Menu Close

अधिवेशनाच्‍या सातव्‍या दिवशी ‘हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्‍यासाठीचे प्रयत्न आणि धर्मांतरितांचे ऐच्छिक शुद्धीकरण’ या विषयावर उद़्‍बोधन !

डावीकडून पू. चंद्रकांत महाराज शुक्‍ल, श्री. नितीन चौगुले, श्री. विजय जंगम आणि श्री. मुन्‍नाकुमार शर्मा

संप्रदायवाद सोडून हिंदुत्‍ववाद आणि राष्‍ट्रवाद जोपासा ! – पू. चंद्रकांत महाराज शुक्‍ल, जिल्‍हाप्रमुख, गुरुवंदना मंच, वलसाड, गुजरात.

पू. चंद्रकांत महाराज शुक्‍ल, जिल्‍हाप्रमुख, गुरुवंदना मंच, वलसाड, गुजरात.

‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना’ हे आपले सर्वांचे दायित्‍व आहे. सरकार हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यास सिद्ध आहे. आपण मागणी करत नाही, हीच आपली चूक आहे. ज्‍या प्रकारे शेतकर्‍यांनी अनेक मास आंदोलने केल्‍याने सरकारला ३ कषी कायदे रहित करावे लागले, त्‍या प्रकारेच हिंदूंना सरकारवर हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा दबाव बनवावा लागेल. रस्‍त्‍यावर उतरावे लागेल. संप्रदाय, जात आदी भेद बाजूला सारावे लागतील. आताच एक व्‍हा अन्‍यथा आपली पुढील पिढी आपल्‍याला क्षमा करणार नाही. संप्रदायवाद सोडून हिंदुत्‍ववाद आणि राष्‍ट्रवाद जोपासा !, असे प्रतिपादन गुजरातमधील वलसाड येथील गुरुवंदन मंचचे जिल्‍हाप्रमुख पू. चंद्रकांत महाराज शुक्‍ल यांनी केले. ते अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या सातव्‍या दिवशीच्‍या धर्मांतर रोखणे आणि घरवापसीची योजना या पहिल्‍या सत्रातील ‘धर्मांतर रोखण्‍यासाठी सक्रीय प्रयत्न’ या विषयावर बोलतांना केले.

‘धर्मांतर रोखण्‍यासाठी क्रियाशीलतेने करत असलेले प्रयत्न’ या विषयावर बोलतानां ते म्‍हणाले, हिंदूंचे धर्मांतर संबंधी ‘प्रलोभन’, ‘प्रेम’, ‘राजकारणी’ (पॉलिटिशियन्‍स), ‘पालक’ (पेरंट्‍स) आणि ‘पंडित’ हे ‘फाईव्‍ह पीज’ महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

१. प्रलोभन : गुजरातमधील आदिवासी यांच्‍या असाहाय्‍यतेचा अपलाभ उठवून ख्रिस्‍ती मिशनरी कपडे, धान्‍य, औषधे पुरवून त्‍यांचे धर्मांतर करतात. याला प्रत्‍युत्तर देत आमची संस्‍था आदिवासी हिंदूंना कपडे आणि औषधे आदींचे वाटप करते, तसेच आम्‍ही ‘नेत्रोपचार कँप’ भरवून डोळ्‍यांची शस्‍त्रक्रिया करतो. अनाथ आदिवासी मुलींचे हिंदु मुलांशी वेदशास्‍त्रोक्‍त पद्धतीने विवाह लावून देतो. या माध्‍यमातून त्‍यांचे धर्मांतर होऊ नये, अशी काळजी घेतली जाते. धर्मांतरित आदीवासींना समजावून त्‍यांची ‘घरवापसी’ करवतो.

२. प्रेम : हिंदूंना त्‍यांच्‍यातील भेदभाव सोडावा लागेल. त्‍यांना नाराज करता कामा नये. आदिवासींना प्रेम देऊन आपले बनवायला हवे. आपण त्‍यांच्‍याशी प्रेमाने वागल्‍यास ते दुसर्‍या धर्मात जाणार नाहीत. तसे प्रयत्न केल्‍याने एका दलित बांधवाने मंदिर उभारले. तेथे दलित लोक भजन-पूजन करतात.

३. राजकारणी : सूरतमध्‍ये एका इमारतीत ब्राह्मण रहायला आला. त्‍यांना तेथे येण्‍यापासून रोखण्‍यात आले. आधी कुणी ब्राह्मण आपल्‍या परिसरात रहायला आला, तर तेथील लोकांना आनंद व्‍हायचा. ‘आज मात्र आपली संस्‍कृती कोणत्‍या दिशेने चालली आहे ?’ याचा विचार करावा लागेल. आपल्‍याला जातीवाद सोडावा लागेल. यासाठी राजकीय स्‍तरावर प्रयत्न व्‍हायला हवेत.

४. पालक : पालकांना ठाऊक हवे की, मुले कुठे जातात, काय करतात आदी. मुलांना शिकवायला हवे की, टिळा लावूनच घराबाहेर पडा !

५. पंडित (कथावाचक, संत, शंकराचार्य) : पंडितांनी पालकांना सांगायला हवे की, ‘तुम्‍ही धार्मिक कार्यक्रमांना एकटे न येता, मुलांनाही सोबत आणा !’ कथावाचकांनी युवावर्गाचे प्रबोधन करणे प्राधान्‍याने आवश्‍यक आहे. लव्‍ह जिहादविषयी त्‍यांचे प्रबोधन करा ! कथावाचकांनी सप्‍ताहभर प्रवचन करतांना प्रतिदिन किमान ५ मिनिटे तरी लव्‍ह जिहादसारख्‍या हिंदूंवरील आघातांविषयी माहिती देऊन धर्मजागृती करायला हवी.

हिंदूंचा ‘हिंदु हितरक्षा बोर्ड’ स्‍थापणे आवश्‍यक ! – पू. चंद्रकांत शुक्‍ल

पू. चंद्रकांत शुक्‍ल पुढे म्‍हणाले की, जसे ‘मुस्‍लिम वक्‍फ बोर्ड’ आहे, अन्‍य धर्मांचे बोर्ड आहेत, तसा ‘हिंदु हितरक्षा बोर्ड’ बनला पाहिजे. या बोर्डाचे कार्य हे पीडित हिंदूंच्‍या पाठीशी उभे रहाण्‍याचे असेल.

हिंदुव्‍यवस्‍था उभारून सामर्थ्‍यशाली हिंदु राष्‍ट्र स्‍थापूया ! – मुन्‍नाकुमार शर्मा, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, अखिल भारतीय हिंदु महासभा, नवी देहली.

मुन्‍नाकुमार शर्मा, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, अखिल भारतीय हिंदु महासभा, नवी देहली.

‘हिंदु महासभा’ हा भारतातील सर्वांत जुना राजकीय पक्ष आहे. आमच्‍या पक्षाने आरंभीपासून घरवापसीसाठी प्रयत्न चालवले. भाई परमानंद आणि स्‍वामी श्रद्धानंद या महासभेच्‍या नेत्‍यांनी घरवापसीचे कार्य जोरकसपणे चालू केले होते. त्‍यामुळेच स्‍वामी श्रद्धानंद यांची हत्‍या करण्‍यात आली. आजही जिल्‍ह्याजिल्‍ह्यांतील आमचे कार्यकर्ते कुणाची घरवापसी करायची असेल, तर त्‍याविषयी महासभेच्‍या केंद्रीय कार्यालयात कळवतात. त्‍यानंतर आम्‍ही ‘घरवापसी’ घडवून आणण्‍याची संपूर्ण व्‍यवस्‍था करतो. जातीव्‍यवस्‍था दूर सारून हिंदुव्‍यवस्‍था निर्माण करून सामर्थ्‍यशाली हिंदु राष्‍ट्र स्‍थापण्‍याचा आपण प्रयत्न करायला हवा. आपल्‍या महापुरुषांची अपूर्ण राहिलेली स्‍वप्‍ने आपण पूर्ण करायला हवीत. इराण, इराक, अफगाणिस्‍तान, पाकिस्‍तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्‍यानमार या देशांना एकत्र करून पुढे अखंड हिंदु राष्‍ट्रही बनवायचे आहे. प्राचीन भारतवर्षाचा गौरव परत मिळवायचा आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मुन्‍नाकुमार शर्मा यांनी ‘घरवापसीच्‍या कार्यामध्‍ये हिंदु महासभेचे योगदान’ या विषयावर बोलतांना केले.

‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापने’च्‍या कार्यामध्‍ये हिंदु जनजागती समिती आणि सनातन संस्‍था भारतातील अग्रणी संघटना !

श्री. मुन्‍नाकुमार शर्मा म्‍हणाले, ‘‘हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या कार्यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्‍था या भारतातील अग्रणी संघटना आहेत. केवळ संख्‍याबळाचा उपयोग होत नसतो. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्‍था यांचे कार्य वंदनीय-प्रशंसनीय कार्य आहे. तुम्‍ही आम्‍हाला जी सेवा द्याल, ती महासभा स्‍वीकारेल. आम्‍ही हृदयाने तुमच्‍यासमवेत चालू. अखंड हिंदु राष्‍ट्राच्‍या कार्यात सदैव संघटित राहू !’’

गीता, गोमाता आणि गंगामाता यांच्‍या देशात आयात धर्माची आवश्‍यकता नाही ! – प्रबल प्रताप सिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगड

प्रबल प्रताप सिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगड

‘हिंदूंची संख्‍या न्‍यून होते, तेव्‍हा देशाचे तुकडे होतात’, याचा इतिहास साक्ष आहे. छत्तीसगड येथेही मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. सेवेच्‍या नावाखाली ‘सौदा’ चालू आहे. आदिवासींची फसवणूक करून त्‍यांचे धर्मांतर केले जाते. ‘धर्मांतर म्‍हणजे राष्‍ट्रांतर आहे.’ त्‍यामुळे हा विषय अतिशय गंभीर आहे. धर्मांतर रोखण्‍यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्‍यक आहे. धर्मांतर झाले नसते, तर पाकिस्‍तान आणि बांगलादेश वेगळे झाले नसते. छत्तीसगड येथील ज्‍या भागांत हिंदूंचे धर्मांतर झाले आहे, तेथे नक्षली कारवाया वाढल्‍या आहेत. धर्मांतर झालेल्‍या ठिकाणी भारतमातेविषयीची आत्‍मीयता नष्‍ट होते. धर्मांतर रोखण्‍यासाठी घरवापसीचे महाअभियान राबवणे आवश्‍यक आहे. ख्रिस्‍ती मिशनरी समाजाच्‍या शेवटच्‍या घटकापर्यंत पोचतात. त्‍यामुळेच ते धर्मांतर करू शकतात. त्‍यामुळे हिंदूंनी समाजातील शेवटच्‍या घटकापर्यंत हिंदु संस्‍कृती आणि भारताचा तेजस्‍वी इतिहास पोचवला पाहिजे. छत्तीसगड राज्‍यात आम्‍ही प्रत्‍येक गावात ‘धर्मरक्षा समिती’ स्‍थापन केली आहे. गोहत्‍या आणि धर्मांतर रोखण्‍यासाठी ही समिती कार्य करते. गीता, गोमाता आणि गंगामाता असलेल्‍या देशात आयात धर्माची आवश्‍यकता नाही.

शेवटच्‍या धर्मांतरिताची घरवापसी (शुद्धीकरण) होईपर्यंत, संघर्ष करत राहू !

भारताची संस्‍कृती जाणून घेण्‍यासाठी स्‍वामी विवेकानंद यांच्‍या विचारांचा अभ्‍यास करायला हवा. काही राज्‍यांत आणि नक्षलग्रस्‍त भागांत १५ सहस्रांहून अधिक धर्मांतरित हिंदूंची आम्‍ही घरवापसी (शुद्धीकरण) केली आहे. आमच्‍या कार्यकर्त्‍यांवर आक्रमणे होतात, त्‍यांना धमक्‍या येतात, तरीही आम्‍ही हे कार्य करत आहोत. ‘हिंदू करणे आणि हिंदूंना वाचवणे’ हे पवित्र कार्य आहे. ‘हिंदू’ हे राष्‍ट्रीयत्‍वाचे प्रतीक आहेत. ‘जोपर्यंत शेवटच्‍या धर्मांतरित हिंदूची घरवापसी (शुद्धीकरण) होत नाही, तो आम्‍ही संघर्ष करत राहू’, असे आश्‍वासन प्रताप सिंह जुदेव यांनी दिले.

धर्मकार्य करत असतांना होणार्‍या विरोधाकडे दुर्लक्ष करून धर्मरक्षण केले पाहिजे ! – विजय जंगम, राष्‍ट्रीय कार्याध्‍यक्ष तथा प्रवक्‍ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, मुंबई

विजय जंगम, राष्‍ट्रीय कार्याध्‍यक्ष तथा प्रवक्‍ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ, मुंबई

देशात अनेक वर्षांपासून जातीजातींत संघर्ष चालू आहे. बाह्य शक्‍ती वीरशैव लिंगायत समाजासह इतर जातींत फूट पाडण्‍याचा, तसेच त्‍यांना हिंदुत्‍वापासून तोडण्‍याचा प्रयत्न करत आहेत. वीरशैव लिंगायत समाजातील धर्मगुरूंवर टीका आणि टीपणी करण्‍यात आल्‍यानंतर या विरोधात लढा दिला. लिंगायत समाजातील काही लोक हिंदु धर्म मानत नाहीत. स्‍वतःच्‍या स्‍वार्थासाठी त्‍यांना आरक्षण आणि शिक्षण हवे; मात्र हिंदु धर्मापासून हटून वेगळ्‍या मागण्‍या करणे अयोग्‍य आहे. हे येणार्‍या पिढीसाठी धोकादायक आहे. लिंगायत हा वेगळा धर्म नसून तो हिंदु धर्माचाच घटक आहे. आज हिंदुत्‍वाच्‍या छत्राखाली कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्‍थान, देहली, पंजाब, नेपाळ आणि बांगलादेश येथील वीरशैव लिंगायत समाजातील लोकांना संघटित केले आहे. आम्‍ही हिंदु धर्मीय आणि सनातनी आहोत. या हेतूने देशातील लिंगायत समाजातील संप्रदायांना संघटित करायला हवे. काशीपीठ, चंद्रशेखर शिवाचार्य महास्‍वामीजी आणि भीमाशंकर शिवाचार्य महास्‍वामी यांना ‘लिंगायत हा वेगळा धर्म नाही, तर तो हिंदु धर्मच आहे. आम्‍ही हिंदु आहोत’, असे लोकांना सांगा’, असे त्‍यांना सांगितले आहे. काही हिंदू लोकांचे वागणे असे दिसून येते की, ‘हिंदु संस्‍कृतीशी माझे देणे-घेणे नाही.’ ते ब्रिटिशांच्‍या विचारधारेप्रमाणे ते वागतात. हे चुकीचे आहे. हिंदूंचे व्‍यक्‍तीगत आणि सामाजिक जीवन पालटू शकते; मात्र धार्मिक जीवन पालटू शकत नाही. काही लोक लिंगायत समाजातील परंपरा वेगळी आहे, असे सांगून चुकीच्‍या गोष्‍टी पसरवण्‍याचे काम करत आहेत. कर्नाटक येथे लिंगायत समाजाचा स्‍वतंत्र धर्माचा प्रस्‍ताव दिला होता; मात्र तो प्रस्‍ताव आम्‍ही हाणून पाडला. आम्‍ही कर्नाटक आणि केंद्र सरकारला निवेदन पाठवून ‘लिंगायत सारे हिंदु आहेत, लिंगायत हा हिंदु धर्माचा घटक आहे’, याविषयी सर्वप्रथम भूमिका स्‍पष्‍ट करावी, अशी मागणी केली. तेव्‍हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कर्नाटक येथे येऊन याविषयी आमच्‍या धर्मगुरूंशी चर्चा करावी लागली. त्‍यामुळे आपण धर्माचे कार्य करत असतांना कोण टीका आणि विरोध करते, याकडे लक्ष न देता धर्माचे रक्षण करणे आवश्‍यक आहे.

‘‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्‍था यांचे साधक मला धर्मरक्षणाच्‍या उपक्रमांसाठी नेहमी बोलावतात, याविषयी मी त्‍यांचे धन्‍यवाद देतो’’, असे श्री. विजय जंगम यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.

या सत्राची झलक

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *