मुंबई : बोरीवली येथील साहस संस्थेच्या वतीने ५ ते ८ मे या कालावधीत १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी मालाड (पश्चिम) येथे व्यक्तीमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. अश्विनी पोवार यांनी सुसंस्कारांचे महत्त्व आणि जोपासना या विषयावर मार्गदर्शन केले. सुसंस्कारांची आवश्यकता, संस्कारांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व यांविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थी, पालक यांसह ३३ जिज्ञासूंनी घेतला. साहस संस्थेच्या वतीने श्री. भूषण परब, सौ. अस्मिता इनामदार, रजनी राहुरीकर यांनी पुढाकार घेऊन हे शिबीर आयोजित केले होते. शिबिराला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये शिबिरार्थींना रायफल शुटिंग, स्वसंरक्षण प्रशिक्षण, योग, प्रथमोपचार आदी प्रशिक्षण देण्यात आले. यासह इंटरनेट-एक मायाजाल, सामाजिक सद्यस्थिती-जाणीव आणि जबाबदारी, सकारात्मक जीवनपद्धती – एक कला या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबीरस्थळी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन !
या शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीचे क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. याचा लाभ शिबिराला उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक यांनी घेतला. (विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांची माहिती देऊन त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत करणार्या साहस संघटनेचे अभिनंदन ! याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात