श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा इतिहास अभ्यासवर्ग !
समाज आणि राष्ट्र यांनी विविध प्रकारच्या आक्रमणांना ओळखून वेळीच प्रत्युत्तर द्यावे ! – संपादक
सांगली, १७ ऑगस्ट (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्य हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यानुसार, तसेच भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत असलेल्या धर्मसंस्थापनेच्या कार्याप्रमाणे आहे. आपण सर्वस्वाचा त्याग करून राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत होऊया. याचप्रमाणे स्वधर्माभिमान जागृत करून राष्ट्र म्हणून ताठ मानेने उभे रहाणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्ट या दिवशी सांगली येथील धनंजय गार्डन, कर्नाळ रस्ता येथे ‘इतिहास अभ्यासवर्गा’चे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासवर्गात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या अभ्यासवर्गात विटा येथील श्री. अभय भंडारी, भारताचार्य श्री. सु.ग. शेवडे, पुणे येथील इतिहास संशोधक श्री. शिवराम कार्लेकर, श्री. अभिजीत जोग, श्री. क्रांतीसेन आठवले, श्री. संजय निळकंठ सफई, गोरक्षक श्री. पंडितराव मोडक यांसह अन्य तज्ञांचे मार्गदर्शन झाले. या वर्गासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई, श्री. बाळासाहेब बेडगे यांसह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.
या प्रसंगी ‘भारतीय मजदूर संघा’चे श्री. संजय नीळकंठ सफई म्हणाले, ‘‘विविध प्रकारच्या युद्धांना आज भारताला सामोरे जावे लागत आहे. त्यात जैविक युद्ध, छद्म युद्ध, अपप्रचाराचे युद्ध, धार्मिक विद्वेषाचे युद्ध, वैचारिक आणि मानसिक युद्ध, सांस्कृतिक युद्ध यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. आजची हिंदी चित्रपटसृष्टी आणि ‘ओ.टी.टी.’ म्हणजेच सामाजिक प्रसारमाध्यमे विषकन्येप्रमाणे समाजाला विविध प्रकारचे विष हळूहळू प्राशन करायला लावत आहे. जो समाज आणि जे राष्ट्र या विविध प्रकारच्या आक्रमणांना ओळखून त्या त्या पद्धतीने प्रत्युत्तर देत नाहीत, तो समाज अन् ते राष्ट्र नष्ट होते. आपला देश जागृत होत असून भारतात विविध प्रकारची शस्त्रे-अस्त्रे निर्मिती, आयुध निर्माण प्रकल्प, अवकाश संशोधन, वैद्यकीय संशोधन, आयुर्वेदिक संशोधन, तसेच विविध उपासनापद्धती, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्यासाठी देशातील अनेक घटक कार्यरत आहेत.’’
विशेष : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘धनंजय गार्डन’चे श्री. धनंजय सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात