Menu Close

सुराज्याकडे वाटचाल करूया !

भारत अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. सर्वच देशवासीय भारताचे हे वर्ष साजरे करतांना अत्यानंदित होत आहेत. भारतातील कोट्यवधी लोकांनी ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवून स्वत:तील राष्ट्रप्रेम घरावर तिरंगा लावून मूर्त स्वरूपात आणले. राष्ट्रप्रेमाची ही ज्योत भारतीय नागरिकांनी स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत तेवत ठेवून आणि तिला कृतीशीलतेची जोड देत ती वाढवत नेणे आवश्यक आहे. अन्यथा हे केवळ एक दिवसाचे देशप्रेम व्यक्त करणे होईल. भारतीय स्वातंत्र्य साकार रूपात साध्य होण्यासाठी लाखो लोकांनी त्याग केला आहे आणि बलीदान दिले आहे. सशस्त्र संघर्षातून हा लढा यशस्वी झाला असला, तरी समाजातील एक वर्ग तसे मानायला सिद्ध नाही आणि देशाचे दुर्दैव म्हणजे याच वर्गाने स्वातंत्र्यानंतर भारतावर दीर्घकाळ राज्य केले. ज्या वर्गाला क्रांतीकारकांचा त्याग मान्य नाही, ज्यांना ‘केवळ एकाच कुटुंबाने स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले’, असे वाटते, त्यांनी ‘देशावर कशा प्रकारे राज्य केले असेल ?’, याची कल्पना करता येईल.

भारताच्या विकासातील अडथळे

भारतावर सर्वाधिक काळ सत्ता असणार्‍या काँग्रेसने देशासाठी काही विकास प्रकल्प राबवण्याच्या घोषणा केल्या, तरी त्यासमवेत भ्रष्टाचाराचीही देणगी दिल्यामुळे देश अनेक क्षेत्रांत मागे राहिला, असे खेदाने म्हणावे लागेल. सुरक्षित, समाधानी आणि स्वच्छ या देशांच्या सूचींमध्ये जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक अनेक वर्षे पुष्कळ खालीच राहिला आहे. भारतातील भ्रष्टाचाराची भयानकता ‘ट्रांस्परन्सी इंटरनॅशनल’ यांसारख्या स्वयंसेवी संस्थांनी वेळोवेळी आकड्यांमध्ये मांडली आहे. ‘भारतातील प्रशासकीय अधिकारी म्हणजे कुंभकर्णाचे अवतार’, असे मत काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. अनेक गंभीर प्रकरणांत पोलीसच गुन्हेगार म्हणून पुढे आले आहेत. अगदी काल-परवाचीच बातमी म्हणजे महाराष्ट्रातील एका निलंबित पोलिसाने तक्रारदाराकडे १ कोटी रुपयांची लाच मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. नागरिकांना प्रशासनाचा आधार न वाटता, कामे होण्यातील अडथळाच वाटतो. केवळ नागरिकांनाच नव्हे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ‘प्रशासन सर्वांत सुस्त आणि कामे न करणारे आहे अन् त्याचा त्यांना स्वत:लाही पुष्कळ त्रास होत आहे’, अशी टीका केली होती. एका केंद्रीय मंत्र्याला न जुमानणार्‍या प्रशासनाचा जनतेला कधी आधार वाटेल का ? गोरगरीब जनतेला केंद्रीभूत ठरवून आखल्या गेलेल्या शासकीय योजना तळागाळात कशा राबवल्या जाणार ? परिणामी अनेक समस्यांचे घोंगडे तसेच भिजत पडले आहे.

यांचा आदर्श घेणे अपेक्षित

तुलनात्मकदृष्ट्या विचार करायचा झाल्यास भारतानंतर १ वर्षाने स्वतंत्र झालेल्या इस्रायलकडे पहाता येईल. इस्रायलचा जन्म मुळी प्रदीर्घ संघर्षानंतर झालेला ! चहुबाजूंनी बलाढ्य मुसलमान देश इस्रायलचा घास कधी घेतील ? याचा नेम नाही. परिणामी त्यांच्या समवेत अखंड संघर्ष चालू ठेवायचा आणि त्याच वेळी विकासाच्या योजना आखून त्या पूर्णत्वाला न्यायच्या, अशा दोन ठिकाणी इस्रायली जनतेला शक्ती लावावी लागली. इस्रायलची लोकसंख्या केवळ काही लाखांमध्ये आहे. तरी जाज्वल्य राष्ट्राभिमान आणि देशाला पुढे नेण्याची प्रचंड जिद्द या बळावर इस्रायल आज वर्ष २०२२ मध्ये सर्व अरब देशांना पुरून उरला आहे. त्याने तंत्रज्ञान आणि भौतिक विकास यांमध्ये गरुड भरारी घेतली आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असूनही समुद्राच्या खार्‍या पाण्यावर प्रक्रिया करून इस्रायलमध्ये ते वापरले जाते. तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात इस्रायलचा दबदबा आहे. दुसरे उदाहरण घेता येईल, ते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या २ वर्षांपूर्वी अणूबाँबच्या मार्‍यामुळे उद्ध्वस्त झालेला जपान ! आजच्या घडीला जपान एक विकसित आणि प्रगत देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. जपानही तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जपानची तुलना केल्यास भारताची स्वातंत्र्योत्तर काळात एवढी बिकट स्थिती नव्हती. त्यामुळे एव्हाना भारत भौतिक विकासाच्या वाटचालीत आघाडीवर हवा होता; परंतु स्वातंत्र्यानंतर ६ दशके राजकारण्यांनी स्वत:च्या तुंबड्या भरल्या आणि देश रसातळाला नेला.

आध्यात्मिक पायावर भारताची उभारणी शक्य !

गेल्या ८ वर्षांत म्हणजे नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर देशाने स्वातंत्र्यानंतरच्या ६ दशकांमध्ये भौतिक विकास आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्याची जी गती पकडली नव्हती, ती आता पकडली आहे, असे लक्षात येते. यात रस्ते, बांधकाम, जहाज बांधणी, राममंदिराच्या जागेचा निकाल लागून श्रीराममंदिराच्या बांधकामाने वेग पकडणे, काशी विश्वनाथ धामचे काम पूर्ण होणे इत्यादी विविध गोष्टींचा उल्लेख करता येईल. भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासन चांगल्या उपाययोजना राबवत असले, तरी अजूनही त्यावर आळा घालण्यासाठी यश मिळालेले नाही. बुद्धीपूर्वक, चर्चा-विनिमय करून कितीही उपाययोजना काढल्या, तरी त्याला मर्यादा येतात, असे लक्षात येते. अन्य देशांच्या तुलनेत भारताचे वेगळेपण म्हणजे देशाला आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. लाखो वर्षांचा इतिहास आहे. भारताचा राष्ट्रवाद हा धर्मावर आधारित आहे. अन्य देशांप्रमाणे निवळ भौतिक विकास साधून भारताची स्थिती पालटणार नाही, तर भौतिकतेला आध्यात्मिकतेची जोड दिल्यासच दीर्घकालीन उपाययोजना निघू शकतील. याच आध्यात्मिक बैठकीमुळे भारतात लाखो वर्षे प्रगल्भ संस्कृती, आचार-विचार टिकून राहिले आहेत. शिल्पकला, वास्तूकला, संगीत आणि अन्य कला यांच्या माध्यमांतून त्याची प्रचीतीही आपल्याला आली आहे. भविष्यवेत्त्यांच्या सांगण्यानुसार येत्या काळात भारत एक बलशाली, आत्मनिर्भर आणि संपन्न देश म्हणून निश्चितपणे नावारूपाला येईल. त्यासाठी आवश्यकता आहे ती आध्यात्मिकतेच्या दिशेने पावले उचलण्याची !

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *