Menu Close

ज्ञानवापीचे ठीक आहे; पण प्रत्येकच मशिदीत शिवलिंग का पहावे ? – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपूर – श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनानंतर अयोध्येत श्रीराममंदिर साकारले जात आहे. एक स्वप्नपूर्ती झाली आहे. त्यानंतर संघ कोणत्याही आंदोलनात उतरलेला नाही. आता ज्ञानवापीचे सूत्र समोर आले आहे. काही ठिकाणांविषयी आमची वेगळी श्रद्धा होती आणि आम्ही त्याविषयी चर्चा केली; पण प्रतिदिन नवे सूत्र आणू नये. ज्ञानवापीविषयी आमची श्रद्धा परंपरेतून चालत आली आहे; मात्र आता प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पहावे ?, असा प्रश्‍न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थित केला. २ जून या दिवशी येथील रेशीमबाग मैदानात आयोजित संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. भागवत पुढे म्हणाले की,

१. ज्ञानवापी हे आस्थेशी निगडित सूत्र आहे. हा इतिहास आहे. तो आम्ही पालटू शकत नाही. तो ना आजच्या हिंदूंनी बनवला, ना आजच्या मुसलमानांनी.

२. इस्लाम बाहेरून आक्रमणकर्त्यांसमवेत आला. त्या आक्रमणांमध्ये भारत स्वतंत्र होण्याची इच्छा असणार्‍यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी देवस्थानांची तोडफोड करण्यात आली.

३. ज्ञानवापीविषयी दोन्ही पक्षांनी समन्वय, सुसंवाद आणि सामंजस्य यांद्वारे मार्ग काढायला हवा होता; पण काहींनी पटत नाही आणि ते न्यायालयात धाव घेतात. मग निदान न्यायालयाच्या निकालाचा आदर आणि पालन तरी करायला हवे.

४. राज्यघटनेवर आधारित न्यायालयाच्या निर्णयावरही अनुचित टीका व्हायला नको. हिंदू मुसलमानांच्या विरोधात विचार करत नाहीत. आमचा कुणाच्याही पूजेला विरोध नाही.

५. आपल्या देशात यहुदी आणि पारसी या शरणार्थींच्या उपासना आल्या. आक्रमक मुसलमानांची उपासना आली. आपले नाते मुसलमान आक्रमकांशी नाही, तर येथील मुसलमानांशी आहे. भारताबाहेरून आक्रमण केलेले मूळ आक्रमक सोडून धर्मांतरित मुसलमानांचे पूर्वज हिंदु होते, हे लक्षात घेतले पाहिजे. हसन खाँ मेवाती आणि अशफाकउल्ला खान यांनी देशासाठी बलीदान दिले, हे आम्ही विसरू शकत नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *