसेच व्यासपीठ उभारणीमध्येही साहाय्य केले. ‘मीपण हिंदुत्वाचे कार्य करतो. तुम्ही जे करत आहात ते आवश्यक आहे’ , असे ते म्हणाले.
२. श्री. दिलीप निगवेकर आणि श्री. अभिजित वागवेकर यांनी दिंडीच्या सांगतेसाठी वक्त्यांसाठी व्यासपीठ सिद्ध करून दिले.
फेरी पाहून समाजातील काही नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया
१. श्री. सोमनाथ पिंगळे – तुमच्या कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना झालीच पाहिजे.
२. सुप्रिया पडवळ – हिंदु धर्माविषयी लोकांच्या मनात आवड निर्माण होऊन पुष्कळ संख्येने सर्व हिंदू एकत्र यावेत.
३. श्री. योगेश औंधकर – आपण जे कार्य करत आहात, ते पाहून पुष्कळ अभिमान वाटतो.
४. न्यू आनंदाश्रम हॉटेल (गंगावेस)- हिंदु राष्ट्र निर्मितीचे कार्य अत्यंत महान आहे आणि संस्थेच्या वतीने केल्या जाणार्या कार्यास मन:पूर्वक शुभेच्छा. अप्रतिम शोभयात्रा !
५. श्री. सूरज कांबळे – दिंडी पाहून छान वाटले. तुमच्या कार्यामध्ये सहभागी व्हायचे आहे.
६. कोमल कुलकर्णी – एवढ्या मोठ्या संख्येने सर्वांना संघटित करणे पुष्कळ मोठे कार्य आहे.