जयपूर (राजस्थान) : “दूध, लोणी आणि तूपाच्या रुपात मी जीवनावश्यक उत्पादने देते. माझ्या गोमूत्रातून औषधे, खते आणि कीटकनाशके तयार होतात. माझे अपत्य, बैल हे शेतीसाठी उपयुक्त ठरते. मी श्वासाद्वारे पर्यावरण स्वच्छ करते‘, अशा शब्दांत राजस्थानमधील विद्यार्थ्यांशी गाय संवाद साधणार आहे. राजस्थानच्या सुधारित शालेय अभ्यासक्रमात गाय विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे बोलत असल्याचे शब्दचित्र रेखाटण्यात आले आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासंदर्भात असलेली माहिती आठवीच्या अभ्यासक्रमातून राजस्थान सरकारने वगळली आहे. राजस्थान माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन धड्यांमधून नेहरूंचा उल्लेख आगामी वर्षापासून काढून टाकल्याची माहिती समोर आल्यानंतर आता पाचवीच्या अभ्यासक्रमातील एका धड्यामध्ये गायीने लिहिलेले पत्र समाविष्ट करण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामध्ये गायीला ‘‘आई’’ असे संबोधण्यात आले आहे.
‘जो मला आई मानतो त्याच्यावर मी माझ्या अपत्याप्रमाणे प्रेम करते’ असे गाय म्हणत असल्याचा उल्लेख धड्यामध्ये केला आहे. त्यामुळे राजस्थान सरकार शालेय अभ्यासक्रमातून हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
‘गायीची उपयुक्ततेबाबतची जागरूकता निर्माण करण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे’ अशी प्रतिक्रिया राजस्थानचे मंत्री ओताराम देवसाई यांनी व्यक्त केली आहे.
संदर्भ : सकाळ