Menu Close

वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रशासनाने सर्व हिंदुविरोधी कायदे रहित करावेत ! – पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन

डावीकडून वैदेही ताम्‍हण, श्रीमती नन्‍दा डगला, पू. नीलेश सिंगबाळ, दुर्गेश परूळकर आणि मार्गदर्शन करताना पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन

रामनाथी : देशात कृषी कायदा, नागरिकत्‍व सुधारणा कायदा यांच्‍या विरोधात आंदोलने होऊ शकतात, तर हिंदुत्‍वासाठी आंदोलन का होऊ शकत नाही ? हिंदुत्‍वासाठी देशाला हलवून टाकले पाहिजे. ‘हिंदुहितासाठी काम करणारेच देशात राज्‍य करू शकतील’, हे हिंदूंनी दाखवून दिले पाहिजे. ‘देशात कोणते कायदे असायला हवेत’, हे हिंदूंनी ठरवायला हवे. वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने  सर्व हिंदुविरोधी कायदे रहित करावेत, असे आवाहन सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता (पू.) हरि शंकर जैन यांनी केले. दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या तृतीय दिनी ‘हिंदू सुरक्षा’ या उद़्‍बोधन सत्रात ‘हिंदु राष्‍ट्राचे ध्‍येय पूर्ण करण्‍यासाठी आपली कर्तव्‍ये’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर मुंबई (महाराष्‍ट्र) येथील ‘आफ्‍टरनून वॉईस’ या वृत्तपत्राच्‍या प्रमुख संपादिका डॉ. वैदेही ताम्‍हण, हरियाणा येथील भाजपच्‍या महिला मोर्च्‍याच्‍या राष्‍ट्रीय कार्यसमितीच्‍या सदस्‍या श्रीमती नंदा डगला, महाराष्‍ट्रातील ठाणे येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक श्री. दुर्गेश परूळकर आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे उपस्‍थित होते.

पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

या वेळी पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन म्‍हणाले,

१. अयोध्‍येतील श्रीराममंदिराचा पाया, हा धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्राचा पाया आहे. श्रीरामाचे भव्‍य मंदिर २ वर्षांत पूर्ण होईल, त्‍याप्रमाणे हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेचे कार्यही पुढे जाईल.

२. ख्रिस्‍ती आणि मुसलनान यांनी कह्यात घेतलेली मंदिरे आपणाला पुन्‍हा घ्‍यायची आहेत. ताजमहल हा तेजोमहालय आहे. शहाजहान याने जयसिंह याच्‍याकडून ताजमहाल घेतला. ताजमहाल हा तेजोमहालय असल्‍याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्‍च न्‍यायालयात सादर केले आहे.

३. १६ मे २०२२ या दिवशी कथित ज्ञानवापी मशिदीच्‍या वजूखान्‍यात (नमाजाच्‍या आधी हात-पाय धुण्‍याचे ठिकाण) शिवलिंग प्रकट झाले. भगवान शिव प्रकट झाले, तो क्षण अवस्‍मरणीय होता. भगवान शिवाच्‍या मागे शक्‍ती आहे. ज्ञानवापीमध्‍ये प्रकट झालेले महादेव हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनाचे आवाहन करत आहेत.

ख्रिस्‍ती धर्मप्रसारकांच्‍या शाळांवर हिंदूंनी बहिष्‍कार टाकावा !

अन्‍य कुणामध्‍ये करण्‍याआधी प्रथम हिंदूंमध्‍येच जागृती करणे आवश्‍यक आहे. ख्रिस्‍ती धर्मप्रसारकांच्‍या शाळांतील ९८ टक्‍के विद्यार्थी हे हिंदू आहेत. केजीपासून ख्रिस्‍ती शाळांमध्‍ये जाणार्‍या हिंदूंच्‍या मुलांवर कोणते संस्‍कार होणार ? हिंदु पालकच स्‍वत:च्‍या पाल्‍यांवर केक कापणे, हिंदी चित्रपटातील गाण्‍यांवर नाचणे आदी गोष्‍टी शिकवत आहेत. याविषयी हिंदूंनीच आत्‍मचिंतन करणे आवश्‍यक आहे. ख्रिस्‍ती धर्मप्रसारकांच्‍या शाळांवर हिंदूंनी बहिष्‍कार टाकायला हवा.

भारतात ईशनिंदेच्‍या विरोधात कायदा व्‍हायला हवा !

प्रत्‍येक देशाची एक संस्‍कृती आणि सभ्‍यता असते. भारताची सभ्‍यता आणि संस्‍कृती लाखो वर्षांपूर्वीची आहे. श्रीराम, श्रीकृष्‍ण, शीव  आणि शक्‍ती यांचे अस्‍तित्‍व या देशाच्‍या कणाकणांत आहे. या देशाचे ते आत्‍मा आहेत. भारतभूमीत जन्‍म घेतलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला त्‍यांचा आदर करावाच लागेल.

हिंदुविरोधी घटनांना उत्तर देण्यासाठी हिंदूंनी प्रखर हिंदुत्व जोपासणे आवश्यक ! – डॉ. (सुश्री) वैदेही ताम्‍हण, संपादिका, ‘आफ्‍टरनून वॉईस’, मुंबई

डॉ. (सुश्री) वैदेही ताम्‍हण, संपादिका, ‘आफ्‍टरनून वॉईस’, मुंबई

मी हिंदू आहे, याचा मला अभिमान आहे. सद्यःस्‍थितीत विरोधकांकडून हिंदूंच्‍या संस्‍कृतीवर वैचारिक आणि शैक्षणिक स्‍तरांवर आक्रमण केले जात आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार यांनी ‘हिंदू आतंकवादी आहेत’, तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी, ‘जो भगवा घालतो, तो आतंकवादी आहे’, असे वक्‍तव्‍य केले होते. ‘बहुसंख्‍य असूनही अशा गोष्‍टींना हिंदू विरोध का करत नाहीत ?’, याचेही चिंतन केले पाहिजे. अशा प्रकारांना उत्तर देण्यासाठी आपल्याला प्रखर हिंदुत्व जोपासावे लागेल. भाजपच्‍या प्रवक्‍त्‍या नुपूर शर्मा यांनी सामाजिक व्‍यासपिठावर बोलण्‍यावर त्‍यांच्‍या पक्षाने बंदी घातली. ज्‍या सरकारला हिंदूंनी पूर्ण बहुमताने निवडून दिले, त्‍या सरकारने असा आदेश काढणे, हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील ‘आफ्‍टरनून वॉईस’ या वृत्तपत्राच्‍या संपादिका डॉ. (सुश्री) वैदेही ताम्‍हण यांनी केले.

रामनाथी (गोवा) येथे चालू असलेल्‍या दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या दुसर्‍या उद़्‍बोधन सत्रात १४ जून या दिवशी ‘हिंदूंची सुरक्षा’ या विषयावर राष्‍ट्रीय कार्यसमिती सदस्‍य तथा हरियाणा येथील भाजप महिला मोर्चाच्‍या राज्‍य प्रभारी श्रीमती नंदा डगला, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस’चे संरक्षक पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते तथा लेखक श्री. दुर्गेश परूळेकर यांनी विचार मांडले. या वेळी डॉ. (सुश्री) वैदेही ताम्‍हण यांनी ‘हिंदूंवर करण्‍यात येणार्‍या छुप्‍या आक्रमणाला कसे ओळखावे ?’, या विषयावर उपस्‍थितांचे उद़्‍बोधन केले.

हिंदु धर्मावरील आघातांविषयी लिखाण प्रसिद्ध करण्‍याचे धाडस माझ्‍यात आहे ! – डॉ. (सुश्री) वैदेही ताम्‍हण

लेखणीत भरपूर शक्‍ती असते. हिंदूंनी सातत्‍याने हिंदु धर्म आणि त्‍यांवर होणारे आघात यांसाठी ‘फेसबूक’, तसेच विविध प्रसारमाध्‍यमांद्वारे व्‍यक्‍त व्‍हायला हवे. तुमच्‍या लेखणीत लिहिण्‍याचे धाडस असेल, तर एका वृत्तपत्राची संपादिका या नात्‍याने ते लिखाण प्रसिद्ध करण्‍याचे धाडस माझ्‍यात आहे.

हिंदु राष्‍ट्राच्‍या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल ! – श्रीमती नंदा डगला, राष्‍ट्रीय कार्यसमिती सदस्‍य तथा राज्‍य प्रभारी, भाजप महिला मोर्चा, हरियाणा

श्रीमती नंदा डगला, राष्‍ट्रीय कार्यसमिती सदस्‍य तथा राज्‍य प्रभारी, भाजप महिला मोर्चा, हरियाणा

‘हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेत महिलांचा सहभाग’ या विषयावर बोलतांना श्रीमती नंदा डगला म्‍हणाल्‍या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यावर जिजाबाई यांनी संस्‍कार केले. त्‍यांनीच हिंदु साम्राज्‍य स्‍थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज दिले. पती लढाईला जाण्‍यापूर्वी पत्नी पतीला टिळा लावून ‘लढाईत विजयी होऊन या’, असे सांगत असे. त्‍यामुळे हिंदु राष्‍ट्राच्‍या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल. महिलांखेरीज हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होऊ शकणार नाही.’’ राजस्‍थान येथील सनातन संस्‍थेच्‍या साधिका डॉ. स्‍वाती मोदी यांनी श्रीमती नंदा डगला यांचा सत्‍कार केला.

श्रीमती नंदा डगला पुढे म्‍हणाल्‍या की,

१. भारतात पूर्वीपासून प्रत्‍येक कार्यात स्‍त्रियांचे योगदान मोठे आहे. सभ्‍यता, संस्‍कृती आणि हिंदुत्‍व या दृष्‍टीने स्‍त्रियांचे महत्त्व मोठे आहे. एकीकडे महिलांना शिकण्‍याचा अधिकार नाही, अशी गरळओक केली जाते; मात्र वैदिक काळापासून स्‍त्रिया शिक्षण घेत आहेत, तसेच त्‍यांची पूजाही केली जाते. तसेच आंदोलनातही महिलांचे योगदान मोठे आहे. परंपरा, वेशभूषा, एकता, सभ्‍यता महिलांमध्‍ये दिसून येतात.

२. धर्माच्‍या आधारावर देशाचे तुकडे झाले आहेत. तरीही देशात अन्‍य पंथियांचे लोक मोठ्या संख्‍येने रहातात; मात्र अन्‍य पंथियांचे लोक हिंदु कुटुंबात आणि त्‍यांच्‍या घरात हस्‍तक्षेप करत असतील, तर त्‍यांना ‘जशास तसे’ उत्तर दिले पाहिजे.

३. आम्‍ही भाजपच्‍या माजी नेत्‍या नुपूर शर्मा यांच्‍या पाठीशी आहोत. त्‍यांना अटक केल्‍यास अनेक महिला स्‍वतःहून अटक करून घेतील. नुपूर शर्मा म्‍हणजे ‘एक नारी सब पे भारी’ आहे. हिंदुद्वेषी दिवंगत एम्.एफ्. हुसेन हिंदु देवतांचे विडंबन करून तो परदेशात पळून गेला. त्‍या वेळी त्‍यांनी क्षमा मागण्‍याची मागणी कुणी नाही; मात्र नुपूर शर्मा यांना क्षमा मागायला सांगितली जाते, हे चुकीचे आहे.

‘हिंदु राष्‍ट्रवाद’ हेच धर्मनिरपेक्षतेचे दुसरे नाव आहे ! – दुर्गेश परूळेकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते तथा लेखक, ठाणे, महाराष्‍ट्र

दुर्गेश परूळेकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते तथा लेखक, ठाणे, महाराष्‍ट्र

‘धर्मनिरपेक्षता या शब्‍दाला विरोध करा !’, या विषयावर श्री. दुर्गेश परूळेकर म्‍हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव यांनी वर्ष १९९२ मध्‍ये एका भाषणात सांगितले की, कोणता राजकीय पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि कोणता नाही, हे निश्‍चित करण्‍याचे कोणतेही प्रमाण नाही. त्‍यामुळे धर्मनिरपेक्षतेचा निर्णय योग्‍य तर्‍हेने घेता येत नाही. यानंतरही ‘धर्मनिरपेक्षता’ या विषयावर चर्चा करण्‍याचा प्रयत्न कोणत्‍याही साम्‍यवाद्यांनी केला नाही. आज विश्‍वात हिंदु राष्‍ट्रवादावर चर्चा केली जाते. मुळात ‘हिंदु राष्‍ट्रवाद’ हेच धर्मनिरपेक्षतेचे दुसरे नाव आहे. राष्‍ट्राच्‍या वैभवशाली इतिहासाचे स्‍वप्‍न पहाणारा राष्‍ट्रवाद समर्थनीय आहे. त्‍यामुळे राष्‍ट्रवादाला आजारी समजून त्‍यासाठी औषध शोधण्‍याचा प्रयत्न करणे, हा मूर्खपणा आहे. असे असतांनाही राष्‍ट्रवादाला विरोध केला जात आहे. विश्‍वात उदारमतवाद, समाजवाद आणि निधर्मीवाद विचारप्रणाली आज फॅशन झाली आहे. राष्‍ट्रवादाच्‍या प्रेरणाला दाबणे म्‍हणजे अनेक संकटांना आमंत्रित करण्‍यासारखे आहे.

विश्‍वात ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्रवादा’चा स्‍वीकार करणे निषिद्ध मानण्‍यात आले आहे ! – दुर्गेश परूळेकर

२२ जुलै १९९४ मधील ‘इंडिपेंडेंट’ वार्तापत्रातील एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्‍यातील एका परिच्‍छेदात म्‍हटले होते की, ‘टांझानिया फॉर टांझानियन्‍स ओन्‍ली (टांझानिया टांझानियांच्‍या नागरिकांसाठी आहे).’ ही घोषणा आता टांझानिया येथे पसरू लागली आहे. ‘हिंदुस्‍थान हिंदूंचे आहे’, या घोषणेवर आकांडतांडव करणार्‍यांनी या वेळी मौन व्रत धारण केले होते. यातून लक्षात येते की, विश्‍वात धर्मनिरपेक्षता राष्‍ट्रवादाचा स्‍वीकार करणे निषिद्ध मानण्‍यात आले आहे.

अधिवेशनाच्या या सत्राची झलक

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *