श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, पुणे विभागाच्या वतीने धर्मप्रेमी तरुणांसाठी कार्यशाळा !
पुणे – आदर्श राष्ट्र आणि समाज घडवण्यासाठी भगवंताच्या कृपेची आवश्यकता आहे. यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन साधनेच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत, तसेच साधनेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या साधनेतील सातत्य टिकवून ठेवायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी व्यक्त केले. ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, पुणे विभाग’ यांच्या वतीने पिसोळी येथे धर्मप्रेमींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पुणे येथील हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) मृणाल साखरे यांनीही उपस्थितांना ‘कायदेविषयक आणि माहितीचा अधिकार’ याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी जिज्ञासेने विषय समजून घेत ‘माहिती अधिकार कायद्याचा वापर करून सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले, तसेच धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
अधिवक्त्या (सौ.) मृणाल साखरे यांनी कायदेविषयक आणि माहितीच्या अधिकाराचा वापर करण्याच्या संदर्भात सांगितले की, सद्यःस्थिती पहाता समाजात घडणारे अनुचित प्रकार थांबवण्यासाठी, तसेच समाज आणि राष्ट्र यांसाठी माहिती अधिकाराचा वापर करून आदर्श सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. उपस्थित धर्मप्रेमींनी मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत घोषणा दिल्या. या कार्यशाळेत श्री. नागेश जोशी यांनी ‘माहिती अधिकार कायद्याचा वापर करून धर्मरक्षण आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी कसे प्रयत्न करू शकतो ?’, या संदर्भात काही उदाहरणे सांगितली.
वैशिष्ट्यपूर्ण
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, पुणे विभागाचे कार्य पहाणारे श्री. मुकुंद मासाळ यांनी अन्य धर्मप्रेमींच्या साहाय्याने या कार्यशाळेचा प्रसार करून अनेक धर्मप्रेमींना सहभागी करून घेतले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात