Menu Close

गणेशोत्सवाच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्याचा सोलापूर येथील गणेशोत्सव मंडळांचा निर्धार !

श्री गणेशोत्सव हा हिंदूंचे संघटन करण्याचे प्रभावी माध्यम बनायला हवा ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

बैठकीला उपस्थित सार्वजनिक उत्सव मंडळांचे विविध पदाधिकारी

सोलापूर, ६ ऑगस्ट (वार्ता.) – गणेशोत्सव हा हिंदूंचे संघटन करण्याचे प्रभावी माध्यम बनायला हवा. गणेशोत्सवाच्या काळात धर्मशिक्षण देणारे फलक प्रदर्शन, हिंदूंची स्थिती दर्शवणारे ‘फॅक्ट प्रदर्शन’, लव्ह जिहाद, हलाल जिहाद यांसारख्या विषयांवर प्रवचनाचे आयोजन, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके आदी उपक्रम राबवू शकतो, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या कसा साजरा करावा ?’, या विषयावर ३ ऑगस्ट या दिवशी सोलापुरातील सार्वजनिक उत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. राजन बुणगे

या बैठकीला शहरातील विविध भागांतून २५ हून अधिक सार्वजनिक उत्सव मंडळांचे ४५ पदाधिकारी उपस्थित होते. श्री गणेशाच्या आरतीने बैठकीला प्रारंभ झाला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी उपस्थितांना बैठकीचा उद्देश सांगितला, तर सनातन संस्थेच्या कु. वर्षा जेवळे यांनी ‘सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक दृष्टीने उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी मंडळाच्या माध्यमातून करत असलेल्या धर्मकार्याची, तसेच समाजकार्याची माहिती दिली.

सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांचे मनोगत

१. श्री. नागेश सरगम (युनिक टाऊन गणेश मंडळ) – मागील २ वर्षांत घरोघरी सनातननिर्मित ‘श्री गणेश पूजाविधी’, ‘सात्त्विक रांगोळी’ हे ग्रंथ पोचवले, तसेच सर्वांना योग्य प्रकारे श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उद्युक्त केले.

२. अधिवक्ता रमाकांत बापट (वीर महागणपती ट्रस्ट) – यंदाच्या श्री गणेशोत्सवात प्रत्येक श्री गणेशोत्सव मंडळाने ‘लव्ह जिहाद’विषयी समाजात जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत.

३. श्री. शिवशंकर अंजनाळकर – नीलमनगर भागातील ६९ श्री गणेशोत्सव मंडळांकडून ‘डीजे’ बंद करून लेझीम, झांज आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते, तसेच मंडळाच्या माध्यमातून रक्तदान आणि वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात.

बैठकीमध्ये सार्वजनिक उत्सव मंडळांनी केलेला निर्धार

१. एका मासातून एकदा सर्वजण एकत्र येऊन राष्ट्र आणि धर्म कार्याची दिशा निश्चित करणार.

२. यंदाच्या श्री गणेशोत्सवात ‘डीजे’ ऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढणार.

३. फलक प्रदर्शन आणि प्रवचन यांच्या माध्यमातून व्यापक धर्मजागृती करण्याचा प्रयत्न करणार.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *