राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्र्रध्वज त्या दिवशी सायंकाळनंतर रस्त्यावर, कचरापेटीत किंवा गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. राष्ट्रध्वजाचा हा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून गेली १९ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. या जनजागृती मोहिमांमुळे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा उपयोग ९५ टक्के थांबला असून अन्य माध्यमांतून होणारा अवमान रोखण्यात यश आले आहे.
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर थांबवण्यासाठी याचिका
प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस त्यांची विटंबना उघड्या डोळ्यांनी पहात रहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये वर्ष २०११ मध्ये एक जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. यावर न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. उच्च न्यायालयाने विशेषतः शासनाला ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी आणि त्यामध्ये सामाजिक संस्थांना सामावून घ्यावे’, असेही आदेश दिले आहेत. यामध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करणे अभिप्रेत आहे.
गेली १९ वर्षे चालू असलेली मोहीम !
हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०११ मध्ये याचिका प्रविष्ट केली होती; मात्र प्रत्यक्षात राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेली १९ वर्षे अथक प्रयत्नरत आहे. या अंतर्गत व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, हस्तपत्रके वाटणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर जागृतीपर ध्वनीचित्रफीत दाखवणे, रस्त्यांवर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती मोहीम राबवणे आदी कृती केल्या जातात. या मोहिमेत देशभरात विविध जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये, लोकप्रतिनिधी, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देण्यात येतात. या मोहिमेत अनेकांनी समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. काही प्रशासकीय अधिकार्यांनी त्या त्या वेळी आदेश काढून ही मोहीम सर्वत्र राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
या संदर्भात शाळांमध्ये ठिकठिकाणी घेतलेल्या व्याख्यानांमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याकडून ‘राष्ट्रध्वजाचा अवमान कसा होत आहे ?’, हे लक्षात आल्यावर तो त्यांच्याकडून टाळला जाऊ लागला. या मोहिमेच्या अंतर्गत ठिकठिकाणी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी झाल्यावर काही दिवस हे ध्वज गोळा करण्यात आले. हे गोळा केलेले ध्वज परत शासनाकडे जमा करण्यात आले.
विटंबना रोखण्यासाठी अन्य ठिकाणी होणारे प्रयत्न !
राष्ट्रध्वज छापलेल्या ‘टी-शर्ट’ची विक्री करणार्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने ठिकठिकाणी पोलीस ठाणे, स्थानिक प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्या. यामुळे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या ‘टी-शर्ट’च्या विक्रीस प्रतिबंध करण्यात आला. याच प्रकारे अन्य कुठेही साहित्य, विज्ञापन यांद्वारे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला, तरी तो रोखण्यास समितीचा पुढाकार असतो.
ध्वनीचित्रफीत आणि प्रसारमाध्यमे यांद्वारे जनजागृती
१. मोहिमेच्या अंतर्गत प्रबोधनासाठी समितीने विशेष ध्वनीचित्रफीत सिद्ध केली असून ती विविध चित्रपटगृहे, विद्यालये, महाविद्यालये, तसेच अन्य ठिकाणी दाखवण्यात येते. यामुळे मोठ्या प्रमाणात जागृती होण्यास साहाय्य होते.
२. मोहिमेच्या अंतर्गत विविध दैनिके, साप्ताहिके, ‘वेब पोर्टल्स’ यांमध्ये जागृतीपर लेख देऊन समाजात व्यापक स्तरावर जागृती करण्यात येते. काही ठिकाणी आकाशवाणीवरही विषय सांगण्यात आला.
३. काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकार्यांनी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या संदर्भात एक समिती स्थापन केली. त्यात हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले होते. सांगली-कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात ‘जिल्हा प्रशासन, प्राथमिक शिक्षण खाते यांनी समितीच्या निवेदनाप्रमाणे कृती करावी’, असे आवाहन करणारे पत्रक काढले होते.
४. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सॲप इत्यादी सामाजिक माध्यमांद्वारे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी उद्बोधक पोस्ट पाठवून, तसेच ‘ट्विटर ट्रेंड’द्वारे या विषयाचा प्रसार करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा !
‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे. काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी या संवेदनशील विषयाचे गांभीर्य न ठेवता ‘ॲमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘स्नॅपडील’ यांसारख्या ‘इ-कॉमर्स’ संकेतस्थळांवरून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग असलेले ‘मास्क’ बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात येते. तरी त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा ‘मास्क’ची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही, या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी. या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा चालू आहे.
‘हिंदु जनजागृती समिती’ एका छोट्या संघटनेकडून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी अनेक वर्षे सातत्यपूर्ण झालेले कार्य हे अद्वितीयच म्हणावे लागेल. या व्यापक जनजागृतीद्वारे भारताच्या राष्ट्रध्वजाविषयी भारतियांमध्ये आदर निर्माण झाल्यास ध्वजाचा अवमान कायमस्वरूपी रोखला जाईल, हे निश्चित !
– श्री. सागर चोपदार, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, मुंबई.