सांगली – असंख्य आघात, घाव सहन करणाऱ्या भारतमातेचे मनोगत व्यक्त करून अखंड हिंदु राष्ट्राचे कार्य पूर्णत्वास नेण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. या देशात १ घटना, १ देव, १ विधान असणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने अधिवेशनात गटचर्चा, भाषण, तसेच दिशादर्शन व्हावे. मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास या अधिवेशनाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रसारित व्हावा. गोवा येथे होणारे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यशस्वी होणारच आहे आणि त्यासाठी मी प्रार्थनाही करत आहे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ ते १८ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे त्यांना निमंत्रण देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने, कु. प्रतिभा तावरे, श्री. संतोष देसाई उपस्थित होते. पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘अल्पसंख्य-बहुसंख्य अशा प्रकारची भाषा बंद होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाचा प्रसार झाल्याविना हिंदु राष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी अधिवेशनस्थळी ‘कामधेनूची शक्ती’, तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘शिवचरित्र’ उपलब्ध व्हावे.’’
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे ‘सनातन प्रभात’विषयी गौरवोद्गार !दैनिक ‘सनातन प्रभात’ हे प्रत्येक राज्यात, प्रत्येक घरात जायला हवे. संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदासस्वामी, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचे जे उद्दिष्ट होते, तेच कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’ करत आहे, असे गौरवोद्गार पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढले. |