मुंबई – खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखावी, यासाठी राज्य अभियानाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १८ मे या दिवशी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये तक्रारदार श्री. अभिषेक मुरुकटे, अधिवक्ता पूनम हांडे, अधिवक्ता प्रसाद संकपाळ, श्री. जयदीप शेडगे आणि सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर उपस्थित होत्या.
निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या !
१. खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांच्या नोंदणी होणारी ठिकाणे आणि गाड्या सुटणारी ठिकाणे येथे शासनाने निश्चित केलेले दरपत्रक आणि ‘हेल्पलाईन’ क्रमांक लावण्यात यावा.
२. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि मोटार वाहन विभाग यांच्या संकेतस्थळावर ‘हेल्पलाईन’ क्रमांक देण्यात यावा. हा क्रमांक रात्री किमान १२ वाजेपर्यंत चालू असावा.
३. नियमबाह्य तिकीट आकारल्यामुळे खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सवर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि मोटार वाहन विभाग यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा.
४. प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक कारवाई करूनही खासगी ट्रॅव्हल्सकडून पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा झाल्यास भा.दं.वि. कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात यावा.
५. ‘ऑनलाईन ॲप’वर अवैधपणे औषधांची विक्री केल्यास ज्याप्रमाणे गुन्हा नोंदवला जातो, त्याप्रमाणे ‘ऑनलाईन’ भरमसाठ तिकीटदर आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या मालकांवरही गुन्हा नोंदवण्यात यावा.
६. अंधश्रद्धा निर्मूलन, जातपंचायत यांविषयी जसे कायदे सिद्ध करण्यात आले आहेत, त्याच पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा.