Menu Close

‘… तर भारतीय संस्‍कृतीचे उत्तराधिकारी कोण ?’, याचा हिंदूंनी विचार करावा ! – एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात ‘मंदिरांच्‍या सरकारीकरणाला विरोध का ?’ या विषयावर विचारमंथन !

रामनाथी : देश धर्मनिरपेक्ष असलेल्‍यामुळे हिंदूंच्‍या या प्राचीन ग्रंथांचे शिक्षण शाळांमधून दिले जात नाही. शाळेत ना भगवद़्‍गीता शिकवली जाते, ना वेदांचे अध्‍ययन केले जाते. हिंदूंच्‍या या महान संस्‍कृतीचा प्रसार झाला नाही, तर हिंदु धर्माचा प्रचार कसा होणार ? हिंदु धर्माचा प्रसार झाला नाही, तर भारतीय संस्‍कृतीचे उत्तराधिकारी कोण ?, याचा विचार हिंदूंनी विचार करावा, असे आवाहन केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाचे माजी प्रभारी महासंचालक एम्. नागेश्‍वर राव यांनी केले. दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात १३ जून या दिवशी ‘मंदिरांच्‍या सरकारीकरणाला विरोध का ?’ या विषयावरील उद़्‍बोधनाच्‍या दुसर्‍या सत्रात ‘सांस्‍कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, तसेच संस्‍कृतीपासून हिंदूंना विभाजित करण्‍याचे षड्‍यंत्र’ या विषयावर ते बोलत होते.

एम्. नागेश्‍वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

या वेळी व्‍यासपिठावर कल्‍याण (जिल्‍हा ठाणे) येथील ‘सद़्‍गुरु श्री स्‍वामी समर्थ सेवा ट्रस्‍ट’चे संस्‍थापक सद़्‍गुरु श्री नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक) महाराज, बेंगळुरू (कर्नाटक) येथील युवा ब्रिगेडचे संस्‍थापक श्री. चक्रवर्ती सुलीबेले, भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील भारत रक्षा मंचाचे राष्‍ट्रीय महामंत्री श्री. अनिल धीर, मुंबई येथील निरामय रुग्‍णालयाचे संचालक डॉ. अमित थडानी हे उपस्‍थित होते. या सत्राच्‍या वेळी सद़्‍गुरु नवनीतानंद महाराज यांचे स्‍वागत हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्‍वयक श्री. सागर चोपदार यांनी केले.

या वेळी एम्. नागेश्‍वर राव पुढे म्‍हणाले,

१. विश्‍वात ‘ऋग्‍वेद’ हा सर्वांत पुरातन ग्रंथ आहे. हा ग्रंथ हिंदूंचा आहे. १ लाख श्‍लोक असलेला जगातील सर्वांत मोठा ‘महाभारत’ हा ग्रंथही हिंदूंचाच आहे. हे आपले धार्मिक वाङ्‍मय आहे. देश धर्मनिरपेक्ष असल्‍यामुळे हे धार्मिक ग्रंथ बाजूला सारण्‍यात आले आहेत.

२. हिंदु संस्‍कृतीचे रक्षण करण्‍यासाठी कोणतेही मंत्रालय नाही; परंतु अल्‍पसंख्‍यांकांच्‍या हिताच्‍या रक्षणासाठी अल्‍पसंख्‍यांक विभाग आहे.

३. देशात २२ भाषांना राष्‍ट्रीय भाषेचा दर्जा देण्‍यात आला आहे. असे असतांना उर्दू भाषेच्‍या उत्‍कर्षासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न चालू आहेत; मग संस्‍कृतला द्वितीय राष्‍ट्र भाषेचा दर्जा देण्‍यात काय अडचण आहे ?

४. हिंदी चित्रपटसृष्‍टीमध्‍ये ‘उर्दू’ भाषेला प्रोत्‍साहन दिले जात आहे. उर्दूमुळे हिंदी भाषा मृत होत आहे. सद्यःस्‍थितीत हिंदी भाषेत बहुसंख्‍य उर्दू शब्‍द वापरले जात आहे. आपण स्‍वत: शुद्ध हिंदीमध्‍ये बोललो नाही, तर अन्‍य कुणी हे करणार नाही. त्‍यामुळे आपणच प्रथम शुद्ध हिंदी बोलले पाहिजे.’’

या वेळी उपस्‍थित अन्‍य मान्‍यवरांनी व्‍यक्‍त केलेले विचार

उद्ध्वस्त झालेल्या पुरातन मंदिरांचे पुनर्निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – श्री. चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड, बंगळुरू, कर्नाटक

श्री. चक्रवती सुलीबेले, संस्‍थापक, युवा ब्रिगेड, बंगळुरू, कर्नाटक

ख्रिस्‍त्‍यांनी धर्मांतर करून हिंदूंना मंदिरात जाण्‍यापासून रोखले, तसेच मंदिरात जाण्‍याविषयीची हिंदूंची मानसिकताही ख्रिस्‍त्‍यांनीच उद़्‍ध्‍वस्‍त केली. यामध्‍ये काही हिंदूंचाही समावेश आहे. पुरातन मंदिरांकडे कुणी पहात नाही. उद़्‍ध्‍वस्‍त झालेल्‍या पुरातन मंदिरांचे पुनर्निर्माण करण्‍यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

सरकारच्‍या कह्यात अनेक मंदिरे असल्‍याने ती परत घ्‍यायची असतील, तर सरकारशी लढून मंदिरे परत घ्‍यावी लागतील. यासाठी युवा शक्‍ती जर योग्‍य पद्धतीने वापरली, तर रज-तमाकडून सत्त्वगुणाकडे वाटचाल करू शकतोे’’, असे प्रतिपादन बंगळुरू येथील युवा ब्रिगेडचे संस्‍थापक श्री. चक्रवर्ती सुलीबेले यांनी येथे केले. ‘मंदिरांची पवित्रता आणि रक्षणाच्‍या दृष्‍टीने अभिनव उपक्रम : मंदिराची स्‍वच्‍छता’ या विषयावर ते बोलत होते.

श्री. चक्रवर्ती सुलीबेले पुढे म्‍हणाले की,

१. ५००-६०० वर्षांपूर्वीच्‍या पुरातन मंदिरांच्‍या ठिकाणी तलाव आहेत; मात्र त्‍यात कचरा आणि घाण टाकून लोकांनीच ते तलाव खराब केले आहेत. त्‍यामुळे बंगळुरू येथील युवा ब्रिगेडच्‍या वतीने आम्‍ही हे २०० वर्षां पूर्वीच्या मंदिरांच्‍या तलावांची स्‍वच्‍छ करण्‍याची मोहीम राबवली.

२. प्रतिदिन १० ते १५ कार्यकर्ते २ घंटे आणि रविवारी ५०-६० लोकांना घेऊन रायचूर आणि गदग येथील तलावांची स्‍वच्‍छता केली. त्‍यानंतर ६ आठवड्यांनी पूर्वीसारखे तलाव स्‍वच्‍छ झाले. तेथे आम्‍ही दिवाळीप्रमाणे दिवे लावून आनंद साजरा केला.

३. म्‍हैसूर येथील श्री वेणुगोपाल स्‍वामी मंदिर येथे तलावाची स्‍वच्‍छता केली. तेथे आता प्रतिदिन पूजा केली जाते. वार्षिक उत्‍सव होतो, तसेच यात्रा भरते. श्रीकृष्‍णाचे भजन म्‍हटले जाते. अशाच प्रकारे आम्‍ही तेथील श्रीकृष्‍ण मंदिर पुनर्जीवित केले आहे. कर्नाटकातील ८-१० मंदिरे आम्‍ही पुनर्जीवित केली आहेत.

४. आम्‍ही संतांना विनंती केली की, तुम्‍ही आम्‍हाला मार्गदर्शन करा. आम्‍ही त्‍याद्वारे मार्गक्रमण करू. आम्‍ही कर्नाटकातील ७० संतांची एक परिषद आयोजित केली. त्‍यामध्‍ये तेथे लव्‍ह जिहाद आणि मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार यांविषयी चर्चा झाली.

तलावात पाणी देण्‍यास प्रशासनाने नकार दिला; पण देवाने पावसाच्‍या रूपाने तलावाला पाणी दिले !

श्री. चक्रवती सुलीबेले म्‍हणाले, ‘‘युवा ब्रिगेडच्‍या वतीने तलावांची स्‍वच्‍छता केल्‍यानंतर आम्‍ही प्रशासकीय अधिकार्‍यांना भेटून तलावात शुद्ध पाणी सोडण्‍याची मागणी केली; मात्र प्रशासनाने पाणी देण्‍यास नकार दिला. त्‍यानंतर त्‍याचदिवशी तलावाच्‍या ठिकाणी मोठा पाऊस पडला. त्‍यामुळे आपोआपच तलावात पाणी आले. येथे प्रशासनाने आमचा हात सोडला; मात्र देवाने आमचे हात सोडले नाहीत.’’

धार्मिक लढ्यासमवेत कायदेशीर लढाई लढण्‍यासाठी हिंदूंनी सज्‍ज राहिले पाहिजे ! – सद़्‍गुरु श्री नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक) महाराज, संस्‍थापक अध्‍यक्ष, सद़्‍गुरु श्री स्‍वामी समर्थ सेवा ट्रस्‍ट, कल्‍याण (जिल्‍हा ठाणे)

सद़्‍गुरु श्री नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक) महाराज, संस्‍थापक अध्‍यक्ष, सद़्‍गुरु श्री स्‍वामी समर्थ सेवा ट्रस्‍ट, कल्‍याण (जिल्‍हा ठाणे)

‘‘इस्‍लामीकरण करण्‍यासाठी मुसलमान त्‍यांची संख्‍या वाढवून देशाचे तुकडे करत आहेत, तर ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी केरळ, आसाम आदी सीमा देशाकडून तोडण्‍याचा घाट घातला आहे. त्‍यामुळे हिंदूंवरील अत्‍याचार आणि त्‍यांच्‍या समस्‍यांच्‍या विरोधात लढण्‍यासाठी प्रत्‍येक राज्‍यात कृती करणारे संत आणि महंत यांना संघटित करायला हवे. असे केल्‍याने सर्व राज्‍ये एकत्रित येतील. त्‍याद्वारे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करता येईल. असे केल्‍यावर हिंदु धर्म अखिल विश्‍वात नेऊन पोचवू शकतो. ज्ञानवापी मशिदीचा लढा चालू आहे. अनेक ठिकाणी धार्मिक लढाई चालू आहे. त्‍यामुळे धार्मिक लढ्यासमवेत कायदेशीर लढाई लढली पाहिजे’’, असे मार्गदर्शन कल्‍याण (जिल्‍हा ठाणे) येथील सद़्‍गुरु श्री स्‍वामी समर्थ सेवा ट्रस्‍टचे संस्‍थापक अध्‍यक्ष सद़्‍गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य श्री. मोडक) महाराज यांनी येथे केले.

सद़्‍गुरु श्री नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक) महाराज पुढे म्‍हणाले की,

१. कल्‍याण येथील मलंगगडावर मच्‍छिंद्रनाथाची समाधी आहे. तेथे केवळ केळकर पुजारी आणि एक वयोवृद्ध महिला पूजा पाठ करण्‍यासाठी रहात होते. मलंगगडावर हिंदूंचे जाणे येणे अल्‍प होते. हे पाहून मुसलमांनी त्‍यावर अतिक्रमण करण्‍याचा प्रयत्न केला.

२. अन्‍य जिल्‍ह्यांत तडीपारीची शिक्षा झालेले मुसलमान तेथे लपून राहू लागले. नंतर मुसलमानांनी तेथे नमाज पढायला प्रारंभ केला. हळूहळू तेथे मुसलमान समाजाची वर्दळ वाढू लागली.

३. त्‍यानंतर मी या विरोधात न्‍यायालयात पुराव्‍यांसह खटला प्रविष्‍ट केला. बरीच वर्षे न्‍यायालयात हा खटला चालू आहे. आपल्‍या बाजूने पुरावे असतांनाही सरकारच्‍या निष्‍क्रीयतेमुळे हा निकाल लागला नाही.

४. मुसलमानांनी गडावरील अनेक स्‍थाने कह्यात घेतली आहेत. मी काही भक्‍तांसमवेत मलंगगडावर जाणे-येणे चालू केले. त्‍यानंतर भगवा ध्‍वज आणि टाळ घेऊन आत घुसलो. त्‍या वेळी बरेच मुसलमान आमच्‍यामागे आले. त्‍यांनी माझ्‍याशी धक्‍काबुक्‍की केली. तरीही मी त्‍यांना न जुमानता आरती करून पूजा केली. अशा पद्धतीने हिंदूंनी धर्मांधांना न घाबरता त्‍यांच्‍या विरोधात लढले पाहिजे.

५. धार्मिक स्‍थळे टिकवण्‍याची आणि वाढवण्‍याची वेळ आली आहे.

६. मी मठांची स्‍थापना करून धर्माचे शिक्षण देत आहे. याद्वारे आम्‍ही देव, धर्म आणि देश यांचे शिक्षण देऊन जनजागृती करत आहोत. मठात धार्मिक ग्रंथ वाचन, संस्‍कृती वेद, पूजा-पाठ आणि देशाविषयी अभिमान यांविषयी सांगितले जाते. मठात धर्माविषयी जनजागृती केली जात आहे. लहान मुलांना धर्माप्रमाणे वाढदिवस आणि सण साजरे करण्‍यास सांगितल्‍यावर ती मुले आई-वडिलांनाही तशी धार्मिक कृती करायला सांगत आहेत. आपल्‍या घरापासून याचा प्रारंभ झाला पाहिजे. प्रत्‍येक घर गुरुकुल बनले पाहिजे.

पुरी येथील हिंदूंची शेकडो प्राचीन मंदिरे नष्‍ट केली जात आहेत ! – अनिल धीर, राष्‍ट्रीय महामंत्री, भारत रक्षा मंच, भुवनेश्‍वर, ओडिशा

अनिल धीर, राष्‍ट्रीय महामंत्री, भारत रक्षा मंच, भुवनेश्‍वर, ओडिशा

पुरी येथील श्री जगन्‍नाथ मंदिर हे हिंदूंचे प्राचीन मंदिर आहे. येथे शंकराचार्याचे पिठही आहे. येथील राज्‍य सरकारने पुरी येथील श्री जगन्‍नाथ मंदिर आणि भुवनेश्‍वर मंदिर यांच्‍या जीर्णोद्धाराचा आराखडा सिद्ध केला आहे. यासाठी ६००-७०० वर्षांपूर्वीचे मठ तोडण्‍यात येणार आहेत. अशा प्राचीन २२ मठांची सूची सरकारने सिद्ध केली आहे. हे सर्व मठ कोणत्‍या ना कोणत्‍या सेवेसाठी श्री जगन्‍नाथाच्‍या मंदिराशी जोडलेले आहेत. या मठांमध्‍ये पंजाबी मठ, नंगू मठ, नानक मठ, नागा साधूंचे मठ अशा प्राचीन मठांचा समावेश आहे. मठ तोडण्‍याला विरोध झाल्‍यावर सरकारने हिंदूंचे विचार परिवर्तन करण्‍यासाठी प्रयत्न केले. त्‍यानंतर हिंदूंना संभ्रमित करण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला. विकास आराखड्यात येणार्‍या घरांच्‍या किमतीपेक्षा कितीतरी पटीने पैसे देऊन जागा विकत घेण्‍यात आल्‍या. विकासकामांसाठी उत्‍खनन करतांना जगन्‍नाथ मंदिराच्‍या बाजूची भूमीही खणण्‍यात आली. यामुळे मंदिराला धोका निर्माण झाल्‍यामुळे आम्‍ही उच्‍च न्‍यायालयात याचिका केली आहे. प्राचीन मंदिराच्‍या ठिकाणी उत्‍खनन करण्‍यापूर्वी तंत्रज्ञानाचा उपयोग करून भूमीखाली काय आहे, हे पहावे लागते. यामध्‍ये भूमीखाली मंदिरांचे प्राचीन अवशेष असल्‍याचे आढळून आले; परंतु याचा अहवाल दडपण्‍यात आला. ओडिशामध्‍ये ७८ मंदिरे भारतीय पुरातत्‍व, तर २१८ मंदिरे राज्‍य पुरातत्‍व विभागाच्‍या अखत्‍यारीत आहेत, तर १ मंदिर केंद्रीय पुरातत्‍व विभागाच्‍या अखत्‍यारीत आहे. १३ वर्षांच्‍या संशोधनात ओडिशातील ७ सहस्र मंदिरांची मी नोंद केली. ही सर्व मंदिरे ३०० वर्षांपूर्वीची आहेत. ही सर्व प्राचीन मंदिरे नष्‍ट करण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे, अशी खंत ‘भारत रक्षा मंच’चे राष्‍ट्रीय महामंत्री श्री. अनिल धीर यांनी व्‍यक्‍त केली. ते ‘ओडिशातील मंदिरांची दुर्दशा आणि सरकारची भूमिका’ या विषयावर बोलत होते.

अधिवेशनाच्या या सत्राची झलक

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *