मल्पे, उडुपी (कर्नाटक) येथील हिंदु धर्मजागृती सभा
उडुपी (कर्नाटक) : मुख्यमंत्री प्रत्येक सभेत हिंदु धर्मात असलेल्या मूळ श्रद्धांना अंधश्रद्धा असे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंमलात आणण्याविषयी सांगत आहेत. वास्तवात आपला इतिहास पहाता वैज्ञानिक अलीकडे सांगत असलेल्या ग्रहांच्या संदर्भातील विचार १० सहस्र वर्षांपूर्वी आमच्या संस्कृत विद्वानांनी सांगितले आहेत. असे श्रेष्ठ विचार असलेल्या हिंदु धर्मातील मूळ श्रद्धा शासनाला अंधश्रद्धा वाटतात. आपल्या धर्मातील श्रद्धांच्या आचरणाचे रक्षण करणे केवळ संघटनांचे कर्तव्य नसून आपणा सर्वांचे कर्तव्य आहे, या दृष्टीने समाजातील प्रत्येक व्यक्तीने शासनाच्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन श्री श्री श्री मुक्तानंद स्वामीजी, श्रीक्षेत्र करंजे मठ, मूडबिदिरे यांनी केले. मल्पे येथील एळुरू मोगवीर भवन येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
श्री श्री श्री मुक्तानंद स्वामीजी, श्रीक्षेत्र करंजे मठ, मूडबिदिरे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्या वेळी सनातन संस्थेच्या कु. भव्या गौडा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद, रणरागिणी सौ. लक्ष्मी पै यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्री. राजेंद्र आणि कु. सौम्या यांनी केले. सभेला सनातनचे संत पू. सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हिंदु धर्मविरोधी ! – श्री. गुरुप्रसाद, हिंदु जनजागृती समिती
शासनाच्या प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात शासन केवळ हिंदु धर्माचरणावर बोट ठेवून हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांवर आघात करत आहे. इतर पंथांमध्ये अंधश्रद्धा असूनही शासन त्याविषयी मौन बाळगत आहे. कायदा झाल्यावर पाहू, ही उदासीनता बाजूला सारून संघटनांकडून तत्परतेने शासनाच्या या षड्यंत्राचा विरोध झाला पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात