Menu Close

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी ‘धर्मरक्षणाविषयीचे अनुभवकथन’ या विषयावर उद्धबोधन सत्र

डावीकडून श्री. सुनील घनवट, श्री. अभय वर्तक, श्री. हर्षद खानविलकर आणि श्री. प्रशांत जुवेकर

मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे बनण्‍यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्‍यक ! – सुनील घनवट

सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

रामनाथी : मंदिर संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी अद्याप पुष्‍कळ कार्य करायचे आहे. मंदिरे ही चैतन्‍याचे स्‍त्रोत आहेत. आज मशिदींवरील अनधिकृत भोंग्‍यांना विरोध म्‍हणून का होईना; पण मंदिरांमध्‍ये हनुमान चालिसाचे पठण होऊ लागले आहे. अनेक मंदिरांमध्‍ये महाआरती होत आहे. आता आपण मंदिरे ही सामूहिक उपासना केंद्रे बनण्‍यासाठी संघटितपणे प्रयत्न करायला हवा. मंदिरे ही उपासनेची केंद्रे झाली, तर त्‍या माध्‍यमातूनच समाजाचे आध्‍यात्मिक बळही वाढेल. मंदिरे टिकली, तरच धर्म टिकेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍यांचे समन्‍वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. त्‍यांनी अधिवेशनाच्‍या पाचव्‍या दिवशी आयोजित केलेल्‍या दुसर्‍या सत्रात ‘मंदिर विश्‍वस्‍त आणि पुजारी यांना संघटित करणे’, या विषयावर अनुभव कथन केले.

ग्रामरक्षादल स्‍थापन करून राष्‍ट्र आणि धर्म रक्षणाची भावना युवकांमध्‍ये निर्माण करणे आवश्‍यक ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्‍हा समन्‍वयक, हिंदु जनजाजगृती समिती

प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्‍हा समन्‍वयक, हिंदु जनजाजगृती समिती

सद्य:स्‍थितीत हिंदूंना अत्‍याचाराला सामोरे जावे लागत आहे. शिवरायांनी मावळ्‍यांना संघटित करून हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना केली, त्‍याप्रमाणे रणनीती निश्‍चित करून हिंदूंनी हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी कार्य करायला हवे. यासाठी प्रत्‍येक गावात ग्रामरक्षादल स्‍थापन करून युवक-युवती यांच्‍यामध्‍ये राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या रक्षणाची भावना निर्माण करणे आवश्‍यक आहे. गावातील सर्व युवक-युवती यांना स्‍वरक्षण प्रशिक्षण द्यायला हवे. गावावर कोणते संकट आल्‍यास ग्रामरक्षादल स्‍वत:सह गावाचे रक्षण करेल. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने स्‍वरक्षण प्रशिक्षण विनामूल्‍य देण्‍यात येते. मंदिरे ही हिंदूंची शक्‍तीस्‍थाने आहेत. ‘धर्मांध प्रथम मंदिरांवर आक्रमण करतात’, हे लक्षात घेऊन मंदिरांच्‍या रक्षणाचे नियोजनही ग्रामरक्षादलाने करायला हवे. ‘मी हिंदु आहे आणि राष्‍ट्र अन् धर्म यांचे रक्षण करणे माझे कर्तव्‍य आहे’, ही भावना युवक-युवती यांमध्‍ये निर्माण करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्‍हा समन्‍वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. ‘ग्रामरक्षादलाच्‍या स्‍थापनेची आवश्‍यकता’ या विषयावर श्री. जुवेकर यांनी मार्गदर्शन केले.

‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना’ हेच युवकांचे ‘करिअर’ असायला हवे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

सद्य:स्‍थितीत युवक-युवती स्‍वत:च्‍या ‘करिअर’च्‍या (भवितव्‍याच्‍या) मागे लागले आहेत; परंतु आज राष्‍ट्राचे ‘करिअर’ धोक्‍यात आहे. राष्‍ट्राचे ‘करिअर’ धोक्‍यात असेल, तर आपले ‘करिअर’ कसे घडेल ? छत्रपती शिवाजी महाराज, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी बालवयात राष्‍ट्र आणि धर्म कार्यासाठी जीवन समर्पित केले. त्‍यांना स्‍वत:चे ‘करिअर’ नव्‍हते का ? त्‍यांचा आदर्श घेऊन ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना’ हेच युवकांचे ‘करिअर’ असायला हवे. धर्मकार्यामध्‍ये योगदान देणारे युवक निर्माण व्‍हावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हिंदु राष्‍ट्रवीर’ निर्माण करण्‍याचे कार्य चालू आहे. हिंदूंना स्‍वरक्षणाचे प्रशिक्षण देण्‍याची व्‍यवस्‍था नाही. त्‍यामुळे हिंदूंची दु:स्‍थिती झाली आहे. हिंदु जनजगाती समितीच्‍या वतीने युवक-युवती यांना विनामूल्‍य स्‍वरक्षण प्रशिक्षण देण्‍यात येत आहे. सद्य:स्‍थितीत महाराष्‍ट्र, कर्नाटक आणि गोवा येथे ९५ स्‍वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्‍यात येत आहेत. याचा लाभ ४०० हून अधिक युवक-युवती घेत आहेत. शौर्याला शक्‍तीचे बळ मिळावे, यासाठी समितीच्‍या वतीने ठिकठिकाणी ‘बलोपासना सप्‍ताह’ आयोजित करण्‍यात आले. यामध्‍ये बलोपासनेसह श्रीराम, हनुमान यांचे नामस्‍मरण करण्‍यात आले. यामध्‍ये ५८० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले होते. काळानुसार घराघरांत हिंदु राष्‍ट्राचा विचार पोचवण्‍याचे कार्य हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने करण्‍यात येत आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी दिली. ‘शौर्य जागरण उपक्रमाच्‍या माध्‍यमातून युवकांचे संघटन होण्‍यासाठीचे प्रयत्न’ या विषयावर ते बोलत होते.

आपत्‍काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्‍या रक्षणासाठी कार्य करायला हवे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

पुढे येणार्‍या भीषण आपत्‍काळात हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि साधक यांना सात्त्विक व्‍यक्‍तींना वाचवण्‍याचे प्रमुख कार्य असेल. आपत्तीमध्‍ये फसलेल्‍या सज्‍जन हिंदूंना सर्वतोपरी साहाय्‍य करावे. हे सर्व कार्य कोणत्‍याही एका संघटनेचे किंवा व्‍यक्‍तीचे नाही. आपत्‍काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्‍या रक्षणासाठी हे कार्य करायला हवे. असेे करणे म्‍हणजे समाजऋण फेडण्‍यासारखेच आहे आणि यातून आपली साधनाही होणार आहे. आपत्‍काळात होणार्‍या या भीषण हानीमुळे काहीजण दु:खी होतील, तर काहींना ‘ही हानी रोखण्‍यासाठी ईश्‍वर काही करणार नाही का ?’ असा प्रश्‍न पडेल. आपण लक्षात घेतले पाहिजे की, हा आपत्‍काळ जगभरात ईश्‍वरी राज्‍य स्‍थापन होण्‍याच्‍या दृष्‍टीने ईश्‍वरानेच घडवून आणलेली योजना आहे. पृथ्‍वीवरील रज-तमाचा भार हलका करून सत्त्वगुणाचे प्राबल्‍य निर्माण करण्‍यासाठी ईश्‍वराने केलेली उपाययोजना आहे; म्‍हणजे सज्‍जन लोकांच्‍या दृष्‍टीने हा आपत्‍काळ इष्‍टापत्तीसारखा ठरणार आहे. त्‍यामुळे ‘आपत्‍काळ योग्‍य कि अयोग्‍य ?’, याचा विचार न करता ‘या आपत्‍काळातून तरून जाण्‍यासाठी आणि हिंदुरक्षणाचे कार्य करून ईश्‍वरकृपा संपादन करण्‍याची संधी आहे’, असा विचार हिंदू समाजाने करायला हवा, असे प्रतिपादन सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी येथे केले. ‘सनातन संस्‍थेचे आवाहन ! : हिंदु सामज आपतकालाची सिद्धता करणे’ या विषयावर ते बोलत होते.

अधिवेशनाच्या या सत्राची झलक

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *