दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात आग्रही मागणी
रामनाथी : महाराष्ट्रातील अनेक संस्थांना मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरांकडून लक्षावधी रुपये मिळतात. यामध्ये सर्व पक्षांतील राजकीय नेत्यांचा समावेश आहे. राजकीय नेत्यांनी मंदिराचे पैसे का घेतले ? हे पैसे ते कधी परत करणार आहेत, याविषयी त्यांना खडसवणे आवश्यक आहे. मंदिरांचा सामाजिक कार्यावर खर्च झालेला पैसा परत मिळवण्यासाठी स्थानिक ठिकाणी दबाव टाकण्याची वेळ आली आहे’’, असे रोखठोक प्रतिपादन मुंबई येथील निरामय रुग्णालयाचे संचालक डॉ. अमित थडाणी यांनी ‘श्री सिद्धीविनायक मंदिरांतील आर्थिक घोटाळा’ या विषयावर बोलतांना केले. ते दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या द्वितीय दिनी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर बेंगळुरू (कर्नाटक) येथील युवा ब्रिगेडचे संस्थापक श्री. चक्रवर्ती सुलीबेले आणि भुवनेश्वर (ओडिशा) येथील भारत रक्षा मंचाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अनिल धीर हे उपस्थित होते. डॉ. थडानी यांच्या आवाहनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे घोषणा देऊन प्रतिसाद दिला.
डॉ. अमित थडाणी पुढे म्हणाले की,
१. मुंबई येथील श्री सिद्धीविनायक मंदिराच्या विश्वस्तांमध्ये आपापसांत मतभेद आहेत. त्यामुळे हे मंदिर चालवण्यास ते असमर्थ झाले आहेत.
२. कायद्यानुसार मंदिरातील प्रत्येक विश्वस्त हा हिंदू असायला हवा; मात्र तसे तेथे दिसून येत नाही. मंदिरातील कर्मचार्यांना पगार मिळतो. प्रत्येक विश्वस्त हा राजकीय नेता आहे.
३. मंदिराचा पैसा हा मंदिराचा विकास, पूजा-अर्चा, भूमी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी व्यय करायला हवा. प्रत्यक्षात तसे होत नाही. मंदिराचा पैसा शाळा, रुग्णालये चालवण्यासाठी आणि धर्मादाय संस्थांना दिला जातो. मिरज येथे सिद्धीविनायक कॅन्सर रुग्णालयाला याच मंदिरातून पैसा दिला जातो. मंदिराच्या कारभारात प्रत्येक टप्प्यावर चुका आहेत.
४. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राबवलेल्या ‘जलयुक्तशिवार योजने’साठी श्री सिद्धीविनायक मंदिराने ११० कोटी रुपये संमत केले. त्यामुळे ‘मंदिराचा पैसा कुठे वापरायचा आहे’, हे सरकार ठरवत आहे.
५. श्री सिद्धीविनायक मंदिरातील आर्थिक व्यवहारांची माहिती माहिती अधिकारातून घेऊन आम्ही तेथील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. जे भ्रष्टाचार करतात, त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असतांनाही ते समाधानी झालेले नाहीत.
६. मंदिराचा पैसा मुसलमानांही दिला जातो. ज्यांची श्रद्धा नाही, त्यांना पैसा का दिला जातो ? ज्यांची गणपतीवर श्रद्धा आहे, त्यांनाच पैसा दिला पाहिजे.
७. मंदिरात ५०० रुपये घेऊन दर्शन दिले जाते. दुकानाच्या बाहेर दलाल उभा राहतो. ३०० ते ५०० रुपये घेऊन तो देवाचे दर्शन करवून देतो. त्यामुळे बर्याच भक्तांना दर्शन मिळत नाही. हे मंदिरांतील सर्वांना ठाऊक आहे. मंदिराचा सुरक्षारक्षकच सांगतो, ‘‘तुम्ही दुकानासमोर उभ्या असलेल्या दलालाकडे जा. तो दर्शन करवून देईल.’’ मी हे सर्व सामाजिक माध्यमांवर ही प्रसारित केले.