पणजी – गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास आगामी पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणणार आहे. पास्टर डॉम्निकला आता जामीन मिळालेला असला, तरी त्याची कसून चौकशी केली जाणार आहे, असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. ‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याला म्हापसा पोलिसांनी अटक केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (पास्टर म्हणजे पाद्री) मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यापूर्वी ‘राज्यात धर्मांतराला थारा दिला जाणार नाही’, असे विधान केले होते.
पास्टर डॉम्निक याच्या विरोधातील कारवाईविषयी मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘पास्टर डॉम्निक याच्यावर धर्मांतर करत असल्याचा आरोप आहे. तो बनावट औषधे देऊन, तसेच जादूटोणा करून लोकांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत होता. तसेच काही वर्षांपूर्वी पास्टर डॉम्निक याच्या ‘फाईव्ह पिलर्स चर्च’मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचीही तक्रार आली आहे. या प्रकरणी पोलीस योग्य प्रकारे अन्वेषण करत आहेत.’’
एखाद्याने स्वेच्छेने काही केले असेल, तर पोलीस काही करू शकणार नाहीत ! – डिलायला लोबो, आमदार, काँग्रेस
गोव्यात धर्मांतर होत असेलही. बलपूर्वक धर्मांतर करणे चुकीचे आहे. (मग अशांवर कारवाई करण्याची मागणी आमदार डिलायला लोबो का करत नाहीत ? – संपादक) या विरोधात कायदा होणे आवश्यक आहे, असे मत शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘अशा प्रकारे किती गोमंतकियांचे धर्मांतर झाले आहे, हे पहावे लागेल; मात्र एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने काही केले असेल, तर त्याला पोलीस काही करू शकणार नाहीत. धर्मांतरासाठी घरी येऊन कुणी कुणाची बुद्धी भ्रष्ट करत असेल, तर ते चुकीचे आहे.’’