विविध क्षेत्रांतील असूनही हिंदुत्वनिष्ठांमध्ये दिसून आला धर्मबंधुत्वाचा भाव !
या अधिवेशनाला भारतातील विविध राज्यांतील, तसेच अन्य देशांतूनही हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. विविध हिंदुत्वनिष्ठांची भाषा वेगवेगळी असल्याने भाषेची अडचण असूनही ‘सर्व हिंदुत्वनिष्ठ हिंदुत्वाच्या विचाराने जोडले आहेत’, असे अनेक प्रसंगांत जाणवले. त्यामुळे प्रांत आणि भाषा वेगळी असली, तरी सर्व हिंदुत्वनिष्ठांमध्ये धर्मबंधुत्वाचा भाव दिसून आला. काही वक्त्यांना हिंदी भाषेतून बोलण्याचा सराव नसल्याने भाषण करतांना अडचण आली. असे असूनही त्यांचा धर्मकार्यातील सहभाग आणि धर्मकार्यातील प्रत्यक्ष योगदान यांमुळे त्यांचा विषय ऐकतांना उपस्थितांना उत्साह वाटत होता.
पत्रकारांचे हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी योगदान !
१. काशी विश्वनाथ मंदिर अतिक्रमणमुक्त होण्यासाठी ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा वेळ घेऊन पत्रकारांनी त्यांची विशेष मुलाखत घेतली.
२. अधिवेशनाचे पहिले २ दिवस ‘गोवा रिपोर्ट कार्ड’ हे फेसबूक न्यूज पोर्टल, ‘आर्डीएक्स गोवा वृत्तवाहिनी’ आणि ‘गोवा ९ वाहिनी’ यांनी काही कालावधीसाठी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण केले.
छायाचित्रमय क्षणचित्रे
१. अधिवेशनस्थळी ‘सेल्फी पॉईंट’ (स्वतःच स्वतःचे छायाचित्र काढण्यासाठी उभारलेले ठिकाण) उभारण्यात आला असून अनेक हिंदुत्वनिष्ठ त्याच्या समोर उभे राहून छायाचित्रे काढून ती सामाजिक संकेतस्थळांवर पोस्ट करत आहेत.
२. अधिवेशनस्थळी लावलेले बंगाली हिंदूंवरील अत्याचारांविषयीचे प्रदर्शन पाहून हिंदुत्वनिष्ठांचे डोळे पाणावले !
बंगाल येथील ‘पश्चिमबंगेर जन्य’ या संघटनेने वर्ष १९४६ ते १९७१ या कालावधीत बंगाली हिंदूंच्या झालेल्या नरसंहाराची भीषणता दाखवणारे एक विशेष छायाचित्रमय प्रदर्शन सिद्ध केले आहे. २६ छायाचित्रांचे हे प्रदर्शन विद्याधिराज सभागृहात लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात शांतीप्रिय बंगाली हिंदूंवर कशाप्रकारे अत्यंत घृणास्पद अत्याचार करण्यात आले, हे दाखवण्यात आले आहे. ‘बंगाली हिंदूंवर झालेले अत्याचार लोकांसमोर आणणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे’, असे ‘पश्चिमबंगेर जन्य’ या संघटनेने सांगितले. हे प्रदर्शन पाहून अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या डोळ्यांत पाणी आले.