Menu Close

महाराष्ट्रात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद – हिंदु जनजागृती समिती

डावीकडून सौ. नयना भगत,श्री. सुनील घनवट आणि डॉ. विजय जंगम

मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने धर्मांतराच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने राज्यात ‘धर्मांतरविरोधी कायदा’ लागू करण्याची शिफारस केली होती. यानुसार कार्यवाही करून शासनाने राज्यात त्वरित कठोर असा ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी २३ ऑगस्ट या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार उपस्थित होते. याविषयी समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असेही श्री. घनवट म्हणाले.

या वेळी बोलतांना श्री. सुनील घनवट म्हणाले…

१. राज्यात काँग्रेसचे सरकार असतांना महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांच्या संदर्भात काँग्रेस सरकारच्या काळात निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने २९ नोव्हेंबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र सरकारला ‘धर्मांतरविरोधी कायदा’ करण्याची शिफारस केली होती.

२. पालघर जिल्ह्यातील डहाणू पाठोपाठ नगर जिल्ह्यातही आदिवासी महिलेच्या धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नुकताच संभाजीनगर येथेही एक पाद्री ‘चंगाई (उपचार) सभे’त गंभीर आजार बरे करण्याचा दावा उघडपणे करतांना दिसून आला. धर्मांतराचा प्रयत्न होत असलेल्या घटना म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे.

३. फरार आतंकवादी डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या रिझवान खान आणि अर्शद कुरेशी यांना काही वर्षांपूर्वी कल्याण येथून अटक केली होती. या दोघांनी सुमारे ७०० हिंदूंचे फसवून अन् प्रलोभन यांद्वारे इस्लाममध्ये धर्मांतर केले होते, असे आतंकवादविरोधी पथकाच्या अन्वेषणात आढळून आले होते.

४. देशात प्रतिवर्षी १० लाख हिंदू धर्मांतरित होत आहेत. हिंदूंचे धर्मांतर हे मोठे राष्ट्रविरोधी षड्यंत्र आहे. नागालँड, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर ही राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेत.

५. नुकतेच पुणे जिल्ह्यातून ८४० महिला-मुली बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’नुसार वर्ष २०१८ मध्ये महाराष्ट्रातून १८ सहस्र ९०१ महिला-मुली बेपत्ता झाल्या होत्या. ‘या मुली जातात कुठे ?’,

‘लव्ह जिहाद’मध्ये अडकतात ?’, ‘आखाती देशांत विकल्या जातात ?’, ‘लग्नाचे आमीष दाखवून वेश्या व्यवसायात पाठवल्या जातात ?’ कि ‘आणखी काय होते ?’, याचा छडा लागायला हवा.

६. भारतात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, ओडिशा, झारखंड, कर्नाटक या १० राज्यांनी ‘धर्मांतरबंदी कायदा’ केला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही हा कायदा त्वरित लागू करावा.

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा नाही, हे लज्जास्पद ! – विजय जंगम स्वामी, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

नवी मुंबईतील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवल्या जाणार्‍या आश्रमशाळेत कोंडून ठेवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर महिला आणि बाल कल्याण विभागाकडून कारवाई करण्यात आली. हे सत्य लोकांपर्यंत पोचवायला हवे. त्यानंतरच हिंदु समाजात जागृती निर्माण होईल. सरकार कुणाचे आहे किंवा नाही, हा विषय नाही. ज्या ठिकाणी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या रायरेश्वराची शपथ घेतली, त्याच महाराष्ट्रात हिंदू बेवारस का ? ‘छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीत अद्याप धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यात आलेला नाही’, याची लाज वाटते. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून अनेक महिला, मुली, अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत. यामागे लैंगिक अत्याचार किंवा त्यांची विक्री आदींची शक्यता आहे. धर्मांतर हा आंतरराष्ट्रीय कट आहे. अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड्स येथून धर्मांतरासाठी भारतात आर्थिक पुरवठा केला जात असल्याचे वक्तव्य अमेरिकेतील एका पाद्रीने केले आहे. यासाठी भारत हे हिंदु राष्ट्र झाले पाहिजे. हिंदु येथे सन्मानाने राहिला पाहिजे आणि सन्मानाने जगला पाहिजे.

महिलांच्या सुरक्षेसाठी धर्मांतरबंदी कायदा लागू करावा ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

स्वामी विवेकानंद यांनी ‘एक हिंदु धर्मांतरित होतो, तेव्हा एक हिंदु न्यून होतो, असे नाही, तर देशाचा एक शत्रू वाढतो’, असे म्हटले आहे. प्रतिवर्षी भारतातील १० लाख हिंदूंचे धर्मांतर होत आहे. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी महाराष्ट्रातील ७९ सहस्र मुली बेपत्ता असल्याचे म्हटले होते. यामागे धर्मांतराचे कारस्थान असल्याची शक्यता आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी धर्मांतरबंदी कायदा लागू करायलाच हवा.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *