सांगली जिल्ह्यात शिवजयंती पुष्कळ उत्साहात साजरी !
सांगली : देव, देश, धर्म, संस्कृती यांना मानणारी तरुण पिढी घडवायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या मार्गानेच जावे लागेल. देशाच्या आतील आणि बाहेरील शत्रूला नेस्तनाबूत करायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे बीजमंत्रच हिंदुस्थाला तारू शकतात, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. येथील विश्रामबाग चौकात शिवसेनेचे सांगली उपशहर प्रमुख श्री. नितीन काळे यांच्या पुढाकाराने आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, सर्वश्री अजिंक्य पाटील, पै. पृथ्वीराज पवार, प्रसाद रिसवडे, सचिन काळे, अमित कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.
शिवजयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यात सर्वत्र अपार उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. चौकाचौकांत शिवछत्रपतींची प्रतिमा, सर्वत्र डौलाने फडकणारे भगवे ध्वज, भगवे फेटे घातलेले युवक, उत्स्फूर्तपणे निघणार्या दुचाकी वाहनफेर्या, पोवाडे, भगव्या पताका यांमुळे जिल्हा हिंदुत्वमय झाला होता. सांगली शहरात शहर आणि आजूबाजूच्या गावांतील तरुण मंडळांचे कार्यकर्ते शिवतीर्थावर येऊन ज्वाला प्रज्वलित करून दौड काढून आपापल्या गावात जात होते. सकाळी श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस मंत्रघोषांमध्ये अभिषेक करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात