Menu Close

हिंदूंच्या सणांच्या वेळी २३०; मात्र मशिदींवरील भोंग्यांवर केवळ २२ खटलेच प्रविष्ट ! – हिंदु जनजागृती समिती

  • मुंबई येथील पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीकडून वास्तव उघड !

  • ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात खटले प्रविष्ट करतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात !

हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंच्याच संदर्भात दुटप्पीपणा करणार्‍या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळीच खडसवा ! -संपादक 

डावीकडून श्री. सागर चोपदार, बोलतांना श्री. मनोज खाडये आणि श्री. अभिषेक मुरुकटे

मुंबई – ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात खटले प्रविष्ट करतांना ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ धार्मिक पक्षपात करत आहे. वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत २५२ पैकी २३० खटले हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर; मात्र ३६५ दिवस वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात केवळ २२ खटलेच प्रविष्ट करण्यात आले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईतील हा पक्षपातीपणा हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी उघड केला. ३ ऑगस्ट या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार अन् समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत श्री. अभिषेक मुरुकटे उपस्थित होते.

श्री. मनोज खाडये म्हणाले, ‘‘केवळ हिंदूंच्या विविध सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषणाचे अनेक अहवाल प्रदूषण मंडळ प्रतिवर्षी प्रकाशित करते; मात्र वर्षभर मशिदींवरून भोंग्यांद्वारे, तसेच मुसलमानांच्या अन्य सणांच्या वेळी होणार्‍या प्रदूषणाविषयी एकही अहवाल प्रकाशित केला जात नाही. हा सरकारकडून हिंदूंवर केला जाणारा धार्मिक पक्षपातच आहे. ‘सेक्युलर’ सरकारच्या या धार्मिक पक्षपाताचा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. मुळात दिवसातून ५ वेळा मशिदींवरील भोंग्यांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाविरोधात महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांनी जोरदार आवाज उठवला आहे; मात्र या ध्वनीप्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले दिसून येते.

मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनीमापन का केले जात नाही ? – सागर चोपदार

गणेशोत्सव आला की, प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यातील २७ महानगरपालिका क्षेत्रांत २९० ठिकाणी ‘ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण किती झाले ?’, तेही मोजते. राज्यभरात दिवाळीच्या कालावधीत ध्वनी आणि वायू यांचे प्रतिघंट्याला निरीक्षण नोंदवले जाते. प्रतिवर्षी याचा अभ्यासपूर्ण अहवाल सिद्ध करून मंडळाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येतो. वर्ष २०१५ पासून असे अहवाल उपलब्ध आहेत. सरकार ‘सेक्युलर’ आहे, तर वर्षभर प्रतिदिन मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाचे सर्वेक्षण प्रदूषण नियंत्रण मंडळ का करत नाही ? बकरी ईदला प्राणीहत्येमुळे होणार्‍या जलप्रदूषणाचे निरीक्षण का नोंदवत नाही ? त्याचे अहवाल का सिद्ध केले जात नाहीत ? मध्यंतरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यावर मुंबईतील अनुमाने ८४३ हून अधिक मशिदींवरील भोंग्यांना अनुमती देण्यात आल्याची माहिती आहे. याचा अर्थ हे भोंगे यापूर्वी अनधिकृत होते, तर मग प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही ? ‘असा धार्मिक पक्षपात करणार्‍या अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करावे आणि या प्रकरणाची चौकशी करावी’, असे श्री. सागर चोपदार यांनी सांगितले.

… मग अनधिकृत भोग्यांवर कारवाई का केली नाही ? – अभिषेक मुरुकटे, सुराज्य अभियान, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विविध सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने लढा देतो. येणार्‍या काळात ‘प्रदूषण’ ही घातक समस्या ठरत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रदूषणाच्या विरोधात केलेल्या कारवाईची आकडेवारी पहायला मिळते. ही आकडेवारी पहाता यांतील ९२ टक्के घटनांमध्ये हिंदूंच्या सणांच्या वेळी कारवाया करण्यात आल्याचे निदर्शनास येते. हिंदूंच्या सणांच्या वेळी कारवाई करणार्‍या प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनधिकृत भोग्यांवर मात्र कारवाई केलेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत असलेला हा धार्मिक पक्षपात थांबायला हवा. अशा प्रकारे पक्षपाती कारवाया करणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करावी.

समितीचे प्रसिद्धीपत्रक – 

https://drive.google.com/file/d/1Q3yHllsXw6akBTXIQ6abtpYcbVIRVDf7/view?usp=sharing

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *