भारतातील हिंदूंना साहाय्य न करणार्या सरकारी यंत्रणा पाकमधील शरणार्थी हिंदूंना कधीतरी साहाय्य करतील का ? -संपादक
नवी देहली – देहलीतील ‘मजनू का टीला’ या भागात पाकिस्तानातून भारतात आश्रय घेतलेल्या हिंदूंची वस्ती आहे. वर्ष २०११ मध्ये हे हिंदू भारतात आले होते. तेव्हापासून त्यांना अनेक नेत्यांनी येऊन विविध आश्वसाने दिली; मात्र त्यांतील कुठलेही आश्वासन पूर्ण झाले नाही, असे या हिंदूंकडून सांगण्यात येत आहे. ‘एकीकडे रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना सर्वसुविधा असणार्या सदनिका देण्याची चर्चा होत असतांना आम्हाला मात्र काहीच देण्यात आले नाही’, अशी खंत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. या ठिकाणी १४५ हिंदू कुटुंबे रहात आहेत.
१. सिंध प्रांतांमध्ये शेतमालक असणारे हिंदू भारतात मात्र आता भ्रमणभाष संचांचे ‘कव्हर’ विकण्यासाठी बाध्य झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, गेल्या १० वर्षांत सरकारने आम्हाला काहीही साहाय्य केले नाही. पाणी, वीज आदी मूलभूत सुविधाही पुरवण्यात आल्या नाहीत. न्यायालयाच्या आदेशानंतर ३ मासांपूर्वी वीज, तर गेल्या वर्षापासून पाणी मिळू लागले आहे. १-२ हिंदू संघटनांनी साहाय्य केल्याचे त्यांनी सांगितले.
२. ‘पाकमधून व्हिसा मिळाल्यामुळे आम्ही भारतात येऊ शकलो. अनेकांना व्हिसा मिळत नसल्याने ते पाकमध्येच अत्याचार सहन करत आहेत’, असे काहींनी सांगितले.
३. येथील महिला स्वतःची छायाचित्रे पत्रकारांना काढू देण्यास नकार देतात. त्यांना भीती वाटते की, त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यास पाकिस्तानला त्यांची ओळख पटेल आणि त्यांच्या पाकमधील नातेवाइकांना त्रास सहन करावा लागेल.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात