दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात पाचव्या दिवशी ‘विविध प्रकारच्या जिहादचा प्रतिकार’ करण्याचे हिंदूंना आवाहन !
रामनाथी : गड-किल्ले यांचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा वारसा आहे. धर्म आणि राष्ट्र कार्य करण्याची प्रेरणा त्यांतून मिळते; मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्यांचे षड्यंत्रपूर्वक इस्लामीकरण केले जात आहे. किल्ल्यावर प्रथम मजार केली जाते. त्यानंतर त्यावर चादर चढवली जाते. काही मासांनी त्या ठिकाणी उरूस साजरा केला जातो. उरूस साजरा करण्याची परंपरा पुरातन असल्याचे भासवले जाते आणि त्यानंतर तेथे दर्गा बाधून धार्मिक स्थान निर्माण केले जाते. हिदंवी स्वराज्याच्या निर्माणामध्ये ज्यांचे नाव नाही, अशा तथाकथित फकिरांच्या नावाने अनेक दर्गे उभारले जात आहेत.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीचे बांधकाम तोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला असूनही त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडी किल्ल्यावरील प्राचीन दुर्गादेवी मंदिर हे मशीद असल्याचा दावा मुसलमानांनी केला आहे. किल्ल्यावर ईदगाह असल्याचे सांगू त्यावर नमाजपठण चालू केले आहे. त्यामुळे किल्ल्याच्या अर्धा भागात हिंदूंना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अशा प्रकारे मलंगगड, लोकगड, कुलाबा गड, माहिमगड, विशाळगड, शिवडी आदी गडांवर इस्लामी अतिक्रमण करण्यात आले आहे. किल्ल्यांचे दर्ग्यांमध्ये रूपांतर झालेले पहायचे नसेल, तर त्याविरोधात हिंदूंनी संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १५ जून या दिवशी ‘महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले यांवर इस्लामिक अतिक्रमण’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर पालघर येथील ‘हिंदु गोवंश रक्षा समिती’चे श्री. दिप्तेश पाटील, पालघर येथील ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल आणि हिंदु जनजागृती समिती तेलंगण येथील समन्वयक श्री. चेतन जनार्दन उपस्थित होते.
गोहत्याबंदी कायद्याचा योग्य अभ्यास करून गोरक्षण करणे आवश्यक ! – दिप्तेश पाटील, समन्वयक, हिंदु गोवंश रक्षा समिती, पालघर
देशी गोवंश अधिक दूध देऊ शकतात; परंतु त्यावर ‘भारतात नव्हे, तर ब्राझिलमध्ये संशोधन केले जाते’, हे आपले दुर्दैव आहे. एकेकाळी भारतात गायीला ‘गोमाता’ म्हटले जात होते, मात्र आता त्याच देशात मोठ्या प्रमाणात देशी गोवंशियांचा संहार होत आहे. गोमांस विक्रीमध्ये भारत जगभरात चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे गोमांसविक्रेत्यांपासून गोवंशाचे रक्षण करणे अपरिहार्य झाले आहे. महाराष्ट्रात असलेल्या गोहत्याबंदी कायद्याद्वारे गोहत्या करणारे, गोमांसाची वाहतूक करणारे, तसेच गोमांसाची खरेदी किंवा विक्री करणारे यांना दोषी ठरवले जाऊ शकते. गोरक्षकांनी या कायद्याचा योग्य अभ्यास करून गोरक्षण करावे.
हिंदू संघटित असल्यास धर्मावरील आघात रोखण्यात यश येतेच ! – चेतन जनार्दन, हिंदु जनजागृती समिती, तेलंगणा
मुनव्वर फारूकी या हास्य अभिनेत्याने हिंदु देवतांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले होते. त्याचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. त्यानंतर फारूकी यांच्या भाग्यनगर आणि पुणे येथे अयोजित कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी विरोध करून तो रहित करण्यास भाग पाडले. हिंदू संघटित असल्यास देवता आणि हिंदु धर्म यांवरील आघात रोखण्यात यश येतेच, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी प्रत्येकाने सतर्क असायला हवे ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल, संस्थापक, हिंदु टास्क फोर्स, पालघर (महाराष्ट्र)
मीरा-भाईंदर महापालिकेच्या मैदानात आयोजित सामूहिक नमाजपठणाच्या विरोधात पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने धर्मांधांना नमाजपठणासाठी दिलेली अनुमती नाकारली, तसेच सामाजिक प्रसारमाध्यमांवर ज्ञानवापी येथील शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित करणार्या २ धर्मांधांच्या विरोधात भ्रमणभाषवरून पोलिसांत केलेल्या तक्रारीनंतर तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला. अशा प्रकारे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी प्रत्येकाने सतर्क असायला हवे. कर्नाटकात केवळ ६ मुलींच्या हिजाबवरून राष्ट्रीय आंदोलन उभे राहिले; मात्र कमलेश तिवारी, हर्षा यांसह कित्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, तरी त्याविरोधात भारतातील हिंदू शांत राहिले.
राष्ट्र उभारणीचा पाया हा अध्यात्मावर आधारित असतो. भारत हे आध्यात्मिक शक्तीद्वारे उभारण्यात आलेले राष्ट्र असल्याने त्याचा कधीच नाश होऊ शकत नाही. हिंदुत्वाचे कार्य हे एक तप असल्याने त्यासाठी साधनेचे बळ आवश्यक आहे. या कार्यात कधीही विफलता आल्यास न डगमगता कार्यरत रहा. भगवान श्रीकृष्ण आपल्या समवेत असल्याने अंतिम यश हिंदूंचेच आहे !