Menu Close

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात धर्माधारित शिक्षणपद्धती अवलंबण्‍याची आग्रही मागणी

डावीकडून श्री. संदीप शिंदे, श्री, मंजुनाथ बी. आणि प्रा. डॉ. मनोज कामत

प्रगत प्राचीन हिंदु संस्‍कृतीचे शिक्षण दिल्‍यानंतर आपण भोगवादी आणि भौतिकतेशी लढू शकतो ! – प्रा. डॉ. मनोज कामत, प्राचार्य, श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय, काणकोण, गोवा

प्रा. डॉ. मनोज कामत, प्राचार्य, श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय, काणकोण, गोवा

सध्‍याच्‍या शिक्षणातून पैसा आणि भौतिक सुख मिळते. प्रगत प्राचीन हिंदु संस्‍कृतीचे शिक्षण दिल्‍यानंतर आपण भोगवादी आणि भौतिकतेशी लढू शकतो. सध्‍याचे पाठ्यक्रम परिपूर्ण विद्यार्थी बनवण्‍यात अल्‍प पडत आहेत. त्‍यामुळे सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनाखाली माझ्‍या महाविद्यालयात सनातन अभ्‍यासक्रम विकसित केला. या अभ्‍यासक्रमाच्‍या माध्‍यमांतून सनातन मूल्‍यांची शिकवण आणि पद्धतींचा परिचय करून देण्‍यात आला आहे. यासह या अभ्‍यासक्रमात ‘साधना आणि अध्‍यात्‍म, संस्‍कृतीनुसार आचरण’, ‘भारतीय संस्‍कृतीची वैशिष्‍ट्ये, ‘स्‍वभावदोष निर्मूलन आणि व्‍यक्‍तीमत्‍व विकास’ आदी अनेक विषयांची माहिती विद्यार्थ्‍यांना दिली आहे, असे प्रतिपादन येथील श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी केले. ‘वर्तमान महाविद्यालयांत भारतीय संस्‍कृती आधारित शिक्षण देण्‍याच्‍या हेतूने करावयाचे प्रयत्न’ या विषयावर ते बोलत होते.

डॉ. कामत पुढे म्‍हणाले की, आपण ७५ वर्षांत विकास केला; मात्र विकसित झालो नाही. धर्मशिक्षण घेऊन आपण संस्‍कृतीचे रक्षण केले नाही, हे दुर्दैवी आहे. आपण पदवी घेतो; मात्र आपल्‍यात चेतना निर्माण करण्‍यात आपण सक्षम झालो नाही. त्‍यामुळे आपली शिक्षण व्‍यवस्‍था अयशस्‍वी झाली आहे. आपले शिक्षण अयशस्‍वी झाले आहे. हिंदू स्‍वतःच्‍या मुलांना मिशनरींच्‍या शाळांत शिक्षण घेण्‍यासाठी पाठवतात. जर्मनी येथील विद्यापिठांत संस्‍कृतचे शिक्षण दिले जाते; मात्र भारतातील विद्यापिठांत संस्‍कृत नव्‍हे, तर जर्मन भाषा शिकवली जात आहे. सध्‍याची शिक्षण व्‍यवस्‍था हिंदु राष्‍ट्राचे शिक्षण देते का ? याचा विचार करून आपल्‍याला काय हवे याचा विचार करून नवीन शिक्षण व्‍यवस्‍था निर्माण करायला हवी. जेणेकरून मुलांना आपली संस्‍कृती आणि राष्‍ट्रनिष्‍ठा शिकवली जाईल. संस्‍कृती नष्‍ट करून यांत्रिकी पद्धतीचे शिक्षण दिले जात आहे. यातून केवळ नोकरदार वर्ग सिद्ध होतो. यातून नवीन विचारवंत निर्माण होत नाहीत.

सनातन आश्रम पाहिल्‍यानंतर विद्यार्थ्‍यांमध्‍ये झालेले पालट !

‘माझ्‍या महाविद्यालयातील काही विद्यार्थ्‍यांना सनातन आश्रम पहाण्‍यासाठी आणले. सनातन आश्रमाचे व्‍यवस्‍थापन आणि आध्‍यात्मिक माहिती पाहून विद्यार्थी भारावून गेले. विद्यार्थ्‍यांच्‍या विचारांमध्‍ये पालट झाला. ते ग्रंथालयात जाऊन आध्‍यात्मिक ग्रंथांचे वाचन करू लागले. विद्यार्थ्‍यांसाठी भारतीय संस्‍कृती, अध्‍यात्‍म, नीतीमूल्‍ये आणि राष्‍ट्र उभारणी, या विषयांवर ‘ऑनलाईन’ प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम चालू केला आहे.’ – प्रा. डॉ. मनोज कामत, प्राचार्य, श्री मल्लिकार्जुन महाविद्यालय, काणकोण, गोवा.

आधुनिक तंत्रज्ञानाचा हिंदु धर्माच्‍या प्रसारासाठी वापर केला पाहिजे ! – संतोष केचंबा, संस्‍थापक, राष्‍ट्र धर्म संघटना, बेंगळुरु

संतोष केचंबा, संस्‍थापक, राष्‍ट्र धर्म संघटना, बेंगळुरु

रामनाथी : ज्ञान आणि आध्‍यात्मिकता यांमुळे हिंदु ओळखला जातो. सध्‍या अस्‍थिर, अनिश्‍चित, जटील आणि भविष्‍याविषयीची अस्‍पष्‍टता असलेल्‍या जगात आपण वावरत आहोत, हे युक्रेन-रशिया युद्ध, कोरोना महामारी, हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या ठिकठिकाणी होत असलेल्‍या हत्‍या यांतून लक्षात येते. यासाठी ऋषी-मुनींनी जो हिंदु धर्माचा पाया घातला, तो जाणून घ्‍यायला हवा, असे प्रतिपादन बेंगळुरु येथील राष्‍ट्र धर्म संघटनेचे संस्‍थापक संतोष केचंबा यांनी केले. ते दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात १६ जून या दिवशी ‘सद्यःस्‍थितीत धर्माधारित शिक्षणव्‍यवस्‍थेचा अवलंब कसा करावा’, या विषयीच्‍या सत्रात बोलत होते.
श्री. केचंबा पुढे म्‍हणाले, ‘‘सध्‍याच्‍या काळात भारतात सामाजिक माध्‍यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या माध्‍यमातून सामान्‍य हिंदु आणि युवा यांच्‍यापर्यंत धर्मशिक्षणाचा प्रसार केला गेला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा हिंदु धर्माच्‍या प्रसारासाठी वापर केला पाहिजे. हिंदु धर्माचे विरोधकही सामाजिक माध्‍यमांवर जागृत असतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍यापासून सावध रहायला पाहिजे. हिंदुत्‍वाचे कार्य करण्‍यासाठी तांत्रिक साहाय्‍य हवे असल्‍यास मला संपर्क करू शकता.’’

अधिवेशनातील आध्‍यात्मिक ऊर्जा पाहून हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची निश्‍चिती वाटते ! – संतोष केचंबा

‘आतापर्यंत अनेक कार्यक्रमांना मी गेलो आहे; परंतु मी आणि माझे सहकारी यांना येथे एक गोष्‍ट प्रकर्षाने जाणवली, ती म्‍हणजे येथील उत्तम समन्‍वय ! अधिवेशनातील अनेकांचा एका वेळी चांगल्‍या प्रकारे समन्‍वय करणे, हे येथील वैशिष्‍ट्य आहे. भारतीयत्‍व आणि आध्‍यात्मिकता यांच्‍या संगमातून उगम होणारा उत्तम समन्‍वय येथे दिसून येत आहे. ‘मी भव्‍य हिंदु राष्‍ट्र बघू शकेल का ?’, असे मला वाटत होते. येथील हिंदूंची संघटनशक्‍ती आणि आध्‍यात्मिक ऊर्जा पाहून हिंदु राष्‍ट्र नक्‍कीच पाहीन, याची मला निश्‍चिती वाटते.’

जागृत हिंदूच हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करू शकतील ! – मंजुनाथ बी., अध्‍यक्ष, बजरंग सेना, कर्नाटक

मंजुनाथ बी., अध्‍यक्ष, बजरंग सेना, कर्नाटक

सध्‍याच्‍या हिंदूंची स्‍थिती दूर करण्‍यासाठी हिंदु समाजाला जागृत करण्‍याची आवश्‍यकता आहे. जागृत हिंदूच हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करू शकतील. आमची संघटना गोरक्षण करते. गेल्‍या ४ वर्षांत ३ सहस्र गायींचे रक्षण आम्‍ही केले आहे. केरळमधून ४ ते ५ सहस्र गायींची तस्‍करी केली जाते. ते थांबवण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्नरत आहोत. गोरक्षण करत असल्‍याने आमच्‍या कार्यकर्त्‍यांवर ३५ गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत. आमची संघटना ‘लव्‍ह जिहाद’च्‍या संदर्भातही कार्य करते. कर्नाटकमधील शाळा-महाविद्यालयांमध्‍ये ‘स्‍मॉल फ्रेंड्‍स ग्रुप’ नावाचे गट कार्यरत आहेत. मुलींनी रिचार्ज केल्‍यावर लगेचच त्‍या गटात मुलीचा भ्रमणभाष क्रमांक जातो आणि पुढील १०-१५ दिवसांत मुलीचे धर्मांतर केले जाते. हिंदू मुलींना धर्मशिक्षण देण्‍याची आवश्‍यकता आहे; अन्‍यथा हिंदु कुटुंबांची मोठी हानी होऊ शकते.

कर्नाटक सरकार तेथील ३५० मंदिरे पाडणार होते, जे आम्‍ही थांबवले. कर्नाटकातील काँग्रेस सरकार टिपू जयंती साजरी करण्‍याचा प्रयत्न करत होते. त्‍याला आम्‍ही विरोध केला. परिणामी सरकारला झुकावे लागले. टिपू सुलतानने कर्नाटकातील अंजनेय मंदिर उद़्‍ध्‍वस्‍त करून तेथे मिनार उभारले. त्‍या ठिकाणी आता नमाजपठण केले जाते. त्‍याला आमचा विरोध असून ते थांबण्‍यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांविषयी काढलेले कौतुकोद़्‍गार !

‘सनातनचा १ कार्यकर्ता हा अन्‍य संघटनांच्‍या १०० कार्यकर्त्‍यांप्रमाणे आहे. बाह्यतः शांत दिसणारे कार्यकर्ते पुष्‍कळ कष्‍ट घेत आहेत.’ – मंजुनाथ बी., अध्‍यक्ष, बजरंग सेना, कर्नाटक

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’तून बाहेर पडणारा विद्यार्थी संतपद गाठलेला असेल ! – संदीप शिंदे, केंद्रीय समन्‍वयक, सनातन अध्‍ययन केंद्र

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी संस्‍थापित केलेले ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय’ हे भविष्‍यात असे एक विश्‍वविद्यालय असेल की, जे नालंदा, तक्षशिला यांसारख्‍या विद्यापिठांसम हिंदु तत्त्वज्ञान, संस्‍कृती, अध्‍यात्‍म आदी विषयांवर विद्यार्थ्‍यांना परिपूर्ण शिक्षण देईल, त्‍यांच्‍याकडून प्रत्‍यक्ष साधना करवून घेईल. एवढेच नाही, तर या विद्यापिठातून बाहेर पडणारा प्रत्‍येक विद्यार्थी हा ‘संतपद’ गाठलेला असेल. पुढे भविष्‍यात अशी आध्‍यात्मिक पदवी प्राप्‍त करून देण्‍याचे उच्‍चतम ध्‍येय ठेवणारे, हे विश्‍वातील एकमेव विश्‍वविद्यालय होईल ! खर्‍या अर्थाने मानवी जीवनाच्‍या ध्‍येयाकडे नेणारे हे विश्‍वविद्यालय असेल ! या विश्‍वविद्यालयाची पायाभरणी साक्षात् अवतारी पुरुष परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या शुभहस्‍ते झाल्‍याने हे ध्‍येय निश्‍चितच पूर्णत्‍वास जाईल, यात काही शंका नाही. सध्‍या महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या निर्मितीची प्रक्रिया चालू झाली आहे. या विश्‍वविद्यालयाचे एक अंग असलेले ‘आध्‍यात्मिक  संशोधन केंद्र’ गेल्‍या काही वर्षांपासून कार्यान्‍वित झालेले आहे. या संशोधन केंद्रातून अध्‍यात्‍म, धर्म, यज्ञ-याग आदी विविध विषयांवर मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक संशोधन चालू आहे. आतापर्यंत या केंद्राच्‍या माध्‍यमातून विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करण्‍यात आले आहे. या संशोधनासाठी शेकडो विषयांवरील प्रयोगांच्‍या सहस्रोहून नोंदी घेण्‍यात आल्‍या आहेत, असे प्रतिपादन सनातन अध्‍ययन केंद्राचे केंद्रीय समन्‍वयक श्री. संदीप शिंदे यांनी केले. ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय’ : अभ्‍यासक्रमांच्‍या माध्‍यमातून हिंदु संस्‍कृतीचा प्रसार’ या विषयावर ते बोलत होते.
श्री. संदीप पुढे म्‍हणाले की, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचा अभ्‍यासक्रम निश्‍चित होण्‍याची प्रकिया चालू असली, तरी आतापासूनच या विश्‍वविद्यालयाकडे विविध विद्यापिठे, महाविद्यालये, विद्यालये यांतून त्‍यांच्‍यासाठी अभ्‍यासक्रम बनवून देण्‍याची आणि विशेष कार्यशाळांची मागणी येऊ लागली आहे. सध्‍याच्‍या स्‍थितीला जगभरातील सहस्रो विद्यापिठांमध्‍ये सहस्रो विषय शिकवले जात आहे. यांपैकी एकाही विद्यापिठाच्‍या अभ्‍यासक्रमात ‘अध्‍यात्‍माच्‍या मार्गाने मानवी जीवनाचे ध्‍येय असलेली आनंदप्राप्‍ती कशी करावी ?’ याविषयी शिकवले जात नसेल. भौतिक विषय शिकून आपल्‍या ज्ञानात भर पडू शकते; मात्र त्‍यातून आपल्‍या जीवनात आपल्‍याला आनंद अनुभवता येऊ शकणार नाही. या दृष्‍टीनेच आम्‍ही प्रयत्नशील आहोत. याचाच एक भाग म्‍हणून आम्‍ही सध्‍या काही अभ्‍यासक्रम निश्‍चित करून आरंभ केला आहे.

केंद्र सरकारच्‍या ‘मूल्‍य प्रवाह’ अर्थात ‘व्‍हॅल्‍यू एज्‍युकेशन’ या उपक्रमाअंतर्गत विविध विद्यापिठांना अभ्‍यासक्रम आरंभ करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. या दृष्‍टीने पुढील महाविद्यालये आणि संस्‍था यांनी आमच्‍याकडून साहाय्‍य मागितले आहे…
१. सर्वप्रथम आम्‍हाला मुंबई येथील ‘के.जे. सोमय्‍या कॉलेज ऑफ सायन्‍स अ‍ॅण्‍ड कॉमर्स’कडून मागणी आली. त्‍यानुसार आम्‍ही अभ्‍यासक्रमाची अनुक्रमणिका अंतिम करून या महाविद्यालयाला पाठवली.
२. ‘व्‍यक्‍तिमत्‍व विकासाचे माध्‍यम’ हा अभ्‍यासक्रम ‘अ‍ॅकॅडेमिक कौन्‍सिल ऑफ के.जे. सोमय्‍या कॉलेज’ यांच्‍याकडे नोंदणीसाठी पाठवण्‍यात आला आणि काही दिवसांतच या अभ्‍यासक्रमाला या कौन्‍सिलकडून मान्‍यताही मिळाली.
३. देहली विद्यापिठाकडूनही आम्‍हाला सोमय्‍या महाविद्यालयामधील ‘चरित्रपुष्‍प’ या अभ्‍यासक्रमाची मागणी करण्‍यात आली आहे.
४. गोव्‍यातील काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन आणि चेतन मंजु देसाई महाविद्यालयाने महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाकडे भारतीय संस्‍कृतीवर आधारित एक अभ्‍यासक्रम चालू करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली.
५. प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील रुद्रप्रयाग विद्या मंदिर यांनी आमच्‍याकडे इयत्ता ५ ते ८ वी च्‍या विद्यार्थ्‍यांसाठी एक आणि इयत्ता ९ वी ते १२ वी च्‍या विद्यार्थ्‍यांसाठी एक अशा २ वयोगटांसाठी २ अभ्‍यासक्रमांची मागणी केली. यानुसार आम्‍ही २ अभ्‍यासक्रम बनवण्‍याची प्रक्रिया आरंभ केली आहे. या दोन्‍ही वयोगटांसाठी प्रत्‍येकी एक प्राथमिक विषय मांडून अभ्‍यासक्रमाला आरंभ झाला आहे.
६. भारतीय विद्या भवन, देहली या नामवंत स्‍वायत्त विद्यापिठाने महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाने संगीत आणि अध्‍यात्‍म यांवर केलेले वैशिष्‍ट्यपूर्ण संशोधन अभ्‍यासक्रमाच्‍या स्‍वरूपात उपलब्‍ध करून देण्‍याची विनंती केली होती. यानुसार आम्‍ही ‘अध्‍यात्‍मावर आधारित संगीतशास्‍त्र’ हा २६ घंट्यांचा अभ्‍यासक्रम बनवला असून तो लवकरच कार्यान्‍वित होईल.
७. ‘राष्‍ट्रीय उच्‍च स्‍तर अभियाना’ने (RUSA) गुरुनानक खालसा महाविद्यालय, माटुंगा, मुंबई येथे ‘आध्‍यात्मिक साक्षरता’ (spiritual literacy) या विषयावर महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या २ दिवसीय कार्यशाळेला मान्‍यता दिली असून केंद्र शासनाने या कार्यशाळेसाठी अनुदान देण्‍यास मान्‍यता दिली आहे. वर्ष २०२२-२३ मध्‍ये ही कार्यशाळा घेण्‍यात येणार आहे.
८. मध्‍यंतरी बडोदा येथील सयाजीराव गायकवाड विद्यापिठाच्‍या सिनेट सदस्‍याने अध्‍यात्‍मावर आधारित एखादा अभ्‍यासक्रम त्‍यांच्‍या विद्यापिठातही चालू करता येईल का, अशी विचारणा केली होती.
९. मंदिर व्‍यवस्‍थापन : सध्‍या मंदिरे भक्‍तांच्‍या हातात सोपवण्‍याची प्रक्रिया काही राज्‍य सरकारांनी केली आहे, या पार्श्‍वभूमीवर अनेक मंदिर विश्‍वस्‍तांनी ‘मंदिरांचे सुव्‍यवस्‍थापन’ या विषयावर अभ्‍यासक्रम आणि त्‍यानुसार प्रत्‍यक्ष शिक्षण देण्‍याची व्‍यवस्‍था आहे का, अशी विचारणा केली आहे.
१०. गोशाळा – नव्‍याने गोशाळा चालू करण्‍यास इच्‍छुक असणार्‍यांनी महषिर्र् अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाकडे ‘गोशाळा कशी चालवावी’, याविषयी काही अभ्‍यासक्रम आहे का, अशीही विचारणा केली आहे. या प्राथमिक सूचना आमच्‍याकडे आल्‍या आहेत.

अधिवेशनाच्या या सत्राची झलक

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *