चेन्नई – तमिळनाडूमध्ये हिंदु धर्मातील २ पंथांच्या उपासनेच्या अधिकाराशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करतांना मद्रास उच्च न्यायालयाने सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले. न्यायमूर्ती एस्.एम्. सुब्रह्मण्यम् यांच्या नेतृत्वाखालील खंडपिठाने तमिळनाडूतील श्री वरदराजा पेरुमल मंदिरात मंत्रपठण करण्यावरून हिंदूंच्या वडगलाई आणि थेंगलाई या २ पंथांमधील वादाविषयीच्या खटल्याची सुनावणी करतांना वरील विधान केले. मंदिराच्या कार्यकारी विश्वस्तांनी वडगलाई पंथाला मंत्रपठण करण्याची अनुमती नाकारल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता.
Tolerance is hallmark of Hinduism: Madras High Court allows two different sects to chant recitals in temple
Read full story here: https://t.co/3NV80d0uOL pic.twitter.com/ZyIDq5Tt9C
— Bar & Bench (@barandbench) May 18, 2022
वडगलाई पंथाचे प्रतिनिधित्व करणार्या याचिकाकर्त्यांनी श्री वरदराजा पेरुमल मंदिरात मंत्रपठण करण्याच्या त्यांच्या मूलभूत अधिकराचा दाखला देत मंत्रपठण करण्यास अनुमती देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. प्रतिवादीने युक्तिवाद करतांना सांगितले की, वर्ष १९१५ च्या एका आदेशामध्ये केवळ थेंगलाई पंथाला मंदिरात मंत्रपठण करण्याची अनुमती होती. युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती एस्.एम्. सुब्रह्मण्यम् यांनी निदर्शनास आणून दिले की, सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे आणि दोन्ही पंथांना त्यांच्या श्रद्धा आणि रीतीरिवाजानुसार मंत्रपठण करण्याची अनुमती दिली पाहिजे. वडगलाई आणि थेंगलाई या दोन्ही पंथांना श्री वरदराजा पेरुमल मंदिरात मंत्रपठण करण्याची अनुमती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.