ठाणे येथील प्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परुळकर आणि देहली येथील अधिवक्ता उमेश शर्मा यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
रामनाथी : ठाणे येथील प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परुळकर आणि देहली येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेश शर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता १७ जून या दिवशी दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या व्यासपिठावरून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मागदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी दिली. यामुळे अधिवेशनाच्या सभागृहात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद़्गुरु नंदकुमार जाधव यांनी श्री. दुर्गेश परुळकर यांचा, तर सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अधिवक्ता उमेश शर्मा यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. श्री. दुर्गेश परुळकर यांच्याविषयी गौरवोद़्गार काढतांना सद़्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘समाज आणि राष्ट्र यांसाठी कार्य करतांना हे कर्मयोगी जन्म-मृत्यू यांच्या फेर्यांतून मुक्त झाले.’’ या वेळी मनोगत व्यक्त करतांना श्री. दुर्गेश परुळकर यांनी ‘ज्येष्ठ लोक म्हणाले, तर त्याचा स्वीकार करतो’, असे नम्रपणे सांगितले. अधिवक्ता उमेश शर्मा यांच्याविषयी गौरवोद़्गार काढतांना सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘भाषेतील मृदुता, शिकण्याची तळमळ, कलेप्रती समर्पण, धर्मशास्त्र सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याची तळमळ, अशा अनेक गुणांचा समुच्चय असलेले अधिवक्ता उमेश शर्मा हे जीवनमुक्तता झाले.’’
दुर्गेश परुळकर यांची आध्यात्मिक पातळी आणखी वाढेल, याचा मला विश्वास आहे ! – सौ. मेधा परुळकर (श्री. दुर्गेश परुळकर यांची पत्नी)
श्री. दुर्गेश यांच्याशी माझा विवाह झाला, त्या वेळी ते थोडे आध्यात्मिक प्रवृत्तीचे असल्याचे वाटले. त्यांना नियमित पूजापाठ करण्याची आणि आध्यात्मिक ग्रंथ वाचण्याची आवड आहे. ते नियमित अथर्वशीर्षाचे पठण आणि रूद्रपाठ करतात. पाठीच्या मणक्याचा तीव्र त्रास असूनही त्यांनी २-३ पुस्तके लिहिली. झोपतांना आणि लिहितांना त्रास होत असूनही ते लिखाण करतात. ठरवलेली गोष्ट ते पूर्ण करतातच. प्रत्येक कार्य ते मन लावून करतात. त्यांची आध्यात्मिक पातळी आणखी वाढेल, याचा मला विश्वास वाटतो.
सनातनच्या आश्रमातील आध्यात्मिक वातावरण हा माझ्यासाठी वेगळा अनुभव ! – सौ. मेधा परुळकर
सनातनच्या आश्रमात आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्ती आहेत. त्यांच्यामध्ये देशसेवेची किती आवड आहे. हे पाहून खूप चांगले वाटले. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव आहे, असे या वेळी सौ. मेधा परुळकर म्हणाल्या.
वासनेऐवजी वासुदेवाची निवड करणे हाच धर्म ! – दुर्गेश परुळकर
मनोगत व्यक्त करतांना श्री. दुर्गेश परुळकर म्हणाले, ‘‘शाळेत मला राष्ट्रप्रेमाचे धडे मिळाले. मी १८ वर्षांचा असतांना वडिलांनी माझ्या हातात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक देऊन ‘हे पुस्तक तुला मार्ग दाखवेल’, असे सांगितले. ‘वासना कि वासुदेव यांपैकी कुणाला निवडायचे आहे’, हे आपण ठरवले पाहिजे. वासुदेवाची निवड करणे, हाच धर्म आहे. हेच आपले जीवन आहे. रामायण आणि महाभारत हे जीवनाला दिशा देणारे ग्रंथ आहेत.’’
संतांच्या सत्संगामुळे माझी प्रगती झाली आहे ! – उमेश शर्मा, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय
सर्व संत निष्काम भावनेने कार्य करतात, हे समजून मी तसे करण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयात काम करत असतांना मी चांगल्या प्रकारे कर्म केले; मात्र न्यायाधिशांनी अमूक असा निर्णय द्यावा म्हणून फळाची अपेक्षा केली नाही. फळाच्या अपेक्षेचा विचार न केल्यामुळे माझ्या मनाला शांती मिळाली. ‘लव्ह जिहाद, धर्मांतर’, असे विविध खटले मी लढत असतांना म्हणजे धर्माचे कार्य करत असतांना मी आजारी पडणार नाही, याची मला जाणीव होते. सकाळी मी आजारी पडतो. त्यानंतर मी न्यायालयात जातो, तेव्हा मी आजारी नसतो. न्यायालयातून घरी आल्यावर मी पुन्हा आजारी पडतो. असा दैवी शक्तीचा अनुभव मला वारंवार येतो. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर मला मानसिक शांती मिळाली. आतापर्यंत मिळालेल्या सत्संगामुळे आज माझी आध्यात्मिक प्रगती झाली आहे. येथील अधिवेशनातील सर्वांचा समर्पण भाव पाहून मला प्रेरणा मिळाली आहे.
अधिवक्ता उन्मेश शर्मा तळमळीने धर्मकार्य करतात ! – सद़्गुरु चारुदत्त पिंगळे
कार्य करतांना अधिवक्ता उन्मेश शर्मा यांचा व्यावसायिक दृष्टीकोन नसतो. ते प्रत्येक समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अधिवक्त्यांच्या बैठकीत असतांना ‘कोणते अभियान चालवू शकतो ? त्याचे सादरीकरण आणि ध्वनीमुद्रीकरण कसे करता येईल? जेणेकरून लाखो लोकांपर्यंत विचार पोचवता येतील’, याचे ते चिंतन करतात. याविषयी ते विचारून घेऊन कृती करतात. अधिवेशनात अधिवक्ता नागेश जोशी यांनी प्रसारमाध्यमांविषयी न्यायालयीन प्रक्रियेची माहिती दिल्यानंतर अधिवक्ता शर्मा यांचे त्या दिशेने चिंतन चालू होऊन त्यांनी नियोजनाला प्रारंभही केला. ते तळमळीने धर्मकार्य करतात. एखादी कृती योग्य कि अयोग्य याविषयी ते विचारून कृती करतात. त्यांच्या नम्रता आहे.
आतापर्यंतच्या अधिवेशनात ५ संत होऊन ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक गाठणे हीच अधिवेशनाची फलनिष्पती !
आतापर्यंत झालेल्या एकूण १० अधिवेशनांच्या फलनिष्पतीविषयी सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘अधिवेशनाची फलनिष्पती काय आहे ?’, असे पत्रकार विचारतात. सनातन धर्मानुसार आपण जीवनमुक्त होणे आणि आध्यामिक प्रगती करणे हे महत्त्वाचे आहे. अशी प्रगती झाल्यानंतर शाश्वत कृतज्ञता वाटते. वर्ष २०१२ पासून दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू झाल्यानंतर जीवनमुक्तीची प्रक्रिया चालू झालेली आहे. अधिवेशनात ५ संत झाले आणि आजपर्यंत ४० हिंदुत्वनिष्ठांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जीवनमुक्त झाले आहेत. हीच या अधिवेशनाची फलनिष्पती आहे. आपण धर्म आणि राष्ट्र यांच्यासाठी कार्य करत आहोत, त्यामुळे हे करतांना आपण शाश्वत मुक्त झाले पाहिजे. ईश्वराच्या माध्यमातून हे कार्य होत आहे, याचा अनुभव आपण घेत आहोत. सर्व कार्याचे अधिष्ठान ईश्वर असल्यानंतर ईश्वरी राज्याची स्थापना होईल.’’