Menu Close

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी संतांकडून देवतांच्या चरणी प्रार्थना !

फोंडा (गोवा) – येथील रामनाथ देवस्थानातील विद्याधिराज सभागृह येथे १२ जून या दिवशी ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’स आरंभ होत आहे. हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी ८ जून या दिवशी कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी अन् रामनाथी येथील श्री देव रामनाथ यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली.

श्री शांतादुर्गादेवी

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी कवळे श्री शांतादुर्गा देवस्थानात देवीच्या चरणी श्रीफळ आणि हार आदी अर्पण करून देवीच्या चरणी प्रार्थना केली, तर समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी श्री देव रामनाथच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रार्थना केली. या वेळी श्री. प्रकाश नाईक आणि श्री. संगम बोरकर हेही उपस्थित होते.

श्री देव रामनाथ

क्षणचित्रे

१. श्री शांतादुर्गा आणि श्री रामनाथ देवस्थान येथील पुजाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनातील विघ्ने दूर व्हावीत. हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर व्हावी. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभो’, अशी प्रार्थना देवतांच्या चरणी केली.

२. श्री रामनाथ देवस्थानात संत करत असलेली प्रार्थना ऐकून गोवा दर्शनासाठी आलेले भाविक श्री. शिरगावकर यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतले. त्यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्या चरणांवर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला, तसेच त्यांच्या ५ वर्षांच्या मुलालाही त्यांनी संतांना नमस्कार करण्यास सांगितले.

श्री शांतादुर्गा आणि श्री देव रामनाथ मंदिरांत श्रीफळ ठेवण्यासाठी गेल्यानंतर मिळालेले शुभसंकेत !

१. ‘मंदिरांत जाण्यासाठी निघाल्यानंतर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे निवासाच्या ठिकाणाहून निघून वाहनात बसेपर्यंत पाऊस पडला. या वेळी ‘वरुणदेवतेने अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद दिला’, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना जाणवले.

२. श्री शांतादुर्गा देवस्थानात एरव्ही मंदिरात देवीची उत्सवमूर्ती असते. अधिवेशनासाठी प्रार्थना करण्यासाठी गेल्यावर तेथे देवीची मूळ मूर्ती होती. देवाच्या कृपेने देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन झाले.

३. श्री शांतादुर्गा देवस्थानात प्रार्थना करण्यासाठी गेल्यावर परिसरातील श्री सिद्धिविनायक आणि श्री लक्ष्मीनारायण या मंदिरांतही पूजा चालू होती. पुजारी दोन्ही मंदिरांतील देवतांना पुष्प अर्पण करत होते. याद्वारे ‘अधिवेशनाला श्री सिद्धिविनायक आणि श्री लक्ष्मीनारायण या दोन्ही देवतांचेही आशीर्वाद मिळाले’, असे आम्हाला जाणवले.

४. श्री रामनाथ देवस्थानात श्रीफळ अर्पण करण्यासाठी गेल्यावर तेथे मंदिर परिसरात १०० सुवासिनी कुंकूमार्चन करत होत्या. ‘याद्वारे अधिवेशनाला देवीचेही आशीर्वाद मिळाले’, असे आम्हाला जाणवले.

५. संतद्वयी श्री रामनाथ देवस्थानात प्रार्थना करत असतांना मंदिरात वाद्यवादन चालू होऊन वातावरण उत्साही झाले होते.’

– श्री. संगम बोरकर, ढवळी, फोंडा.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *