Menu Close

मी मुख्यमंत्रीपदी नको असेन, तर त्यागपत्र देण्यास सिद्ध !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बंडखोरांना भावनिक साद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

मुंबई – माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको आहे. ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या लायक नाही’, असे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांनी समोर येऊन सांगावे. असे केल्यास मी माझ्या पदाचे त्यागपत्र द्यायला सिद्ध आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना घातली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्र्यांनी २२ जूनला सायंकाळी ६ वाजता फेसबूकवरून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,

१. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांशी जोडलेले शब्द आहेत. हे दोन्ही शब्द एकमेकांपासून कदापि वेगळे होऊ शकत नाहीत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे अयोध्या येथे गेले होते.

२. बाळासाहेबांचे जे विचार होते, तेच मी पुढे नेत आहे. वर्ष २०१४ मध्ये प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आणले. आम्ही हिंदुत्व सोडले का ? मधल्या काळात जे काही दिले, ते बाळासाहेबांनंतर शिवसेनेने तुम्हाला दिले.

३. ‘महापालिकेच्या निवडणुकीत उभा न राहिलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार ?’ हा प्रश्‍न मी खासदार शरद पवार यांना विचारला होता; पण त्यांनी आग्रह केला म्हणून मी मुख्यमंत्री झालो. राजकारण हे राजकारण असले पाहिजे. वळणदार राजकारण रडकुंडीच्या घाटासारखे असू नये. प्रशासनाने मला सांभाळून घेतले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याऐवजी आमच्याच माणसांनी आम्हाला धक्का दिला आहे.

४. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी स्वत: भ्रमणभाष करून ‘आम्ही तुमच्यासमवेत आहोत’, असे सांगितले आहे; पण माझ्याच लोकांना मी नको आहे, त्याला काय म्हणावे ? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

५. बंडखोर आमदारांपैकी एकाही आमदाराने ‘उद्धवजी, आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहात’, असे सांगितल्यास मी आजच ‘वर्षा’ सोडून ‘मातोश्री’वर जायला सिद्ध आहे. त्यांनी हे समोर येऊन बोलावे. उगाच ‘शिवसेनेला आम्ही सोडणार नाही’ किंवा हिंदुत्व या सूत्रांविषयी इतरांशी बोलू नये.

६. मी सत्तेला चिकटून बसणारा माणूस नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. मला सत्तेचा मोह नाही. ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ अशी एक म्हण आहे, तशीच परिस्थिती आता आली आहे, असा सूचक उल्लेख त्यांनी केला.

७. मी माझे त्यागपत्र सिद्ध केले आहे; पण ज्यांना मी नको, त्यांनी समोर येऊन सांगावे. मी कोणत्याही संकटाला घाबरत नाही. पदे येत असतात आणि जात असतात.

८. मी हे पद सोडल्यानंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असेल, तर ते आम्हाला आनंदाने मान्य आहे. लोकांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. आता मी पायउतार व्हायला सिद्ध आहे.

एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा ! – शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सत्ता वाचवण्यासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा’, असे खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे’, असे वृत्त ‘टी.व्ही. ९’ या मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.

शिवसेना सोडून इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही ! – एकनाथ शिंदे

  • एकनाथ शिंदे यांचा ४६ आमदारांसह गुवाहाटी (आसाम) येथे मुक्काम !
  • राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना कोरोनाची लागण !

मुंबई/ गुवाहाटी – शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ४६ आमदारांसह गुवाहाटी (आसाम) येथे विशेष विमानाने गेले असून भाजपच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. आमदारांचा मुक्काम सध्या गौहत्ती येथील हॉटेल ‘रॅडिसन’मध्ये आहे. या ठिकाणी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक बंडखोर आमदाराकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र घेण्यात आले आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सर्व आमदारांची बैठक झाली. याविषयी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘अद्याप राज्यपालांना भेटण्याचा, तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही गुवाहाटी येथे ४६ आमदार आहोत. शिवसेना सोडण्याचा, तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला नाही. केवळ आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जात आहोत. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड आम्ही करणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे विचार मानणारे सर्व आमदार एकत्र आले आहेत. आम्ही कुणावर टीका टिप्पणी केलेली नाही. मी कालही कट्टर शिवसैनिक होतो, आजही आहे आणि उद्याही रहाणार आहे. आमची भूमिका प्रथमपासून हिंदुत्वाची होती. येथे असलेल्या कोणत्याही आमदारावर माझ्यासमवेत येण्याची बळजोरी करण्यात आलेली नाही. स्वत:च्या इच्छेने ते माझ्यासमवेत आले आहेत.’’

* एकनाथ शिंदे यांचे बंड घरातील असल्याने अपसमज दूर होतील ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत

एकनाथ शिंदे यांचे बंड हा घरातील विषय आहे. ते शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आतापर्यंत त्यांनी शिवसेनेचे काम झाले आहे. शिंदे परत येतील, असा विश्‍वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

* बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेकडून कारवाई चालू !

बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेकडून कारवाई चालू करण्यात आली असून ‘शिवसेनेच्या आजच्या बैठकीला उपस्थित रहा अन्यथा अपात्र ठरवू’, असे पत्र बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून पाठवण्यात आले आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रातून ‘बैठकीला उपस्थित न राहिल्यास थेट कारवाई करण्यात येईल’, अशीही चेतावणी देण्यात आली आहे.

* मंत्रीमंडळ बैठकीत राजकीय बंडाळीवर मौन; वर्ष २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय !

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २२ जूनला मंत्रीमंडळाची बैठक झाली; मात्र त्यात झालेल्या बंडाविषयी चकार शब्द काढण्यात आला नसल्याचे समजते. वर्ष २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या बैठकीकडे शिवसेनेच्या ८ मंत्र्यांनी पाठ फिरवली, तर मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि कृषीमंत्री दादा भुसे हे बैठकीला अनुपस्थित होते.

* मला हृदयविकाराचा झटका आला, हे धादांत खोटे ! – आमदार नितीन देशमुख

नितीन देशमुख

नागपूर विमानतळावर आगमन झाल्यावर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, माझी प्रकृती पूर्णपणे चांगली आहे. गुजरात येथे १००-१५० पोलिसांचा माझ्यावर पहारा होता. पोलिसांनी मला बळजोरीने रुग्णालयात नेले, तेथे मला बळजोरीने इंजेक्शन देण्यात आले. माझ्या शरीरावर माझ्या अनिच्छेने उपचार करण्यात आले. ते इंजेक्शन कशाचे होते, हे मला ठाऊक नाही; परंतु मला हृदयविकाराचा झटका आल्याचे जे सांगितले जात आहे, ते धादांत खोटे आहे. आमचे मंत्री होते म्हणून मी समवेत गेलो होतो; पण मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे.

* महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित करण्याच्या दिशेने वाटचाल ! – संजय राऊत

‘एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा विसर्जित होण्याच्या दिशेने चालू आहे’, असे ट्वीट शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. दुसरीकडे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ‘पर्यावरणमंत्री’पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे विधानसभा विसर्जित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

* काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा ! – एकनाथ शिंदे, नेते, शिवसेना

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे ट्वीट करतांना म्हटले आहे की, गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीचा लाभ घटक पक्षांना झाला आहे; मात्र शिवसैनिक भरडला गेला आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आता निर्णय घेणे आवश्यक आहे. घटक पक्ष भक्कम होत असतांना शिवसेनेचे खच्चीकरण झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा.

* एकनाथ शिंदे, नेते, शिवसेना – आज आमदारांच्या समवेत बैठक होईल, त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल.

* शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन !

वर्षा बंगला आणि मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आहेत. या वेळी शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. वर्षा निवासस्थान आणि मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची रांग लागली होती. वरळी आणि सी लिंकजवळ शिवसैनिक जमले होते.

* इतर घडामोडी अशा…

१. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री जितेंद्र आव्हाड वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते.

२. प्रत्येक बंडखोर आमदाराकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र घेण्यात आले आहे; मात्र या पत्रावर मी स्वाक्षरी केलेली नाही. माझी स्वाक्षरी इंग्रजीमध्ये असते; मात्र या पत्रावर मराठीत स्वाक्षरी करण्यात आली आहे, असे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.

३. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. फार तर काय होईल सत्ता जाईल. सत्ता येत जात असते; मात्र प्रतिष्ठा महत्त्वाची असते. ती वर असते.

४. ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘मुख्यमंत्र्यांच्या सत्यतेचे कौतुक करून त्यांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांचा आदर वाढला आहे’, असे म्हटले.

५. एकनाथ शिंदे गटाकडून विधीमंडळ पक्षप्रतोदपदी म्हणून भरतशेठ गोगावले यांची निवड करण्यात आली आहे. (‘प्रतोद’ म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधानपरिषद या ठिकाणी संबंधित पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी नेमलेला पक्षप्रमुख)

६. मुख्यमंत्र्यांनी शेवटची चेतावणी दिल्यानंतरही बंडखोर आमदारांचा मुंबई येथे येण्यास नकार !

७. ‘शिवसेनेत जे काही चालू आहे, त्यामध्ये भाजपचा हात नाही’, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

* राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना कोरोनाची लागण !

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोश्यारी यांना उपचारासाठी रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

* उद्धव ठाकरे यांनी त्यागपत्र देण्यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया !

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना कायदेतज्ञ उल्हास बापट म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गटनेता पालटला आहे. हे कायदेशीर आहे; मात्र जर एकनाथ शिंदे यांच्याकडे ४६ सदस्य असतील, तर गटनेता कोण आहे, याला महत्त्व उरत नाही; कारण ते अपात्र ठरणार नाहीत. प्रत्येकाचे पत्र वेगवेगळ्या स्वाक्षरीसह राज्यपालांना द्यावे लागेल. हे पत्र त्यांनीच लिहिले आहे का, याची शहानिशा होते किंवा राज्यपालांसमोर सर्व ४६ आमदारांना उभे केले, तरी प्रश्‍न सुटू शकतो. रुग्णालयामधूनही राज्यपाल राज्यकारभार चालवू शकतात. विधानसभा विसर्जित करणे, हा राज्यपालांचा अधिकार आहे. जर विद्यमान सरकारने बहुमत गमावले, तर राज्यपालांना आधी जे सरकार बनवण्यास इच्छुक आहेत, अशांना नियमानुसार संधी द्यावी लागते. येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली जाईल, हे स्पष्ट आहे. जर फडणवीस यांनी सरकार बनवण्यास नकार दिला, तर राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. त्यानंतर विधानसभा विसर्जित होईल आणि ६ मासांत निवडणुका घ्याव्या लागतील. बहुमत गमावल्यास मुख्यमंत्र्यांना नैतिकतेला धरून त्यागपत्र द्यावे लागेल.
जरी मुख्यमंत्र्यांनी त्यागपत्र दिले नाही, तरी राज्यपाल काय करतील, हा मोठा प्रश्‍न आहे. असे आतापर्यंत कधी झालेले नाही; पण डी.डी. बसू या कायदेतज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार राज्यपाल विधानसभा विसर्जित करू शकतात.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *