Menu Close

देशभरात हिंदूंची एकूण साडेसात लाख मंदिरे !

पुणे जिल्ह्यात देशातील सर्वाधिक १० सहस्र ५० मंदिरे !

संभाजीनगर – एका सर्वेक्षणानुसार देशात एकूण साडेसात लाख हिंदूंची मंदिरे आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सरासरी १ सहस्र ८८६ नागरिकांमागे एक मंदिर आहे. महाराष्ट्रात १ सहस्र ६१२ नागरिकांमागे एकूण ७७ सहस्र २८३ मंदिरे आहेत. गोव्यात ८४७ लोकांमागे एक मंदिर, तमिळनाडूत ९७०, तर कर्नाटकात १ सहस्र ९८ लोकांमागे एक देवालय आहे. ‘मंदिरांचे शहर’ म्हणून हरिद्वार अथवा वाराणसी किंवा दक्षिणेतील काही शहरांचा उल्लेख होत असला, तरी मराठमोळ्या पुणे शहर आणि जिल्ह्यात देशातील सर्वाधिक १० सहस्र ५० मंदिरे असल्याचे आयआयटी, मुंबई येथील एका सवेक्षणातून समोर आले आहे.

देशातील मंदिरांची समग्र माहिती एका ठिकाणी उपलब्ध नाही. मंदिरांची छायाचित्रे, व्हिडिओ, माहात्म्य, दर्शनाच्या वेळा आदी एका ठिकाणी मिळावे, यासाठी ‘आयआयटी’ने येथील विद्यार्थ्यांच्या एका पथकाने जानेवारी २०१९ मध्ये ‘धर्मविकी’ प्रकल्प हाती घेतला. संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक गणेश रामाकृष्णन् यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष माहेश्वरी, अरुण जयरामाकृष्णन्, प्रा. साकेत नाथ आणि प्रा. रवी पूविया हे या प्रकल्पावर काम करत आहेत. देशभरातून २ सहस्र स्वयंसेवक हे या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत.

मंदिरांची संख्या अजून मोठी आहे !

देशातील मंदिरांची माहिती संकलित करण्यासाठी लोकसहभागाने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यास तंत्रज्ञानाचे बळ मिळाल्याने माहितीचे संकलन सोपे झाले. अजूनही मोठ्या प्रमाणात माहिती येत आहे. आता ७.५ लाख मंदिरे दिसत असली, तरी ही संख्या कितीतरी मोठी असू शकते !

– आयुष माहेश्वरी, सदस्य, ‘धर्मविकी’ प्रकल्प, आयआयटी मुंबई

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *