‘कशीर’ पुस्तकाच्या लेखिका सहना विजयकुमार यांचा प्रश्न
संभाजीनगर – काश्मीर हा विषय निवांत बसून गप्पा मारण्याचा नाही. त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन वस्तूस्थिती, तसेच इतिहास जाणून घेतल्याविना हा विषय समजणार नाही. हिटलरने जे हत्याकांड केले त्याविषयी पुढील पिढीला सांगितले जाते. ही चूक होता कामा नये, अशी भावना व्यक्त करत तेथील लोक आजही क्षमा मागतात. मग काश्मीरमध्ये जे काही घडले ते का लपवले जाते ?, असा प्रश्न ‘कशीर’ पुस्तकाच्या लेखिका सहना विजयकुमार यांनी उपस्थित केला.
१. जीवन विकास ग्रंथालय, अखिल भारतीय साहित्य परिषद, देवगिरी प्रांतच्या वतीने १६ जुलै या दिवशी जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात ‘एक पुस्तक एक दिवस’ उपक्रमात ‘कशीर’ पुस्तकाविषयी सहना आणि त्याचा मराठी अनुवाद करणार्या लेखिका उमा कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
२. या वेळी सहना म्हणाल्या ‘‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांविषयी जागरूकता निर्माण झाली. काश्मीर येथील लोकांची मानसिकता समजून घेण्यासाठी मी वर्ष २०१६ मध्ये काश्मीर येथे गेले होते. पुस्तकाच्या निमित्ताने एक लक्षात आले की, अन्य देशांप्रमाणे आपल्या देशात इतिहास सांगितला जात नाही. हिटलरने काय केले होते ते जर्मनीतील म्युझियममध्ये पहाता येते. काय करायला नको, हे तेथे पुढील पिढीला सांगितले जाते, मग काश्मिरातील घटना का लपवली जाते ? आता मुलांना काश्मीरचे वास्तव सांगायला हवे.’’
३. कार्यक्रमाच्या वेळी अनुवाद करणार्या लेखिका उमा कुलकर्णी म्हणाल्या की, प्रारंभी मी ‘‘कशीर’च्या अनुवादासाठी वेळ नाही’, असे म्हटले होते; मात्र ‘कशीर’ची प्रस्तावना लिहिणारे लेखक भैरप्पा यांनी ‘हा विषय किती महत्त्वाचा आहे’, हे सांगितल्यावर मी अनुवाद केला. अनुवादामुळे लेखिकेने अनुभलेली मानवी नाती, त्यांची मानसिकता, वेगळी माती यांचा अनुभव घेण्याची मला संधी मिळाली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात