Menu Close

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्‍टाचार करणार्‍यांवर तात्‍काळ गुन्‍हे नोंदवा ! – अधिवक्‍ता (पू.) सुरेश कुलकर्णी, संस्‍थापक सदस्‍य, हिंदु विधीज्ञ परिषद

‘धर्मरक्षणासाठी कायदेशीर लढ्याची दिशा’ याविषयी अधिक्‍त्‍यांचे उपस्‍थितांना मार्गदर्शन !

अधिवक्‍ता (पू.) सुरेश कुलकर्णी, संस्‍थापक सदस्‍य, हिंदु विधीज्ञ परिषद

रामनाथी : महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी मानल्‍या जाणार्‍या श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्‍टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी यांच्‍यावर ‘सीआयडी’च्‍या अहवालानुसार तातडीने गुन्‍हे प्रविष्‍ट करून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्‍थापक सदस्‍य आणि मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता (पू.) सुरेश कुलकर्णी यांनी केली. दशम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनामध्‍ये ‘धर्मरक्षणासाठी कायदेशीर संघर्षाची दिशा’ या सत्रात उपस्‍थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर जळगाव (महाराष्‍ट्र) येथील वरिष्‍ठ अधिवक्‍ता सुशील अत्रे, हिंदू विधीज्ञ परिषदेचे संघटक अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर हे उपस्‍थित होते. या प्रकरणात अधिवक्‍ता (पू.) कुलकर्णी यांनी स्‍वत: मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका केली आहे.

या वेळी अधिवक्‍ता (पू.) सुरेश कुलकर्णी म्‍हणाले, ‘‘शासनाच्‍या नियंत्रणात असलेल्‍या श्री तुळजाभवानी मंदिरात वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत दानपेटीच्‍या लिलावात ८ कोटी ४५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांच्‍या संगनमताने झाला. याविषयीचा अहवाल २० सप्‍टेंबर २०१७ या दिवशी गृह विभागाला सादर केला; परंतु ५ वर्षे झाली, तरी अद्याप दोषींवर कारवाई झालेली नाही. हेच काय, तर हा अहवाल विधीमंडळात वा बाहेर सार्वजनिकही करण्‍यात आलेला नाही. सरकारने दोषींना पाठीशी न घालता दोषींवर तात्‍काळ गुन्‍हे प्रविष्‍ट करावे.’’

हिंदु मंदिरांचे प्राचीन वैभव टिकवण्‍यासाठी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी प्रयत्न करणे आवश्‍यक  ! – अधिवक्‍ता सुशील अत्रे, ज्‍येष्‍ठ अधिवक्‍ता, जळगाव

अधिवक्‍ता सुशील अत्रे, ज्‍येष्‍ठ अधिवक्‍ता, जळगाव

‘हंपी : उद़्‍ध्‍वस्‍त मंदिरांच्‍या शहराच्‍या पुनर्निर्माणाची योजना’ या विषयावर बोलतांना जळगाव येथील अधिवक्‍ता सुशील अत्रे म्‍हणाले, ‘‘भारतासाठी हिंदु राष्‍ट्र ही संकल्‍पना नवीन नाही. यापूर्वी अनेक हिंदु साम्राज्‍ये येथे होऊन गेली आहेत. त्‍यातीलच एक ‘विजयनगर’चे साम्राज्‍य ! या विजयनगर साम्राज्‍य हे सार्वभौम आणि बलशाली होते. आपल्‍या ऋषिमुनींनी अशा प्रकारच्‍या हिंदु साम्राज्‍याचा संकल्‍प आधीपासूनच केलेला आहे; मात्र हिंदूंच्‍या अनास्‍थेमुळे ते वैभव आपण टिकवून ठेऊ शकलो नाही. हा दोष हिंदूंचा आहे. विजयनगर साम्राज्‍यातील तत्‍कालीन राजांनी त्‍यातही विशेष करून कृष्‍णदेवराय यांनी अनेक मंदिरांची उभारणी केली आहे. ऐतिहासिक दाखल्‍यांनुसार वैभवशाली अशी ३०० हून अधिक बंदरे या साम्राज्‍यात होती. त्‍यातून मिळणार्‍या उत्‍पन्‍नाचा मोठा वाटा मंदिरांच्‍या उभारणीवर व्‍यय केला; परंतु आज या मंदिरांची अत्‍यंत दयनीय स्‍थिती आहे. ही मंदिरे आज केंद्रीय पुरातत्‍व विभागाच्‍या अखत्‍यारीत आहेत; पण या विभागाच्‍या कमालीच्‍या उदासीनतेमुळे आणि अनास्‍थेमुळे मंदिरांमध्‍ये काहीही सुधारणा दिसून येत नाही. या मंदिरांचे पुनर्निर्माण करायचे असेल, तर प्रस्‍थापित हिंदुविरोधी कायद्यांत पालट करावा लागेल. आधुनिक पद्धतीने मंदिरांची उभारणी न करता त्‍याचे मूळ रूप तसेच टिकून रहाण्‍यासाठी तज्ञ हिंदुत्‍वनिष्‍ठांनी भविष्‍यात योगदान देण्‍याची सिद्धता ठेवावी.’’

पोलिसांनी अनधिकृत भोंग्‍यांवर कारवाई करण्‍यास टाळाटाळ केली, तर न्‍यायालयात तक्रार करा ! – अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर, संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर, संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद

‘धार्मिक कारणामुळे अन्‍यांना त्रास होत असेल, तर ते राज्‍यघटनेने दिलेल्‍या धार्मिक अधिकारांचे भंजन आहे’, असे सर्वोच्‍च न्‍यायालयाने धार्मिक स्‍थळांवरील भोंग्‍यांविषयी दिलेल्‍या निर्णयात नमूद केले आहे. राज्‍यघटनेने प्रत्‍येकाला जगण्‍याचा अधिकार दिला आहे. आपल्‍या परिसरात अवैध भोंग्‍यांमुळे त्रास होत असल्‍यास त्‍या विरोधात पोलिसांत तक्रार करा. हिंदूंच्‍या उत्‍सवाच्‍या वेळी पोलीस हिंदूंना तत्‍परतेने नोटीस देतात; परंतु हेच पोलीस वर्षभर लागणार्‍या भोंग्‍यांच्‍या विरोधात तक्रार करूनही कारवाई करत नाहीत. त्‍यामुळे पोलिसांनी अशा प्रकरणांत कारवाई केली नाही, तर त्‍या विरोधात न्‍यायालयात तक्रार करा.

अधिवेशनाच्या या सत्राची झलक

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *