भारताला हिंदु राष्ट्र होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ! – पू. श्रीरामज्ञानीदास महात्यागी, संस्थापक, तिरखेडी आश्रम, गोंदिया, महाराष्ट्र
रामनाथी : ज्यांची शारीरिक क्षमता आहे, त्यांनी शरिराने, बौद्धिक क्षमता आहे त्यांनी बुद्धीने, अशा प्रकारे प्रत्येकाने स्वत:च्या क्षमतेने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान देणे आवश्यक आहे. केवळ भाषण देऊन नाही, तर प्रत्यक्ष योगदान देऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. समाज परिवर्तनशील आहे. आता परिवर्तनाची वेळ आली आहे. भारताला हिंदु राष्ट्र होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील गोंदिया येथील तिरखेडी आश्रमाचे संस्थापक पू. श्रीरामज्ञानीदास महात्यागी यांनी केले. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये ‘हिंदु संस्कृती’ या उद़्बोधन सत्रात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात संतांचे योगदान’ या विषयावर बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी व्यासपिठावर बंगाल येथील भारत सेवाश्रम संघाचे स्वामी संयुक्तानंद महाराज, अरुणाचल प्रदेश येथील ‘बांबू संसाधन आणि विकास संस्थे’चे उपाध्यक्ष श्री. कुरु थाई आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधकार्य विभागाच्या सौ. श्वेता शॉन क्लार्क या उपस्थित होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड येथील समन्वयक श्री. हेमंत कानसकर यांनी पू. श्रीरामज्ञानीदास महाराज यांचा सत्कार केला.
या वेळी पू. श्रीरामज्ञानीदास महात्यागी म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत ‘करा किंवा मरा’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. भारत हे हिंदु राष्ट्र होते, आहे आणि राहील; परंतु भारताला राज्यघटनात्मक हिंदु राष्ट्राचा दर्जा मिळायला हवा, यासाठी आपण एकत्र आलो आहोत. आपण समाजासाठी, धर्मासाठी कुटुंब सोडले आहे. कुणी रागवले तरी आपल्या ध्येयापासून विचलीत होऊ नका. भारतात नैतिकता आणि संस्कार संपले आहेत. भारतात जातीवाद, प्रांतवाद आदी निर्माण झाला आहे. हे रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र करणे अतिशय आवश्यक आहे. संस्कार बिघडले, तर काम कितीही मोठे असले तरी बिघडते; परंतु संस्कार असतील तर कितीही बिघडलेले काम सुधारता येते. प्रभु श्रीराम स्वत: धर्माचे रूप होते. त्यामुळे भारताची राज्यघटना ‘श्रीमराचरितमानस’ यावर आधारित असावी.’’
गोंदियातील धर्मांतर बंद झाले !
हिंदु राष्ट्राची स्थापना ऋषी आणि कृषी यांच्या आधारे व्हायला हवी. वर्ष १९९७ मध्ये मी गोंदियामध्ये आलो, तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत होत. हे पाहून ‘जोपर्यंत गोंदियातील धर्मांतर थांबणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही’, असा मी निश्चय केला. सद्य:स्थितीत गोंदियातील धर्मांतर बंद आहे.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्यक्ष योगदान द्या !
‘पाऊस कधी पडणार ?’ हे पंचांगावरून सांगता येथे; परंतु पंचागांचे पुस्तक कितीही पिळले, तरी त्यातून पाऊस पाडता येत नाही. त्यामुळे पुस्तकाच्या पानांवरून आणि व्यासपिठावरून परमात्मा शोधत राहू नका, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्यक्ष योगदान द्या, असे आवाहन पू. श्रीरामज्ञानीदास महात्यागी यांनी केले.
आपले नाव हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या योगदानामध्ये असूद्या !
‘जंगलात आग लागली, तेव्हा एक चिमणी चोचीतून पाणी आणून आग विझवत होती. त्या वेळी कुणीतरी चिमणील विचारले, ‘या पाण्याने आग विझेल का ?’ त्यावर चिमणी म्हणाली, ‘‘मी आणत असलेल्या पाण्याने आग विझणार नाही, हे मला ठाऊक आहे; परंतु जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझे नाव आग लावणार्यांमध्ये नसेल, तर आग विझवणार्यांमध्ये असेल.’’ त्याप्रमाणे आपले नाव हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या योगदानामध्ये असू द्या, असे आवाहन पू. श्रीरामज्ञानीदास महात्यागी यांनी केले.
‘हिंदूंना संघटित करणे, तसेच भारतीय परंपरा जोपासण्यासाठी भारत सेवाश्रम संघ प्रयत्नरत ! – स्वामी संयुक्तानंद महाराज, भारत सेवाश्रम संघ, बंगाल
बंगालमधील कोलकाता येथे प्रखर देशप्रेमी संत आचार्य श्रीमद़् स्वामी प्रणवानंद महाराज यांनी भारत सेवाश्रम संघाची वर्ष १६१७ मध्ये स्थापना केली. आमचा संघ निःस्वार्थ कर्मयोगी आणि मानवतेला साहाय्य करण्यासाठी समर्पित आहे. भारत आणि विदेश येथे या संघाचे एकूण ४६ केंद्रे आहेत. आमच्या संघाचे देशविदेशांत कार्य चालू आहे. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी हिंदूंना संघटित करण्यासाठी गणेशोत्सव चालू केला, त्याप्रमाणे आमच्या संघाद्वारे आम्ही बंगालमध्ये गणेशोत्सव चालू करून हिंदूंना संघटित करण्याचे कार्य केले. भारत सेवाश्रम संघाच्या वतीने रामायणाचा अनुवाद करून त्याचे ग्रंथ सिद्ध केले. लहान मुलांसाठी रामायणाचे २ ग्रंथ सिद्ध केले आहेत. बंगालमधील गावागावांत रामायणाची पारायणे चालू केली, तसेच रामायणाच्या पारायणासाठी आंतरराष्ट्रीय परिषदही आयोजित केली. समाजात ज्यांना मुलांचा आधार नाही, अशा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम बांधले. भारत सेवाश्रम संघाच्या वतीने आमच्या आश्रमात सूर्यनमस्कार, योगासने आणि लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी शिबिरे आयोजित केली जातात. मुलांना मी आश्रमाचे व्यवस्थापन शिकवले आहे. ते आश्रमाचे कामकाज सांभाळत आहेत. भारत सेवाश्रम संघ नुसते बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवतो. त्यामुळे संघाला केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘हिंदूंना संघटित करणे, संस्कृती आणि भाषा यांचे संवर्धन करणे, तसेच भारतीय परंपरा जोपासण्यासाठी संघ प्रयत्न करत आहे. हिंदुत्वासाठी आमचा आश्रम आहे. धर्म आणि संस्कृती यांचे संवर्धन करण्यासाठी लढाई लढायला हवी. संत आचार्य श्रीमद़् स्वामी प्रणवानंद महाराज आशीर्वादामुळे बंगालमधील हिंदू जागृत होत आहेत. बंगालमधील सरकार हिंदूंचे शोषण करत आहेत; मात्र हिंदु संघटित होत असल्यामुळे हे शोषण लवकर संपेल.
साधना अन् गुरुकार्य करण्यासाठी दैवी बालके उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतात ! – सौ. श्वेता शॉन क्लार्क, शोधकार्य विभाग, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा
‘दैवी बालक’ ही सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची संकल्पना आहे. उच्च लोकांतून साधना आणि गुरुकार्य करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेणारी बालके, म्हणजे दैवी बालके आहेत. ही दैवी बालके पृथ्वीवर येणे म्हणजे दिव्य आणि अद़्भुत अशी घटना आहे. दैवा बालके सुंदर आणि तेजस्वी असतात. त्यांच्या हसण्या-बोलण्याने ती सर्वांची मने लगेच आकर्षून घेतात. दैवी बालकांमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अल्प असते. यांचा स्वभाव मुळात सात्त्विक असतो. यांचे मन निर्मळ आणि बुद्धी प्रगल्भ असते. ती आचारधर्माचे पालन करतात. ही बालके सात्त्विक व्यक्ती आणि संत यांच्याकडे त्वरित आकर्षित होतात. त्यांच्यात साधनेसाठी आवश्यक असलेले आध्यात्मिक गुण (उदा. दृढता, नम्रता, शिकण्याची वृत्ती) लहानपणापासूनच असतात. या बालकांना पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, म्हणजे सूक्ष्मातील गोष्टी समजतात. या बालकांमध्ये आध्यात्मिक उपाय करण्याची क्षमता असते. अन्य बालकांच्या तुलनेत ही बालके भिन्न आहेत. दैवी बालकांमुळे अध्यात्मिक अनुभती येते. दैवी बालकांना ईश्वराच्या प्रती भाव असतो. ही बालके जिज्ञासू असल्याने अनेक प्रश्न विचारतात. दैवी बालक मानसिक स्तरावर नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावर विचार करतात. त्यांची ऐकण्याची वृत्ती असते, तसेच ते शांत स्वभावाचे असतात, अशी माहिती ‘दैवी बालकांसंबधींचे शोधकार्य’ याविषयी बोलतांना गोवा येथील महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयातील शोधकार्य विभागाच्या सौ. श्वेता शॉन क्लार्क यांनी दिली.
अरुणाचल प्रदेशातील धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मांत आणू ! – कुरु थाई, उपाध्यक्ष, बांबू संशोधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश
नागालँडमध्ये ख्रिस्त्यांनी हिंदूंना धर्मांतरित केले. त्यानंतर आता ख्रिस्त्यांनी अरुणाचल प्रदेशातील हिंदूंना धर्मातरित करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. ख्रिस्त्यांकडून अशिक्षित आणि गरीब हिंदू, महिला यांना लक्ष्य करण्यात येत आहे. ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर सरकारने रोखायला हवे. महिलांचे धर्मांतर करून त्या कुटुंबाचे धर्मातर करण्यासाठी प्रयत्न केला जातो. धर्मांतर करून कुटुंबामध्ये कलह निर्माण केला जातो. मंदिरातील पुजार्यांना देण्यासाठी पैसे नसल्यामुळे पुजारी चर्चमध्ये जातात. असे करून आपल्या संस्कृतीवर घाला घातला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंडामध्ये भगवान परशुरामाच्या मूर्तीची स्थापना केल्यावर ख्रिस्ती आणि काँग्रेस यांनी त्याला विरोध केला. परशुराम कुंड हे पुरातन काळापासून असूनही त्याला विरोध केला जात आहे. केंद्रशासनाकडून येथील पुरातन हिंदु संस्कृतीचा विकास करण्यासाठी प्रयत्न केल्यावर ‘अरुणाचल ख्रिश्चन फोरम’कडून याला विरोध करण्यात आला; परंतु आम्ही मागे हटणार नाही. अरुणाचल प्रदेशमाध्ये ८० टक्के हिंदू आहेत. धर्मांतराच्या विरोधात आम्ही आवाज उठवू. अरुणाचल प्रदेशातील धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मांत आणू, अशी ग्वाही अरुणाचल प्रदेश सरकारच्या ‘बांबू संशोधन आणि विकास संस्थे’चे उपाध्यक्ष श्री. कुरु थाई यांनी दिली. ‘अरुणाचल प्रदेशातील हिंदूंपुढील समस्या आणि उपाय’ या विषयावर ते बोलत होते.