दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील ‘हिंदु संघटनांचा कार्यपरिचय आणि अनुभवकथन’ या विषयावरील उद्धबोधन सत्र (१४ जून)
रामनाथी (गोवा) : भारताच्या अनेक राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्यांक, तर मुसलमानांना बहुसंख्यांक बनवून आगामी काळात भारताच्या दुसर्या फाळणीची योजना आखण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यघटनेमधून ‘धर्मनिरपेक्ष’ (सेक्युलर) शब्द हटवावा. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या घोडचुका सुधारण्यात याव्यात, असा प्रस्ताव ‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ (अखिल भारतीय कायदेशीर साहाय्य मंच) तथा ‘अखिल भारतीय बार एसोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांनी येथे मांडला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनाथी, गोवा येथे आयोजित केलेल्या दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ने केलेले राष्ट्रहिताचे कार्य या विषयावर ते बोलत होते.
बंगाल आणि आसाम येथील हिंदूंची विदारक स्थिती !
अधिवक्ता मुखर्जी पुढे म्हणाले की,
१. बांगलादेशमधून भारतात घुसखोरी केलेल्या मुसलमानांनी बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण आसाममध्ये वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीत मुसलमान उमेदवारच उभा करण्याची मागणी केली जाते.
२. बंगालच्या अनुमाने ८०० गावांमध्ये, तर आसामच्या ४०० गावांमध्ये एकही हिंदू शिल्लक राहिलेला नाही.
३. बंगाल आणि आसाम यांच्या सीमेवर मुसलमान दलालांकडून मोठ्या प्रमाणात गोतस्करी चालू आहे अन् त्यातून मिळणारा पैसा जिहादी आतंकवाद्यांना पुरवला जात आहे.
बांगलादेशमधील हिंदूंची दु:स्थिती !
अधिवक्ता मुखर्जी म्हणाले की, बांगलादेशचे प्रथम राष्ट्रपती शेख मुजिबूर रेहमान यांच्या कारकीर्दीत अनेक मंदिरांचा विध्वंस करण्यात आला होता. आजही बांगलादेशमध्ये हिंदूंची मंदिरे पाडली जात आहेत. तसेच मंदिरांच्या भूमीवर मुसलमानांकडून अतिक्रमण केले जात आहे.
राज्यघटनेमध्ये हिंदु समाजात फूट पाडण्याची तरतूद ! – अशोक कुमार पाठक, राष्ट्रीय अध्यक्ष, सनातन एकता मिशन, प्रयागराज, उत्तरप्रदेश
राज्यघटनेमध्ये हिंदु समाजामध्ये फूट पाडण्याची तरतूद केली गेली, असे वक्तव्य प्रयागराज येथील ‘सनातन एकता मिशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अशोक कुमार पाठक यांनी येथे केले. श्री. अशोक कुमार पाठक हे ‘सनातन एकता मिशन’च्या माध्यमातून करण्यात येणार्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी अनुभवकथन करतांना बोलत होते.
श्री. पाठक पुढे म्हणाले,
१. भारतीय ग्रंथांमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘दलित’ हे शब्द कुठेच आढळत नाहीत. समाजामध्ये फूट पाडण्यासाठीच हे शब्द वापरात आणले गेले.
२. आपले वैदिक साहित्य परिपूर्ण आहे. ज्ञान, काम आणि पुत्र यांच्या माध्यमातून आपण आपली संस्कृती जपली पाहिजे.
३. आपण आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवले पाहिजे.
४. सनातन धर्म पोटभरू शिक्षण देत नाही, तर मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतो.
यश मिळवण्यासाठी शौर्य आणि संघटन आवश्यक ! – श्री. अतुल जेसवानी, संस्थापक, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश
यश मिळवण्यासाठी शौर्य आणि संघटन आवश्यक आहे. संघटन मजबूत केले पाहिजे आणि त्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केले पाहिजे. आपले शौर्य वाढवले पाहिजे, असे वक्तव्य जबलपूर, मध्यप्रदेश येथील ‘हिंदु सेवा परिषदे’चे संस्थापक श्री. अतुल जेसवानी यांनी अधिवेशनाला संबोधित करतांना केले. ‘हिंदु समाजामध्ये जागृतीच्या दृष्टीने केलेले नाविन्यपूर्ण प्रयत्न’ या विषयावर ते बोलत होते.
हिंदु जनजागृती समिती ही आपली मातृसंघटना ! – श्री. अतुल जेसवानी
आपण दाबले गेलो आहेत. प्रतिशोधानेच विजय मिळवता येतो. हिंदूंच्या रक्षणासाठी आपण तन, मन, धन यांनी लढले पाहिजे. हिंदु जनजागृती समिती ही आपली मातृसंघटना आहे. या संघटनेने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘शौर्य जागरण अभियान’ चालू केले आहे.
सत्याचाच विजय होतो; म्हणून सत्याची कास धरा ! – श्री. सत्यमेव जयते लोकमंगल, संस्थापक, सत्यमेव जयते, गोरखपूर, उत्तरप्रदेश
सत्याचाच विजय होतो; म्हणून आपण नेहमी सत्याची कास धरावी, असे उद़्गार गोरखपूर, उत्तरप्रदेश येथील ‘सत्यमेव जयते’ या संघटनेचे संस्थापक श्री. सत्यमेव जयते लोकमंगल (डॉ. श्याम धर तिवारी) यांनी काढले. अधिवेशनात ‘सरकारी क्षेत्रात भ्रष्टाचार निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न आणि सुराज्य निर्मितीसाठी कसे प्रयत्न करायचे ?’ या विषयावर ते बोलत होते.
सत्याच्या मार्गावर चालणारे लोक संघटित होत नाहीत !
ते पुढे म्हणाले की, सरकारी नोकरीत प्रामाणिकपणाची चाचणी होते. भ्रष्टाचार्यांनी देशाला गुलाम बनवले आहे. भारतियांना भ्रष्टाचाराची सवय झाली आहे. हा एक मानसिक रोग आहे. भ्रष्टाचार करू नका, सदाचारी व्हा ! लाच घेणारे आणि लाच देणारे या दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे. सत्याच्या मार्गावर चालणारे लोक संघटित होत नाहीत. यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
‘वसुधैव कुटुम्बकम् ।’साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया !
श्री. सत्यमेव जयते लोकमंगल पुढे म्हणाले की, ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी ही एक कुटुंब आहे.) ही आपल्या संतांची शिकवण आहे. आपल्याला संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यासाठी गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, यश निश्चित मिळेल.
सनातन धर्म अनादि अनंत आहे ! – श्री. आदित्य सत्संगी, उद्योगपती आणि सायंटोलॉजिस्ट, कॅलिफोर्निया, अमेरिका
‘सत्तोलॉजी’ हा प्रामुख्याने अमेरिकेतील असा एक पंथ आहे, जो पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. त्यानुसार शरिरात आत्मा वास करतो. आत्म्याचा शोध घेण्यासाठी शास्त्रीय भाषेत अभ्यास केला जातो.
सनातन धर्म कधीच नष्ट होत नाही. तो अनादि अनंत आहे, असे उद़्गार कॅलिफोर्निया, अमेरिका येथील उद्योगपती आणि ‘सत्तोलॉजिस्ट’ श्री. आदित्य सत्संगी यांनी अधिवेशनाला संबोधित करतांना काढले. ते ‘पाश्चिमात्य देशांतील विद्यापिठांचा हिंदुद्वेष’ या विषयावर बोलत होते.
आत्मा आणि परमात्मा यांच्या आधारावर चालतो, तोच सनातन धर्म !
श्री. सत्संगी पुढे म्हणाले की, आपण जेव्हा शास्त्राचा त्याग करतो, तेव्हा आपल्याला निराशा येते. ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास केलेला नाही, त्यांच्याकडून शिकण्याची अपेक्षा ठेवू नये. मंत्रजप केल्याने ऊर्जा मिळते. शास्त्रांच्या आधारानेच कार्य केले पाहिजे. जो आत्मा आणि परमात्मा यांच्या आधारावर चालतो, तो सनातन धर्म होय.