Menu Close

प्रत्येक प्रकरणात किमान १० याचिकाकर्ते असल्याने आमचा न्यायालयीन लढा चालूच रहाणार ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

‘विश्व वेदिक सनातन संघा’कडून अधिवक्ता जैन पिता-पुत्र यांचे वकीलपत्र रहित केल्याचे प्रकरण !

(डावीकडून ) विष्णु शंकर जैन आणि पू. हरि शंकर जैन

नवी देहली – विविध मशिदींच्या विरोधात चालू असलेल्या न्यायालयीन लढ्यांमध्ये केवळ ‘विश्व वेदिक सनातन संघ’ हे याचिकाकर्ता नसून अन्यही अनेक याचिकाकर्ते आहेत. त्यांचे वकीलपत्र आमच्याकडे आहे. प्रत्येक प्रकरणात किमान १० याचिकाकर्ते असल्याने आमचा न्यायालयीन लढा चालूच रहाणार. त्यामुळे आम्ही धर्मासाठीचा हा लढा लढत राहू, अशी माहिती अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली. वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी न्यायालयात लढा देणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि त्यांचे पुत्र विष्णु शंकर जैन यांना या खटल्याचे अधिवक्ता म्हणून हटवण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते असलेले विश्व वेदिक सनातन संघाचे जीतेंद्रसिंह विशेन यांनी दिली. या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ज्ञानवापीच्या संबंधी महत्त्वपूर्ण सुनावणी ८ जुलै या दिवशी होणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार विशेन म्हणाले, ‘आमच्या वतीने देशभरात वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये चालू असलेल्या खटल्यांमधून हरि शंकर जैन आणि विष्णु शंकर जैन यांचे वकीलपत्र रहित करण्यात आल्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.’ जैन पिता-पुत्र यांच्या माध्यमातून लक्ष्मणपुरी येथील टीलेवाली मशीद, धार येथील भोजशाला, ताजमहाल आणि मथुरा येथील शाही ईदगाह मशीद यांच्यासमवेत अनेक ठिकाणच्या मशिदींच्या विरोधात न्यायालयीन लढा दिला जात आहे.

 हिंदूंच्या इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती !

‘विश्व वेदिक सनातन संघाने असा निर्णय घेण्यामागे काय कारण आहे ?’, असे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘हिंदूंनी त्यांच्यातील उणिवांमुळे इतिहासात अनेक चुका केल्या आहेत. त्याचीच ही पुनरावृत्ती आहे.’’

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *