संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्यांचे प्रशासनाला निर्देश !
जळगाव– येथील पेशवेकालीन आणि ऐतिहासिक पारोळा गडाची अत्यंत दुरवस्था झाली होती. ही दयनीय अवस्था दूर करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील २ वर्षांपासून सातत्याने स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत होती. समितीच्या कृतीशीलतेची नोंद घेऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ७ जून या दिवशी पारोळा गडाच्या संवर्धनासाठी एक बैठक बोलावली. त्यात गडाचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाला कृती आरखडा सिद्ध करण्याचे, तसेच तेथे अस्वच्छता अन् गैरकृत्य करणार्यांवर गुन्हे नोंदवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी प्रशासकीय अधिकार्यांना दिले आहेत. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे जळगावचे समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, समितीच्या कु. रागेश्री देशपांडे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार अनिल गवांदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयश्री भगत, गड संवर्धक डॉ. अभय रावते आदी उपस्थित होते.
१. हिंदु जनजागृती समितीने मागणी केल्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी राऊत यांनी गडाची डागडुजी करून भिंतीवर उगवलेली झाडे काढणे, गडाची आतून, तसेच परिसराची स्वच्छता करणे, सांडपाणी जाण्यासाठी गटाराची व्यवस्था करणे, किल्ल्यावर मद्यपान, जुगार आदी अवैध धंदे करणार्यांवर गुन्हे नोंदवणे आदी महत्त्वाच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
२. लघवी-शौच करून गडाचा परिसर अस्वच्छ करण्याला प्रतिबंध करण्यास सांगितले आहे.
३. समितीच्या मागण्यांची तत्परतेने नोंद घेऊन पुढील कार्यवाही केल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्यांचे अभिनंदन केले आहे.
४. गडाची दुरवस्था लक्षात आल्यावर समितीने राज्य पुरातत्व विभागाकडून माहितीच्या अधिकाराखाली गडाची डागडुजी आणि संवर्धन यांसाठी केलेल्या कामांचा तपशील मागितला होता. जून २०२१ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गडाच्या संवर्धनाची मागणीही केली होती. शिवसेनेचे स्थानिक आमदार चिमणराव पाटील यांसह काही दिवसांपूर्वी समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांचीही भेट घेतली होती. त्याला जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘आता प्रशासनाने जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे तत्परतेने कार्यवाही करून गडाचे जतन आणि संवर्धन यांचे कामही वेळेत करावे’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
५. समितीच्या गडदुर्ग संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत मागील २ वर्षांपासून गडाच्या दुरवस्थेविषयी सातत्याने पाठपुरावा करून त्याचे संवर्धन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. समितीकडून करण्यात येणारा पाठपुरावा आणि आमदार चिमणराव पाटील यांचे सहकार्य यांची नोंद जिल्हाधिकार्यांकडून घेण्यात आली आहे.‘ त्यामुळे गडाच्या संवर्धनाचे काम जलद गतीने चालू होईल’, अशी अपेक्षा समितीने केली आहे.
गडाची झालेली दुरवस्था !गडाच्या अनेक भागांची पडझड झाली आहे. तेथील भिंतींवर झाडे आणि वेली उगवल्या आहेत. काही नागरिक गडाचा वापर शौचालय आणि मुतारी म्हणून करत आहेत. गडाच्या परिसरात मद्य पिणे, जुगार आदी अपप्रकार उघडपणे चालू आहेत. गडाच्या आवाराचा उपयोग कचरा टाकण्यासाठी केला जातो. परिसरात चिखल, तसेच घाण यांचे साम्राज्य आहे. अस्वच्छतेमुळे परिसरात डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. गडाच्या बाजूला असलेल्या खंदकामध्ये साठलेल्या पाण्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा मोठ्या प्रमाणात आहे. अशा प्रकारे या ऐतिहासिक किल्ल्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. |