वर्ष २०१० मध्ये ‘आय्.पी.एल्’ स्पर्धेत भारताने बंदी घातल्यावर शाहरूख खान यांनी घेतली होती पाकिस्तानी खेळाडूंची बाजू !
वारंवार पाकिस्तानचे समर्थन करणार्या अशा अभिनेत्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून राष्ट्रप्रेमी जनतेने त्यांना रोखठोक प्रत्युत्तर द्यावे ! -संपादक
मुंबई – वर्ष २०१० मध्ये भारताने ‘आय्.पी.एल्.’ स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातल्यावर शाहरूख खान यांनी ‘पाकिस्तानी खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी त्या वेळी शाहरूख खान यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता; परंतु या विरोधानंतरही याविषयी खंत वाटण्याचे सोडून १२ वर्षांनंतर शाहरूख खान यांनी स्वत:च्या पाकिस्तानप्रेमाचे समर्थन केले आहे. जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी ‘एन्.डी.टी.व्ही.’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरूख खान यांनी ही भूमिका व्यक्त केली.
१. वर्ष २०१० मध्ये भारतात झालेल्या ‘आय.पी.एल्.’ स्पर्धेत सहभागी होण्यास पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. पाकिस्तानी खेळाडूंचे समर्थन केल्यामुळे त्या वेळी प्रदर्शित होणार्या शाहरूख खान यांच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केले होते. महाराष्ट्रात शिवसेनेनेही या चित्रपटाला जोरदार विरोध केला होता.
२. शाहरूख खान यांच्या प्रदर्शित होणार्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या ‘प्रमोशन’साठीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी पुन्हा पाकिस्तानचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, ‘‘मला अनेकजण सांगत आहेत, ‘तू तुझे मत मागे घे’; पण मला कळत नाही, यात मागे घेण्यासारखे आहे तरी काय ? आपण सर्वांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. मी पाकिस्तान किंवा अन्य कोणत्याही देशाचे नाव घेतले असेल, तर त्यात काय चुकीचे आहे ? हे मला कळले नाही. जगातील कोणत्याही देशाशी भारताने मैत्री करू नये, केवळ माझा चित्रपट आनंदाने प्रदर्शित होऊ द्या. मला भारतीय असण्याचा अभिमान आहे. मुळात माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. इंग्रजांच्या विरोधात लढले म्हणून त्यांना ताम्रपत्र मिळाले होते. तुम्ही तुमच्या मातृभूमीवर प्रेम करता, याचे स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही. कदाचित् मी माझ्या आयुष्यात तडजोड केली आहे आणि मी ती कधीच नाकारणार नाही; पण मला ठाऊक आहे की, मी चांगला वागलो आहे. नागरिकांनो, मी माझा कर भरतो. मी कायद्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो.’’
स्रोत: दैनिक सनातन प्रभात