संभाजीनगर : येथील रत्नपूर (खुलताबाद) तालुक्यातील वेरूळ गावातील जगद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम येथे अक्षय्य तृतीया, म्हणजेच ९ मे या दिवशी युवा प्रतिष्ठान संचलित ‘धर्मयोद्धा’ या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेची स्थापना प.पू. महामंडलेश्वर १०८ शांतीगिरी महाराज, भारतमाता आश्रमाचे पू. जनैश्वरानंद महाराज, ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके, शिवसेनेचे संभाजीनगर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब आणि अनेक संत, महंत यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमाला ३० सहस्रांहून अधिक तरुणांची उपस्थिती होती.
या वेळी ‘धर्मयोद्धा’ संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण पू. बाळकृष्णानंदजी महाराज यांच्या हस्ते, तर फलकाचे अनावरण पू. जनैश्वरानंद महाराज आणि श्री. सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचसमवेत या कार्यक्रमात श्री. सुरेश चव्हाणके यांना ‘धर्मयोद्धा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार देव, देश, धर्म यांसाठी अविरत कार्यरत असणार्या व्यक्तींना देण्यात येतो. श्री. चव्हाणके यांना हा पुरस्कार प्रखर राष्ट्रवाद आणि प्रखर हिंदुत्ववाद यांमुळे देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
संघटनेला धर्म आणि संत यांचे अधिष्ठान हवे ! – श्री. सुरेश चव्हाणके
सन्मानाला उत्तर देतांना श्री. चव्हाणके यांनी सांगितले की, आज आपण भगव्या ध्वजाखाली एकत्र आल्यास चांगले संघटन होईल. त्या संघटनाला धर्म आणि संत यांचे अधिष्ठान हवे. तसे अधिष्ठान धर्मयोद्धा संघटनेला आहे. धर्मासाठी कार्य करणार्या संस्थांमध्ये सनातन संस्था, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांसारख्या संस्था पुढे आहेत. सध्याच्या काळात अनेक संतांनी समाजात मोठ्या प्रमाणात समाजकार्य केले आहे; पण हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे हे कार्य दाखवत नाहीत.
‘धर्मयोद्धा’ संघटनेचा उद्देश
ही संघटना देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्थापन झाली आहे. या संघटनेचे ‘सेवा, सामर्थ्य आणि संघर्ष’ ही त्रिसूत्री आहे. ‘धर्मयोद्धा’ संघटनेचे अध्यक्ष ब्रह्मचारी श्री नागेश्वरानंद प्रधान, तर उपाध्यक्ष म्हणून श्री. कैलासभाऊ कुर्हाडे पहात आहेत.
क्षणचित्रे
१. ‘धर्मयोद्धा’ संघटनेच्या वतीने या वेळी उपस्थित महिलांना स्वसंरक्षणासाठी सुयांचे वाटप करण्यात आले.
२. या कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी एका केबलचालकाने ७० गावांमध्ये प्रक्षेपण करण्यासाठी धर्मशिक्षणवर्गांच्या ध्वनीचित्रतबकड्यांची मागणी केली.
३. जगदगुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी प.पू. महामंडलेश्वर १०८ शांतीगिरी महाराज यांचे मौनव्रत असते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी त्यांचे मौनव्रत सोडले. त्या वेळी वादळी वार्यासह पुष्कळ जोराचा पाऊस आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात