तिरुवनंथापुरम् (केरळ) : शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशासंदर्भात चालू असलेल्या आंदोलनाला विश्व हिंदु परिषदेने विरोध दर्शवला आहे. परिषदेने मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या कोणत्याही गटास रोखण्यात यावे, अशी केरळ शासनाकडे मागणीही केली आहे. अशा प्रकारची आंदोलने भगवान अय्यप्पाच्या भक्तांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे षड्यंत्र असून हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या शबरीमलाचे महत्त्व नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, असे विहिंपचे प्रदेशाध्यक्ष एस्.जे.आर्. कुमार यांनी सांगितले.
१. हिंदूंच्या तीर्थक्षेत्री सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या विविध प्रथा-परंपरांविषयी आणि हिंदूंच्या श्रद्धेविषयी न्यायालयांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असेही कुमार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
२. तृप्ती देसाई यांनी त्रावणकोर देवस्वम बोर्डाकडे अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा अशी मागणी केली आहे, या संदर्भातील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना कुमार म्हणाले की, मंदिरात त्यांना प्रवेश न देण्याचे दायित्व केरळ शासनाचे आहे. मंदिरात महिला प्रवेशासंदर्भात प्रसिद्ध ज्योतिषाचार्य, तंत्री (मंदिराची रचना करणारी मुख्य व्यक्ती), मंदिराचे सर्व पुजारी देवप्रसनम् (देवाला प्रश्न विचारण्याचा अथवा कौल घेण्यासारखा प्रकार) या विधीद्वारे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे; परंतु या विषयासंदर्भात न्यायालयाचा कोणताही हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही. तसेच या आधी केरळ उच्च न्यायालयाने मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्याने त्यांना रोखण्यासाठी मंदिराला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी, असा निर्णयही दिला आहे.
अय्यप्पा देवता नैष्ठिक ब्रह्मचारी असल्याने मंदिरात महिलांना प्रवेश नाही ! – एस्.जे.आर. कुमार, विहिंप
शबरीमला येथील मंदिरात महिलांना असलेल्या प्रवेशबंदीसंदर्भात कुमार म्हणाले की, अय्यप्पा ही देवता नैष्ठिक ब्रह्मचारी (निष्ठेने ब्रह्मचारी झालेले) असल्याकारणाने वयाच्या १० व्या वर्षापासून ५० व्या वर्षापर्यंतच्या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश नाही. महिलांच्या प्रवेशामुळे अय्यप्पाचे ब्रह्मचर्य आणि कठोर नियमांचे यत्किंचितही उल्लंघन होऊ नये, अशी आमची मागणी आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात