Menu Close

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीमे अंतर्गत विविध जिल्ह्यांत पोलीस, प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम

मुंबई – यंदा देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतांना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा, तसेच जे नागरिक, संस्था, आस्थापने, तसेच समूह राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत ठिकठिकाणी पोलीस, प्रशासन आणि शाळा, महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली. ही निवेदने देतांना समितीच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला.

अनुमती नसतांना जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करतात त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या ‘मास्क’ची विक्री करणार्‍यांवरही कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या समितीच्या वतीने पोलीस आणि प्रशासन यांना देण्यात आलेल्या निवेदनात केल्या आहेत.

मुंबई आणि नवी मुंबई

मुलुंड (मुंबई) येथील नायब तहसीलदार सौ. अवंती मयेकर यांना निवेदन देताना समितीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक

मुलुंड (मुंबई) येथील नायब तहसीलदार सौ. अवंती मयेकर यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार यांनी निवेदनातील विषयावर सहमती दर्शवली आणि पुढील कारवाईसाठी पाठवणार असल्याचे या वेळी उपस्थित समितीच्या प्रतिनिधींना सांगितले. मुंबईमध्ये दादर, शिवाजी पार्क, अंधेरी, जोगेश्वरी येथे नवी मुंबईमध्ये रबाळे येथील पोलीस ठाण्यांतही निवेदने देण्यात आली.

निवेदन स्वीकारल्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सतीश कसबे यांनी सुचवले, ‘‘तुम्ही प्रतिवर्षी याची आम्हाला आठवण करून देता, हे चांगले आहे. त्यासमवेत राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याविषयीची भ्रमणभाषची ‘कॉलर ट्यून’ सिद्ध करून ती लावण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केल्यास त्याचा चांगला परिणाम होईल.’’

ठाणे

अंबरनाथ तहसीलदार श्रीमती प्रशांती माने यांना निवेदन देताना समितीच्या कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील तहसीलदार प्रशांती माने आणि बदलापूर तहसीलदार कार्यालयात समितीच्या वतीने निवेदन देण्यात आली. ठाणे भागातील नौपाडा, कापूरबावडी, कासारवडवली, मानपाडा येथे, डोंबिवली भागात रामनगर, टिळकनगर येथे, तसेच कळवा, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि शहापूर येथील पोलीस ठाण्यांतही निवेदने देण्यात आली.

बदलापूर येथील पोलीस ठाण्यात उपस्थित गुन्हे शाखेचे निरीक्षक श्री. विक्रमसिंग कदम निवेदन स्वीकारल्यावर म्हणाले, ‘‘पुष्कळ चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात. लोकांना ध्वजाच्या मान-अवमान संदर्भात ज्ञान नाही आणि जागृती करण्याची आवश्यकता आहे.’’

रायगड

अलिबाग येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांना निवेदन देताना समितीच्या कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक

रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांना निवेदन देण्यात आले. नवीन पनवेल, खालापूर, रोहा, पेण आणि उरण येथील तहसीलदार कार्यालयांसह अन्य स्थानिक प्रशासकीय कार्यालयात निवेदने देण्यात आली. याप्रमाणे नागोठणे, उरण, पेण, रोहा, खोपोली, खालापूर, नवीन पनवेल येथील पोलीस ठाण्यांतही निवेदने देण्यात आली.

नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हयांत एकूण ७१ शाळा आणि महाविद्यालये येथे निवेदने

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखला जाऊन राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतीके आणि मानचिन्हे यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यात एकूण ३४ शाळा, महाविद्यालये, रायगड जिल्ह्यात एकूण ३३ शाळा, महाविद्यालये तर नवी मुंबईत एकूण ४ शाळा आणि महाविद्यालये यांना निवेदने देण्यात आली. या सर्व ठिकाणी शिक्षकवर्गाचा सकारात्मक प्रतिसाद होता.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *