Menu Close

धर्मकार्यात पाय रोवून उभे रहाणे आवश्‍यक ! – अधिवक्‍ता भारत शर्मा, संरक्षक, धरोहर बचाओ समिती, राजस्‍थान

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात मंदिर रक्षणासाठी कार्यरत होण्‍याचे हिंदूंना आवाहन !

(डावीकडून) अधिवक्‍ता भारत शर्मा, ह.भ.प. रामकृष्‍ण हनुमंत महाराज वीर, दिनेश कुमार जैन, श्री. जयराम एन्. आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. मृदुल शुक्‍ला

 

रामनाथी : ज्‍याप्रमाणे अंगदाने रावणाच्‍या सभेत स्‍वत: पाय भूमीवर रोवून ठेवला, त्‍याप्रमाणे हिंदुत्‍वनिष्‍ठांनी धर्मकार्य करण्‍यासाठी पाय रोवून ठामपणे उभे रहायला हवे, तरच आपण हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन राजस्‍थान येथील ‘धरोहर बचाओ समिती’चे संरक्षक अधिवक्‍ता भारत शर्मा यांनी केले.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनातील ‘मंदिर रक्षणासाठी कार्यरत हिंदुत्‍वनिष्‍ठांचे अनुभवकथना’च्‍या सत्रात ते बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर अखिल भारतीय विज्ञान दलाचे संस्‍थापक डॉ. मृदुल शुक्‍ला, बेंगळुरु (कर्नाटक) येथील ‘शबरीमला अयप्‍पा सेवा समाजम्’चे उपाध्‍यक्ष श्री. जयराम एन्., कर्नाटक येथील भाजपच्‍या ‘बिजनेस अँड ट्रेडिंग टुरिस्‍ट प्रकोष्‍ठ’चे उपसंचालक दिनेश कुमार जैन आणि सोलापूर (महाराष्‍ट्र) येथील ‘वारकरी संप्रदाय पाईक संघा’चे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते ह.भ.प. रामकृष्‍ण हनुमंत महाराज वीर उपस्‍थित होते.

अधिवक्‍ता भारत शर्मा, संरक्षक, धरोहर बचाओ समिती, राजस्‍थान

अधिवक्‍ता शर्मा पुढे म्‍हणाले, ‘जयपूरमध्‍ये विकासाच्‍या नावाखाली अनेक मंदिरे पाडण्‍यात आली. कामागड येथील प्राचीन शिवमंदिर पाडण्‍यात आले. स्‍थानिक हिंदूंच्‍या साहाय्‍याने आम्‍ही तेथे शिवलिंगाची पुनर्स्‍थापना केली. हे मंदिर पाडणार्‍या धर्मांधाला त्‍याच दिवशी अटक करण्‍यात आली. धर्मकार्यासाठी हिंदू स्‍वयंप्रेरणेने पुढे आले, तर आपल्‍याला निश्‍चित यश मिळेल.’’

धर्मपालनाच्‍या कृती शिकवून समाजात सनातन धर्म पुन्‍हा रुजवू ! – डॉ. मृदुल शुक्‍ला, संस्‍थापक, अखिल भारतीय विज्ञान दल

डॉ. मृदुल शुक्‍ला, संस्‍थापक, अखिल भारतीय विज्ञान दल

सनातन धम वैज्ञानिक कसा आहे, हे समाजासमोर आणण्‍यासाठी आम्‍ही ‘अखिल भारतीय विज्ञान दला’ची स्‍थापना केली. या माध्‍यमातून आम्‍ही अनेकांना सनातन धर्माच्‍या अभ्‍यासासाठी प्रवृत्त केले. वाढदिवसाच्‍या दिवशी केक न कापता औक्षण करणे, यज्ञ संस्‍कृतीचे पालन करणे आदी छोट्या कृतींतून आम्‍ही सनातन धर्म समाजात पुन्‍हा निर्माण करू.

शबरीमला मंदिराच्‍या व्‍यवस्‍थेत अन्‍य पंथियांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्‍टाचार ! – जयराम एन्., उपाध्‍यक्ष, शबरीमला अय्‍यप्‍पा सेवा समाजम्, बेंगळुरु (अर्बन), कर्नाटक

जयराम एन्., उपाध्‍यक्ष, शबरीमला अय्‍यप्‍पा सेवा समाजम्, बेंगळुरु (अर्बन), कर्नाटक

श्री अयप्‍पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटांतील स्‍त्रियांना प्रवेश नसल्‍याची परंपरा नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न केरळमधील साम्‍यवादी सरकारने केला. याविरोधात आम्‍ही आंदोलन केले. केरळच्‍या मंदिरांचे व्‍यवस्‍थापन मुसलमान आणि ख्रिस्‍ती यांच्‍या हातात आहे. त्‍यामुळे अनेक चुकीचे प्रकार होत असतात. मंदिराचा प्रसाद बनवण्‍यासाठी लागणारे तांदूळ, तूप इत्‍यादी सामुग्री अन्‍य पंथियांकडून खरेदी केली जाते. या माध्‍यमातून ते ४ ते १० कोटी रुपयांचा व्‍यवसाय करतात. याविरुद्ध आम्‍ही आंदोलन केले. शबरीमला मंदिरात देवाला अर्पण करण्‍यासाठी ‘इरुमुंडी कट्ट’ (विशिष्‍ट प्रकारची पूजा साम्रगी) नेले जाते. त्‍यात अर्धा ते एक किलो तांदूळ असतात. जमा झालेल्‍या या तांदळाचा लिलाव केला जातो. लिलावात अन्‍य पंथीय हे तांदूळ खरेदी करतात आणि नंतर ६ रुपये किलो दराने सरकारलाच विकतात. सरकार लोकांना जे विनामूल्‍य तांदूळ देते, त्‍यात हे तांदूळ मिसळले जातात. अशा प्रकारे  मंदिराच्‍या प्रसादात अन्‍य पंथीय मोठ्या प्रमाणात भ्रष्‍टाचार करत आहेत.

मंदिरांतूनच हिंदूंना धर्मशिक्षण देण्‍यात यावे ! – दिनेश कुमार जैन, उपसंचालक, भाजप बिजनेस अ‍ॅण्‍ड ट्रेडिंग टुरिस्‍ट प्रकोष्‍ठ, दक्षिण कन्‍नड, कर्नाटक

दिनेश कुमार जैन, उपसंचालक, भाजप बिजनेस अ‍ॅण्‍ड ट्रेडिंग टुरिस्‍ट प्रकोष्‍ठ, दक्षिण कन्‍नड, कर्नाटक

कर्नाटक येथील माणगेश्‍वराच्‍या मंदिराच्‍या बाजूला ख्रिस्‍ती आणि मुसलमान यांच्‍याकडून बांधकाम करण्‍यात येत होते. हे मंदिर राजा रवी वर्मा यांच्‍या काळापासूनचे  आहे. याविरोधात आम्‍ही न्‍यायालयात खटला प्रविष्‍ट केला आहे. हिंदू भाविकांकडून मंदिरात दिल्‍या जाणार्‍या निधीचा वापर हिंदूंना धर्मशिक्षणा देण्‍यासाठीही वापरला गेला पाहिजे. प्रत्‍येक गावातील मंदिरांतून अशा प्रकारे हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे.

आंदोलनामुळे पंढरपूर येथील मंदिरातील टोकनपद्धत बंद ! – ह.भ.प. रामकृष्‍ण हनुमंत महाराज वीर

ह.भ.प. रामकृष्‍ण हनुमंत महाराज वीर

आम्‍ही पंढरपूर येथील मंदिरात देवाचे दर्शन घेण्‍यासाठी असलेल्‍या टोकन पद्धतीला विरोध दर्शवला. जे इतर मंदिरांत चालते, ते आम्‍ही पंढरपुरात होऊ दिले नाही. ईश्‍वराचे दर्शन घेण्‍यासाठी १०० ते २०० रुपये कशासाठी घ्‍यायचे ? कायद्याचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी आम्‍ही संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठवली. ‘टोकन पद्धतीमुळे पंढरपूर येथे एका वर्षात भक्‍तांच्‍या दर्शनातून १४ कोटी रुपये मिळतील’, असा मंदिर व्‍यवस्‍थापनाचा हिशेब होता; पण तसे होऊ शकले नाही. मंदिरांतील अतीमहनीय व्‍यक्‍तींसाठी स्‍वतंत्र दर्शनाचीही पद्धत बंद झाली पाहिजे.

सरकारच्‍या कह्यात मंदिरे जाण्‍यास हिंदूच उत्तरदायी आहेत. मंदिरातील पुजारी सरकारी आहेत. त्‍यामुळे त्‍यांना त्‍या त्‍या देवतांचे मंत्र म्‍हणता येत नाहीत. पंढरपूर येथील मंदिरात चालणार्‍या भ्रष्‍टाचाराविषयी रस्‍त्‍यावर फलक लावून आम्‍ही आवाज उठवला, तेव्‍हा संबंधित अधिकार्‍यांनी आम्‍हाला हा फलक हटवण्‍याची विनंती केली. आम्‍ही फलक हटवला; परंतु तोपर्यंत फेसबूक आणि व्‍हॉटसअ‍ॅप यांद्वारे ही बातमी सर्वत्र प्रसारित झाली होती. याद्वारेही आपण जगजागृती करू शकतो.

हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी पंढरपूर येथील मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त करण्‍यासाठी पुढकार घ्‍यावा ! – ह.भ.प. रामकृष्‍ण हनुमंत महाराज वीर

‘‘हिंदूंना जागृत करण्‍याचे काम हिंदु जनजागृती समिती करत आहे. कायदेशीर गोष्‍टी आम्‍हाला हिंदु जनजागृती समितीचे साहाय्‍य लाभते. मंदिर सरकारीकरणाचे काय लाभ आहेत ? याविषयी आम्‍ही बैठक घेतली. त्‍याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्‍यामुळे मी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना पंढरपूर येथील मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त करण्‍यासाठी पुढकार घेण्‍याची विनंती करतो.

अधिवेशनाच्या या सत्राची झलक

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *