गणेशोत्सव मंडळे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची आग्रही भूमिका
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – प्रशासनाने इचलकरंजी येथे पंचगंगा नदीत घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास अनुमती द्यावी, अशी आग्रही भूमिका गणेशोत्सव मंडळे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी यांनी मांडली. गणेशोत्सव मंडळांच्या मंगलधामजवळील श्री गणपति मंदिर येथे आयोजित बैठकीत ही भूमिका मांडण्यात आली. या मागणीसाठी १० ऑगस्टला सकाळी ११ वाजता महापालिकेत प्रशासकांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. तरी त्यासाठी अधिकाधिक गणेशभक्त, तसेच मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री म्हणाले, ‘‘श्री गणेशमूर्ती विसर्जन हा हिंदूंचा धार्मिक अधिकार असल्याने प्रशासनाने हिंदूंची अडवणूक करू नये.’’ या बैठकीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री. मलकारी लवटे, माजी नगरसेवक श्री. अमरजीत जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजीचे कार्यवाह श्री. प्रसाद जाधव, सर्वश्री राजेंद्र जोग, प्रमोद बचाटे, शंतनु पवार, मंगेश म्हसकर उपस्थित होते.
श्री गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जन करण्यास अनुमती मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू ! – प्रकाश आवाडे, अपक्ष आमदार
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – महाराष्ट्र शासनाने यंदा गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव उत्साहात करण्यास अनुमती दिली आहे. इचलकरंजी येथे घरगुती, तसेच गणेशोत्सव मंडळे श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन करतात. त्यामुळे प्रशासनाने मंडळे आणि घरगुती श्री गणेशमूर्ती यांना पंचगंगेत विसर्जन करून द्यावे. असे न झाल्यास उत्साहात निघणार्या मिरवणुकांमध्ये विरजण पडल्यासारखे होईल. त्यामुळे श्री गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जन करण्यास मागणीसाठी मीही आग्रही असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ही अनुमती मिळण्यासाठी मी प्रयत्नरत आहे, असे आमदार श्री. प्रकाश आवाडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
आमदार श्री. प्रकाश आवाडे म्हणाले, ‘‘गणेशोत्सव मिरवणुकांचा मार्ग हा शिवतीर्थावरून निघून तो नदीकडेच जातो. त्यामुळे त्याच ठिकाणी विसर्जन करणे हे सुलभ आहे. गेली २ वर्षे कोरोनाच्या कार्यकाळात अडचणींमुळे मंडळे आणि गणेशभक्त यांनी प्रशासनास सहकार्य केले. गत २ वर्षे ज्या शहापूर येथील खणीत श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्या जात होत्या त्या खणीतील पाणी अत्यंत दूषित आहे. त्यामुळे मूर्ती या नदीतच विसर्जित करणे संयुक्तिक ठरेल. ज्यांना श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते, असे वाटते त्याविषयी सविस्तर चर्चा होणे आवश्यक असून नेमके कोणत्या गोष्टीमुळे नदी प्रदुषित होते तेही समोर येणे आवश्यक आहे.’’
स्रोत: दैनिक सनातन प्रभात