Menu Close

भारत विश्वगुरु व्हावा !

अवघ्या काही दिवसांतच भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. ‘गेल्या ७४ वर्षांमध्ये भारताने काय मिळवले आणि काय गमावले ?’, याचेही या निमित्ताने विचारमंथन व्हायला हवे. त्यासह ‘भविष्यात प्रगतीपथावर जाण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलायला हवीत ?’, हेही पहाणे तितकेच महत्त्वाचे ठरेल. केंद्रशासनाने नुकतीच ‘भारतीय शिक्षण बोर्डा’ची स्थापना करून तिच्या संचालनाचे दायित्व योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि योगपीठ ट्रस्ट’कडे दिले आहे. रामदेवबाबा यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ‘भारतीय शिक्षण बोर्ड’ देशातील शाळांसाठीचे पहिले राष्ट्रीय शिक्षण मंडळ असणार आहे. अभ्यासक्रम बनवणे, शाळांची नोंदणी करणे, परीक्षा आयोजित करणे, प्रमाणपत्रे देणे इत्यादी कार्ये या मंडळाच्या माध्यमातून केली जातील. या मंडळाकडून भारतीय पारंपरिक ज्ञान शिकवण्यासह आधुनिक शिक्षणही देण्यात येणार आहे. केंद्रशासनाचा हा निर्णय निश्चितच स्तुत्य आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त घेतलेला हा निर्णय देशाला गुणवत्तापूर्ण प्रगतीच्या शिखरापर्यंत नक्कीच घेऊन जाईल. पूर्वीच्या काळी असणारी गुरुकुल पद्धत नष्ट करून मेकॉलेने स्वतःची शिक्षणपद्धत भारतात राबवली आणि त्या माध्यमातून राष्ट्राची संस्कृती अन् सभ्यता नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रद्वेष्टे, धर्मद्वेष्टे, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी अशा सर्वांनीच यात सहभाग घेऊन देशाची अतोनात हानी केली. त्यामुळे निर्माण झालेली दरी आता भरून काढावी लागेल. हे कार्य शासनाच्या बोर्डाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. यातूनच भारतात खर्‍या अर्थाने शैक्षणिक क्रांती घडेल. या क्रांतीचे आपण साक्षीदार ठरणार आहोत. राष्ट्रद्वेष्ट्यांच्या कुकर्मांमुळे इतक्या वर्षांमध्ये भारताचा झाकोळला गेलेला गौरवशाली इतिहास या माध्यमातून पुन्हा एकदा समोर येईल. त्यामुळे केंद्रशासनाचे हे पाऊल भारतासाठी निश्चितच दिलासादायक आहे.

‘भारतीय शिक्षण बोर्डा’चे दायित्व !

 

भारतात पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात होती. चित्रकला, शिल्पकला, संगीत, नाट्यकला, वास्तूशास्त्र, ज्योतिर्विद्या, तसेच आयुर्वेद आणि अभियांत्रिकी या अन् अशा विविध विषयांचे किंवा विविध क्षेत्रांशी संबंधित असणारे शिक्षण दिले जायचे. तेव्हाच्या काळातील अध्ययन आणि अध्यापन पद्धत ही आदर्श अन् अतिशय प्रगत होती. त्यामुळे विविध प्रकारच्या विद्या आत्मसात् करत विद्यार्थी खर्‍या अर्थाने पारंगत होत असे. त्याच्यातील कौशल्यांचा विकास होत असे. गुरुकुलातील ज्ञानरूपी भांडवलाचा लाभ नंतरच्या आयुष्यात येणार्‍या प्रतिकूल परिस्थितीत व्हायचा. त्या ज्ञानामुळे वेगळ्याच प्रकारचे सामर्थ्य प्राप्त होत असे. गुरुकुलातील शिक्षण खर्‍या अर्थाने व्यावहारिक, वास्तववादी आणि मनुष्याला घडवणारे होते. त्यामुळे गुरुकुलातील विद्यार्थी हा ‘पुस्तकी किडा’ म्हणून निर्माण न होता त्याचे एक आदर्श व्यक्तीमत्त्व घडत असे. ‘केंद्रशासनाने आरंभलेल्या या बोर्डाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुरुकुल शिक्षणव्यवस्थेची पाळेमुळे भारतात रुजवली जायला हवीत’, असे प्रत्येक भारतियाला वाटते; कारण भारतियांचे वैभव असलेली ही शिक्षणपद्धतच आदर्श भारत घडवू शकते. तत्कालीन गुरुकुलात अध्यापन करणारे शिक्षक किंवा आचार्य यांची विद्वत्ताही वाखाणण्यासारखी होती. त्यांना केवळ बुद्धीमत्तेचा नव्हे, तर धर्म, अध्यात्म यांच्या शिक्षणाचाही पाया लाभला होता; पण आज असे शिक्षक लाभणे दुर्मिळ आहे. तंत्रज्ञान, भौतिक प्रगती, विकास हे सर्व बुद्धीमत्तेच्या जोरावर साधता येईल; पण मानवाला घडवण्याचे कार्य साधना किंवा अध्यात्म यांच्या बळावरच साधता येऊ शकते. केंद्रशासनाने स्थापन केलेल्या बोर्डाच्या अंतर्गत नियुक्त्या करण्यापूर्वी ‘संबंधित उत्तरदायी अधिकारी तितक्याच तोलामोलाचे आहेत का ?’, ‘त्यांना भारतीय पारंपरिक ज्ञानाची जाण आहे का ?’, ‘जगाचे नेतृत्व करणारी भारतीय पिढी घडवण्यासाठी संबंधित अधिकारी सर्वदृष्ट्या सक्षम आहेत का ?’ अशा सर्वच सूत्रांची चाचपणी आणि अभ्यास करायला हवा. ‘केवळ बोर्ड स्थापन केले म्हणजे झाले’, इतकाच विचार न करता त्याच्या एकूणच कारभाराकडेही लक्ष द्यायला हवे. ‘पतंजलि योगपीठ ट्रस्ट’नेही हे दायित्व पार पाडतांना बोर्डाच्या फलनिष्पत्तीच्या दृष्टीने अभ्यास करावा. तसे झाल्यासच त्याची स्थापना सत्कारणी लागेल.

भारतियांचा पुढाकार !

गुरुकुलात नवीन पाठ चालू झाल्यावर आचार्य मागील पाठाचे पूर्वालोकन करत, त्याविषयीची चाचणी घेत. थोडक्यात काय, तर त्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवस हा परीक्षेचाच असे. त्यामुळे परीक्षेची वेगळी अशी पूर्वसिद्धता करणे, त्याअनुषंगाने येणारा ताण हा कोणताच भाग नव्हता. या धर्तीवर अभ्यासक्रम सिद्ध करता येऊ शकतो का ?, याचा बोर्डानेही अभ्यास करावा. ताण-तणाव, निराशा आणि त्यातून केली जाणारी आत्महत्या हे थांबण्यासाठीही या बोर्डाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. बोर्डाच्या माध्यमातून प्रत्येक भारतियाच्या मनात असलेला आदर्श भारत साकार होणार आहे. त्यासाठी ‘शैक्षणिकदृष्ट्या काय करायला हवे ?’, ‘अभ्यासक्रम, तसेच परीक्षा यांचे स्वरूप कसे असावे ?’, याविषयीच्या मागण्या भारतियांकडून केल्या गेल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान यांच्या जोडीला राष्ट्र, धर्म, अध्यात्म, ईश्वर इत्यादी सर्वच विषयांच्या अभ्यासाचा समावेश होण्याच्या दृष्टीनेही भारतियांनी आग्रही रहायला हवे. दिशादर्शन करणारी शिक्षणप्रणाली विकसित होण्यासाठी बोर्डाकडे त्या स्वरूपाची निवेदनेही द्यायला हवीत. ‘विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गुन्हेगार निर्माण होणे, हे आजच्या निधर्मी शिक्षणपद्धतीचे अपयश आहे’, हे बोर्डाने लक्षात ठेवावे. गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात असतांना विश्वगुरुपदी विराजमान असणारा भारत सर्वांनाच अभिप्रेत आहे. गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन झाल्यासच ते शक्य होईल. हे सर्वस्वी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’च्या हातात आहे. आदर्श आणि उज्ज्वल भारत घडवण्यासाठी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’च्या पुढील वाटचालीस सर्व भारतियांच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

भारत विश्वगुरुपदी विराजमान होण्यासाठी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’ने प्रयत्न करावेत !

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *