- हिंदुबहुल देश आणि पुण्यासारखी संतभूमी या ठिकाणी संतांवर आक्रमण होणे, हे शासन आणि पोलीस प्रशासन यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे !
- जेथे संतच असुरक्षित असतील, तेथे सामान्य जनतेचे रक्षण कसे होणार ? आजपर्यंत कधी अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंवर आक्रमण झाल्याचे ऐकले आहे का ?
- संत आणि जनता यांचे रक्षण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्यकर्ते असणारे हिंदु राष्ट्रच हवे !
चारचाकी वाहनाच्या अपघाताद्वारे आणि त्यानंतर काही अज्ञातांकडून २ वेळा आक्रमण करण्याचा प्रयत्न
शिरूर : राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्या चारचाकी वाहनाला ८ मेच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथील रांजणगावजवळ एका ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्या अपघातानंतर झालेल्या वादावादीतून काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर आक्रमण केले. यामध्ये त्यांनी वाहनचालकाला मारहाण केली. त्यानंतरही चौंडी घाटामध्येही काही अज्ञात हत्यार घेऊन आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते. (या प्रकरणी पोलीस प्रशासनाने संबंधितांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक) या सर्व प्रसंगांतूनही प.पू. भय्यूजी महाराज हे सुखरूप असल्याची माहिती सूर्योदय आश्रमाचे श्री. तुषार पाटील यांनी दिली. (साधनेमुळे संतांचे ईश्वर रक्षण करतो, हेच यातून सिद्ध होते. आपत्काळाची भीषणता लक्षात घेऊन त्यापासून रक्षण होण्यासाठी हिंदूंनी साधना वाढवण्याला पर्याय नाही ! – संपादक)
श्री. तुषार पाटील यांनी सांगितले, “प.पू. भय्यूजी महाराज हे त्यांच्या अनुयायांसमवेत पुण्याहून इंदूरकडे जात होते. त्या वेळी रांजणगाव परिवहन बसस्थानकाजवळ त्यांच्या गाडीला एका ट्रकची धडक बसली. या वेळी वाहनाची किती हानी झाली, हे पहाण्यासाठी आम्ही थांबलो असता काही अज्ञात तरुणांनी चालकासमवेत वाद घालत मारहाण केली आणि शिवीगाळही केली. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर पुढील प्रवास चालू केला. त्यानंतर मनमाड येथील चौंडी घाटातही काही व्यक्ती रस्त्यावर हत्यार घेऊन उभे होते. त्या ठिकाणीही आपल्यावर आक्रमण होणार आहे, हे लक्षात आल्यावर वाहन रस्त्याच्या कडेने जोरात नेऊन पळ काढण्यात आला.”
धार्मिक बाजार मांडणार्यांवर टीका केल्यामुळेच आक्रमण झाल्याची शक्यता !
प.पू. भय्यूजी महाराज यांनी समाजातील काही घटकांवर धार्मिक बाजार मांडून करोडो रुपये व्यय केले जातात. सामाजिक कामासाठी लक्ष देण्यात येत नाही, अशी टीका केली होती. या टीकेमुळेच त्यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याचा दावा श्री. तुषार पाटील यांनी केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात