Menu Close

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’ला हिंदुत्‍वनिष्‍ठांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

डावीकडून श्री. रमेश शिंदे, श्री. चेतन राजहंस, सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, पत्रकारांना संबोधित करतांना श्रीमती एस्‍थर धनराज आणि श्री. अंकित साळगांवकर

‘इन्‍क्‍विझिशन’साठी व्‍हॅटिकनच्‍या चर्चच्‍या पोपने गोमंतकियांची क्षमा मागावी ! – श्रीमती एस्‍थर धनराज, भगवद़्‍गीता फाऊंडेशन फॉर वैदिक स्‍टडीज, तेलंगाणा

पणजी (गोवा) : ‘इन्‍क्‍विझिशन’च्‍या नावाखाली ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी २५० वर्षे गोमंतकियांवर केलेल्‍या अमानवी आणि क्रूर अत्‍याचारांविषयी व्‍हॅटिकन या ख्रिस्‍ती संस्‍थेचे प्रमुख पोप यांनी गोमंतकियांची जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी तेलंगाणा येथून दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनासाठी आलेल्‍या भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथील भगवद़्‍गीता फाऊंडेशन फॉर वैदिक स्‍टडीजच्‍या सहयोग निदेशक श्रीमती एस्‍थर धनराज यांनी केली. येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या समारोपीय पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्‍या.

या पत्रकार परिषदेला ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे, ‘गोमंतक हिंदु प्रतिष्‍ठान’चे अध्‍यक्ष श्री. अंकित साळगांवकर आणि ‘सनातन संस्‍थे’चे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस उपस्‍थित होते.

मिशनर्‍यांकडून होणार्‍या धर्मांतराच्‍या विरोधात कार्य करणार्‍या अभ्‍यासक श्रीमती एस्‍थर धनराज पुढे म्‍हणाल्‍या, ‘‘पोप जॉन पॉल द्वितीय यांनी यापूर्वी ज्‍यूंची हत्‍या, चर्चमध्‍ये महिलांना समान अधिकार न दिल्‍याविषयी महिलांची, आफ्रिकेतील लोकांना गुलाम बनवणे आदी अनेक कारणांसाठी क्षमा मागितली आहे. त्‍यांच्‍या क्षमायाचनेची सूची पुष्‍कळ मोठी आहे. क्षमा मागणे, हे त्‍यांच्‍यासाठी नवे नाही. गोव्‍यात ‘इन्‍क्‍विझिशन’च्‍या नावाखाली हिंदूंचा वंशविच्‍छेद करण्‍यात आला आहे, हा इतिहास आहे. अनेक इंग्रजी विचारवंतांनी हे सत्‍य स्‍वीकारले आहे. छोट्या-मोठ्या अनेक गोष्‍टींसाठी चर्चसंस्‍थेने क्षमा मागितली आहे. यामुळे त्‍यांनी गोव्‍यातील ‘इन्‍क्‍विझिशन’साठीही क्षमा मागावी, अशी अधिवेशनात सहभागी सर्व हिंदु संघटनांची मागणी आहे.’’

घटनात्‍मक मार्गाने हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍याचा हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचा संकल्‍प ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्‍हणाले, ‘‘घटनात्‍मक आणि संसदीय मार्गाने हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होऊ शकते, यावर दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’त भरवण्‍यात आलेल्‍या ‘हिंदु राष्‍ट्र संसदे’त सर्व हिंदू संघटनांचे एकमत झाले. त्‍यातून चांगले कायदेशीर प्रस्‍ताव तयार झाले आहेत. ते आम्‍ही केंद्र सरकारला देणार आहोत. त्‍यासह नेपाळलाही पुन्‍हा एकदा हिंदु राष्‍ट्र करण्‍यासाठी अधिवेशनातील हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी एकमताने समर्थन दिले आहे.
लोकप्रतिनिधींच्‍या संसदेप्रमाणे धर्महिताच्‍या विषयावर चर्चा करण्‍यासाठी धर्मप्रतिनिधींची ‘हिंदु राष्‍ट्र संसद’ या अधिवेशनात ३ दिवस भरवण्‍यात आली. या संसदेत संमत झालेले प्रस्‍ताव लोकप्रतिनिधींना पाठवले जातील. त्‍या आधारे भारतीय संसदेत चर्चा होऊ शकते, उदा. ‘कायद्यांची मांडणी भारतीय संस्‍कृतीनुसार व्‍हावी’, ‘गुरुकुल शिक्षण मंडळ स्‍थापन करावे’, ‘मंदिरातील पुजारी आणि वेदपाठशाळा यांना अर्थसाहाय्‍य द्यावे’, ‘अल्‍पसंख्‍यांक दर्जा हा वैश्‍विक पातळीच्‍या आधारे द्यावा’, तसेच ‘श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेला राष्‍ट्रीय ग्रंथ म्‍हणून मान्‍यता द्यावी.’’’

गोवा सरकारने धर्मांतरबंदी कायदा लागू करावा ! – अंकित साळगावकर, अध्‍यक्ष, गोमंतक हिंदु प्रतिष्‍ठान

गोव्‍यात शिवोली येथील बिलिवर्स पंथाच्‍या वतीने पास्‍टर ‘डॉमनिक अ‍ॅन्‍ड जो मिनिस्‍ट्री’ने गेल्‍या काही वर्षांत हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले आहे. ‘हिलींग’च्‍या नावाखाली हिंदूंना फसवून त्‍यांचे धर्मांतर करणारा हाच पाद्री स्‍वत: आजारी पडल्‍यावर मात्र रुग्‍णालयात जाऊन भरती झाला. हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. डॉम्‍निकचे दलाल गोव्‍यात मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत. त्‍यामुळे गोव्‍यात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अशी आमची मागणी आहे.

‘हलालविरोधी कृती समिती’च्‍या माध्‍यमातून जिल्‍ह्याजिल्‍ह्यांतून ‘हलाल अर्थव्‍यवस्‍थे’च्‍या विरोधात आंदोलन ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ची अनिवार्यता मुसलमानांसाठी आहे; अन्‍य धर्म-पंथियांसाठी नाही. तरीही ‘हलाल’ प्रमाणित मांस, तसेच उत्‍पादने भारतातील बहुसंख्‍य हिंदूंवर लादणे, हे ‘भारतीय संविधाना’ने दिलेल्‍या धर्मस्‍वातंत्र्याच्‍या, तसेच ग्राहक अधिकारांच्‍या विरोधात आहे. त्‍यामुळे १०० टक्‍के ‘हलाल’ प्रमाणित खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍या ‘मॅकडोनाल्‍ड’, ‘के.एफ्.सी.’ यांसारख्‍या बहुराष्‍ट्रीय आस्‍थापनांवर खटले दाखल केले पाहिजेत. ‘हलाल अर्थव्‍यवस्‍थे’ला विरोध करण्‍यासाठी प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या स्‍तरावर ‘हलालविरोधी कृती समिती’ची स्‍थापना होऊ लागली आहे. यातून ‘हलाल अर्थव्‍यवस्‍थे’च्‍या विरोधात आंदोलन उभे करण्‍याचे नियोजन आहे.

शहरांना असलेली आक्रमकांची नावे पालटण्‍यासाठी ‘केंद्रीय नामकरण आयोगा’ची स्‍थापना करावी ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

वास्‍को शहराचे नाव पालटून संभाजीनगर करण्‍याचीही मागणी

ज्‍या आक्रमकांना आम्‍ही लढा देऊन भारतातून हाकलले आहे, त्‍यांची नावे भारतातील शहरांना का द्यावीत ? त्‍यासाठी आम्‍ही केंद्रशासनाकडे ‘केंद्रीय नामकरण आयोगा’ची स्‍थापना करून देशभरातील नगरे, वास्‍तू, रस्‍ते, संग्रहालये इत्‍यादींना असलेली परकीय आक्रमकांची नावे पालटण्‍याची मागणी केली आहे. त्‍यानुसार ‘वास्‍को-द-गामा’ या परकीय आक्रमकाच्‍या नावावरून गोव्‍यातील शहराला दिलेले ‘वास्‍को’ हे नाव पालटून गोमंतकियांच्‍या रक्षणासाठी लढणारे ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे ‘संभाजीनगर’ हे नाव देण्‍यात यावे.

*** चौकट
हिंदुत्‍वनिष्‍ठांचा अपूर्व प्रतिसाद मिळालेल्‍या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’त भारतातील २६ राज्‍यांसह अमेरिका, हाँगकाँग, नेपाळ, फिजी आणि इंग्‍लंड येथील १७७ हून अधिक हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे ४०० हून अधिक प्रतिनिधी उपस्‍थित होते.

पणजी येथे झालेल्‍या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या समारोपीय पत्रकार परिषदेत झालेली प्रश्‍नोत्तरे

१. ख्रिस्‍ती धर्म आध्‍यात्मिकतेकडे नेत नसल्‍याने त्‍याचा त्‍याग करून हिंदु धर्म स्‍वीकारला ! – श्रीमती इस्‍थर धनराज

प्रश्‍न : (श्रीमती इस्‍थर धनराज यांना उद्देशून) तुम्‍ही हिंदु धर्म स्‍वीकारण्‍याचे कारण काय ?

उत्तर (श्रीमती इस्‍थर धनराज) : मी हिंदु धर्म स्‍वीकारण्‍यामागे पूर्णतः शैक्षणिक पार्श्‍वभूमी आहे. मी कट्टर ख्रिस्‍ती होते. मला ख्रिस्‍ती धर्माचा अभ्‍यास करून चर्च स्‍थापन करायचे होते. ख्रिस्‍ती धर्माचा शैक्षणिक अभ्‍यास करण्‍यासाठी अमेरिकेला गेले. तेथे ख्रिस्‍ती धर्माशी निगडित पुस्‍तकांचा अभ्‍यास केल्‍यावर ‘हा धर्म आध्‍यात्मिकतेकडे नेत नाही’, हे माझ्‍या लक्षात आले. त्‍यामुळे ख्रिस्‍ती धर्माचा त्‍याग करून हिंदु धर्म स्‍वीकारला.

२. जागृती आणि आंदोलन यांद्वारे हलाल प्रमाणपत्रावर बंदीसाठी प्रयत्न !

प्रश्‍न : हलाल प्रमाणपत्रासंदर्भात कृती समिती कसे काम करणार ?

उत्तर (श्री. रमेश शिंदे) : याविषयी हिंदूंमध्‍ये जागृती केली जाईल. कर्नाटकमध्‍ये याविषयी जागृती केल्‍यावर ‘युगादी’ उत्‍सवाच्‍या दुसर्‍या दिवशी तेथील मुसलमानांची ७५ टक्‍के दुकाने बंद होती. ‘झोमॅटो’ आस्‍थापनाने ‘अन्‍नाला धर्म नसतो’, असे म्‍हटले आहे, तर मग गोव्‍यातील पणजी शहरात ‘हलाल रेस्‍टॉरंट’ उभे रहाणे आश्‍चर्यकारक आहे.

भारतीय अन्‍न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अन् अन्‍न-औषध प्रशासन असतांना नव्‍या प्रमाणपत्राची आवश्‍यकता नाही. त्‍यामुळे हलाल प्रमाणपत्रावर बंदी आणण्‍यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी कर्नाटक उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट करण्‍यात आली असून २१ जून या दिवशी त्‍यावर सुनावणी होणार आहे.

३. प्रश्‍न : श्रीराम सेनेवर गोव्‍यात बंदी आहे. त्‍याविषयी तुमचे काय म्‍हणणे आहे ?

उत्तर (सद़्‍गुरु डॉ. पिंगळे) : गोवा सरकारने हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना सकारात्‍मक आश्‍वासन दिले आहे. आम्‍ही सरकारच्‍या निर्णयाची वाट पहात आहोत.

४. धर्मांतरबंदी कायदा आवश्‍यकच !

प्रश्‍न : गोव्‍यात धर्मांतरबंदी कायदा आणण्‍याची चर्चा चालू आहे. त्‍याविषयी तुमचे म्‍हणणे काय ?

उत्तर (सद़्‍गुरु डॉ. पिंगळे) : धर्मांतर हा मानवतेच्‍या विरोधातील गुन्‍हा आहे. सर्व धर्म समान आहेत, तर धर्मांतर का केले जाते ? मानवी अधिकार, जगाला प्रेम आणि शांती देण्‍याच्‍या गोष्‍टी करणार्‍या पंथाचे लोक ‘इन्‍क्‍विझिशन’ करतात. लोकांना प्रलोभने दाखवून आणि त्‍यांच्‍या गरिबीचा अपलाभ घेऊन धर्मांतर केले जात आहे. त्‍यामुळे धर्मांतरबंदी कायदा आवश्‍यक आहे. याविषयी अधिवेशनात प्रस्‍ताव पारित करण्‍यात आला आहे. स्‍थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आाणि खासदार यांनी याची मागणी सरकारकडे करावी. गोवा सरकारने धर्मांतरबंदी कायद्याचा प्रस्‍ताव संसदेत मांडावा.

५. भगवान परशुरामच गोव्‍याचे आराध्‍य !

प्रश्‍न : प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी ‘सेंट झेवियर’ना ‘गोयंचो साब’ म्‍हणण्‍यास विरोध केला आहे. त्‍याविषयी तुमचे म्‍हणणे काय ?

उत्तर (श्री. रमेश शिंदे) : ज्‍या सेंट झेवियरच्‍या मागणीमुळे गोव्‍यात इन्‍क्‍विझिशन केले गेले, गोमंतकियांना स्‍वतःची भूमी सोडून विस्‍थापित व्‍हावे लागले, त्‍याला ‘गोयंचो साब’ कसे म्‍हणता येईल ? गोमंतकियांवर अनन्‍वित अत्‍याचार करणार्‍या पोर्तुगिजांना घालवण्‍यासाठी गोमांतकियांनी लढा दिला, त्‍या पोर्तुगिजांच्‍या स्‍मृती स्‍मरणात का ठेवाव्‍यात ? ‘भगवान परशुरामच हेच या गोमंतक भूमीचे आराध्‍य आहेत’, असे आम्‍ही हिंदु मानतो.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *