नागा-साधू होण्यासाठी श्री पंचदशनाम आखाड्याद्वारे दीक्षा कार्यक्रम
उज्जैन : महापर्व सिंहस्थाचे प्रमुख आकर्षण विविध मतांचे अनुयायी असलेले साधू-संत तथा त्यांचे आखाडे हेही आहेत. साधूसंतांची जीवनशैली तथा पूजन-विधी निरनिराळी आहे. संन्यास घेण्यासाठी एका व्यक्तीला कठीण प्रक्रिया पार पाडावी लागते, ही प्रक्रिया पाहून भाविक आणि श्रद्धाळू आश्चर्यचकीत झाले. उज्जैन सिंहस्थामध्ये नुकतीच श्री पंचदशनाम आवाहन आखाड्याने एक सहस्त्र लोकांना संन्यास दीक्षा दिली. त्यात २४ महिला संन्यासी सहभागी झाल्या होत्या. संन्यास दीक्षेच्या आधी कठीण परिक्षेतून जावे लागते.
श्री पंचदशनाम आवाहन आखाड्याचे कोषाध्यक्ष महंत श्री कैलाशगिरि महाराज यांनी सांगितले की, संन्यास जीवनात प्रवेश करणार्या व्यक्तींचा मोक्षदायिनी क्षिप्रा नदीच्या किनारी सर्वांत प्रथम मुंडन संस्कार करण्यात आला. इतकेच नव्हे, तर सर्व पूर्वज आणि स्वतःचे पिंडदानही करण्यात आले. क्षिप्रा नदीत स्नान झाल्यावर निवृत्ती जीवन प्रारंभ झाले. सर्व संन्यासी रांगेत आखाड्याच्या छावणीत पोहोचले. संन्सास दीक्षा घेणार्या व्यक्तींचे वैदिक मंत्रोच्चारसह हवन करण्यात आले. त्यानंतर श्री पंचदशनाम आवाहन आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य स्वामी श्री शिवेन्द्रगिरि महाराजांद्वारे मंत्र देऊन संन्यास दीक्षा देण्यात आली. या संन्यासींना दिगंबर दीक्षाही देण्यात येणार आहे. ज्यांच्यासाठी दिशा हेच वस्त्र आहे, तोच दिगंबर आहे. अशा प्रकारे सर्व लोक नागा साधू होतील. संन्यास दीक्षा झाल्यावर सर्वजण नवीन संन्याशी आखाड्याशी जोडले जातील. सिंहस्थ झाल्यावर संन्याशी गुरुस्थानावर अथवा स्वतःद्वारे निर्मित आश्रम वा डोंगर आणि वनात जाऊन तपस्या करतील. त्याचसह धर्माचा प्रचार-प्रसार करून समाजहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात