फर्रुखाबाद (उत्तरप्रदेश) – येथील नवाबगंजच्या विद्युत् विभागाच्या कार्यालयात आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे छायाचित्र लावण्यात आले होते. छायाचित्राच्या खाली ‘जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनियर)’ असेही लिहिण्यात आले होते. येथील उपविभागीय अधिकार्यानेच ते लावले होते आणि त्याचे तो समर्थन करत असल्याचेही समोर आले. हे सूत्र वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास येताच हे छायाचित्र काढून टाकण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आला आहे, तसेच व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य अभियंता यांना कारवाईसाठी पत्र पाठवण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
अधिकार्याचे स्वत:च्या कृत्याला संतापजनक समर्थन !
उपविभागीय अधिकारी रवींद्र प्रकाश गौतम यासंदर्भात म्हणाले की, कुणीही कुणालाही आदर्श मानू शकतो. मी मान्य करतो की, ओसामा बिन लादेन जगातील सर्वोत्तम कनिष्ठ अभियंता होता. छायाचित्र काढून टाकण्यात आले असले, तरी ते पुन्हा वापरले जाईल. (अशा उद्दाम अधिकार्यांना बडतर्फच केले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)