मिरज : काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले, कर्नाटकात हिंदूंवर संकट आले, तर हिंदूंना दु:ख होत नाही कि त्यांच्यासाठी कोणती कृती करण्याची इच्छा होत नाही. याउलट डेन्मार्कमध्ये मुसलमानांना काही झाल्यास भारतातील मुसलमानांमध्ये प्रतिक्रिया उमटतात. भाषा, प्रांत यांत हिंदूंनी न अडकता केवळ एक हिंदू म्हणून एक होणे ही काळाची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र आणि हिंदु धर्मासाठीच मी काय करू शकतो, हाच विचार प्राधान्याने असायला हवा, असे मार्गदर्शन कर्नाटक येथील श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. मिरज येथे हिंदु धर्माभिमान्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या वेळी अधिवक्ता राजेंद्र शिरसाट, अधिवक्ता किरण जाबशेट्टी, कवठेमहांकाळ येथील भाजपच्या सौ. आशाताई पोतदार, शिवसेनेचे माजी सांगली जिल्हाप्रमुख श्री. विकास सूर्यवंशी, तासगाव येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री. निवास पाटील, श्री. संजय पाटील, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. अरुण यादव आणि श्री. श्रीकृष्ण माळी, धर्मजागरण मंचचे श्री. राजू शिंदे, श्री. चंद्रकांत आवळे, भाजयुमोचे श्री. अजिंक्य अंबर, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री किरण कांबळे, शुभम भोरे, राहुल कांबळे, प्रसाद दरवंदर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण पोळ यांसह ४० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
श्री. मुतालिक या वेळी म्हणाले…
१. मला गोवा शासन दोन वर्षे राज्यात येऊ देत नाही. गोव्यात मी अन्य कोणतीही कृती करणार नसून केवळ देवाचे दर्शन घेण्यासाठीही मला बंदी करण्यात येत आहे. या विरोधात न्यायालयात गेल्यावरही न्याय मिळाला नाही.
२. गेल्या १० वर्षांत संघटनेचे कार्य करतांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. हिंदुत्वाच्या प्रखर कार्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आम्ही नकोसे आहोत, हे दुर्दैव आहे.
३. या दोन मासांत कर्नाटक राज्यात मला ८ जिल्ह्यांत बंदी करण्यात आली आहे. तरीही संत, तसेच प.पू. डॉक्टर यांच्या आशीर्वादामुळे आम्ही हे कार्य करत आहोत.
४. वर्ष २००९ मध्ये कर्नाटकमध्ये पबमध्ये आक्रमण झाले तेव्हा मी पुणे येथे होतो, तरीही मला पुण्यात पोलिसांनी त्या प्रकरणात अटक केली. केवळ दूरचित्रवाहिन्यांची तोंडे बंद करण्यासाठी माझा राजकीय बळी देण्यात आला. याचा दुसरा लाभ असा झाली की, आम्हाला देशभर प्रसिद्धी मिळाली.
५. एकीकडे मला दोन-दोन वर्षे गोवा राज्यात प्रवेश करण्यास विरोध केला जातो, त्याउलट देशद्रोही घोषणा देऊनही अनेकांना देशात कुठेही भाषण करण्यास अनुमती देण्यात येते.
६. काश्मिरी हिंदूंसाठी आम्ही २२ हून अधिक संघटनांनी एकत्र येऊन ठोस कृती कार्यक्रम आखण्यास प्रारंभ केला आहे.
क्षणचित्रे
१. येळावी येथील हिंदु धर्माभिमान्यांनी संघटितपणे विरोध करून अनधिकृत मशीद बंद पाडली. त्यासाठी श्री. मुतालिक यांनी येळावी येथील हिंदु धर्माभिमान्यांचे विशेष अभिनंदन केले. त्याचप्रमाणे तासगाव येथील गोरक्षणासाठी काम करणार्या गोरक्षकांचे विशेष अभिनंदन केले.
२. कवठेमहांकाळ येथील सौ. आशाताई पोतदार यांच्यासारख्या रणरागिणींची आवश्यकता आहे, असे श्री. मुतालिक म्हणाले.
हिंदूंमध्ये लढाऊ वृत्ती निर्माण करणे अत्यावश्यक !
आज देशद्रोही कर्करोगाप्रमाणे भारतात पसरत आहेत. भारतात ५० सहस्र श्रीनगर सिद्ध होत आहेत. त्यासाठी हिंदूंमध्ये लढाऊ वृत्ती निर्माण करणे आणि समाजात क्षात्रतेज वाढवणे अत्यावश्यक आहे, असे श्री. मुतालिक यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात