Menu Close

प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी – श्री. रमेश शिंदे

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. सुनील चौगुले, श्री. किरण दुसे, पत्रकारांना संबोधित करतांना श्री. रमेश शिंदे, श्री. संभाजीराव भोकरे आणि श्री. आदित्य शास्त्री

कोल्हापूर – वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांच्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच महापालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी वर्षातून एकदाच येणार्‍या गणेशोत्सवाला प्रदूषणास उत्तरदायी ठरवतात. अनेक ठिकाणी श्री गणेशमूर्तींचे बलपूर्वक दान करण्यास किंवा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेशभक्तांना भाग पाडले जाते. साखर कारखान्यांचे पाणी पंचगंगा नदीत सोडल्याने सहस्रो मासे मृत झाल्याच्या घटना गेल्या २ वर्षांत घडलेल्या आहेत. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही ठोस कृती केलेली नाही. इचलकरंजी येथील गणेश मंडळांनी ‘पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी’, अशी ठाम मागणी केली आहे. त्यामुळे कोल्हापुरातही प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

या प्रसंगी ‘बाल हनुमान तरुण मंडळा’चे उपाध्यक्ष श्री. सुनील चौगुले, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाउपप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे आणि श्री. आदित्य शास्त्री उपस्थित होते. या मागणीला शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी यांनी पाठिंबा असल्याचे कळवले आहे.

श्री. रमेश शिंदे या वेळी पुढे म्हणाले,

१. श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर नदी किती प्रदूषित होते, याचा अहवाल आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा मागितला; मात्र तसा कोणताही अहवाल आजपर्यंत त्याने दिलेला नाही.

२. कोल्हापूर महापालिका पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी अपयशी ठरत असल्याविषयी आतापर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला तीन वेळा दंड झाला आहे. त्यामुळे जे स्वत:च प्रदूषण रोखण्यात अपयशी आहेत, त्यांनी ‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, असा कांगावा करू नये.

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. सुनील चौगुले, श्री. किरण दुसे, श्री. रमेश शिंदे, पत्रकारांना संबोधित करतांना श्री. संभाजीराव भोकरे आणि श्री. आदित्य शास्त्री

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘गेली १५ वर्षे आम्ही नदी प्रदूषणाच्या विरोधात आंदोलन करत आहोत. अनेक कारखाने मळीमिश्रीत पाणी नदीत सोडतात. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या पाण्यात जनावरे धुतल्याने त्यांनाही त्वचेच्या समस्या निर्माण होतात. या गोष्टी आम्ही अनेक वेळा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत; मात्र एकदाही त्याने ठोस अशी कारवाई केलेली नाही. याचसमवेत ‘श्री गणेशमूर्ती शाडू मातीच्या असाव्यात’, यासाठी कुंभारांना भेटूनही आम्ही प्रयत्न केले आहेत, तसेच भाविकांनाही आम्ही त्यासाठी प्रवृत्त करतो. केवळ हिंदूंचा सण आल्यावरच अनेकांना प्रदूषण आठवते. ज्या मूर्ती भाविक विसर्जन करण्यासाठी जातात, त्या काही ठिकाणी बळजोरीने काढून घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. प्रशासन ज्या श्री गणेशमूर्ती दान म्हणून घेते त्यांचे पुढे काय होते, यावरही मोठे प्रश्‍नचिन्ह आहे.’’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *